Menu

आर्किमिडीझ

(Archimedes)

जन्म: इसविसनपूर्व ०२८७.
मृत्यू: इसविसनपूर्व ०२१२.
कार्यक्षेत्र: गणित, यंत्रशास्त्र.

आर्किमिडीझ Archimedes
ग्रीक शास्त्रज्ञ
इ. स. पूर्व २८७ ते २१२

आर्किमिडीझ हे ग्रीक शास्त्रज्ञांच्या मालिकेतले सर्वात मोठे गणिती व यंत्रशास्त्रज्ञ मानले जातात. आर्किमिडीझ यांचा जन्म इ. स. पूर्व २८७ साली सिसिली बेटात सिराक्यूला झाला. अॅलेक्झान्ड्रियात त्यांचे शिक्षण झाले. आर्किमिडीझ यांची यांत्रिक कामातली कुशाग्रता पाहून हाइरो राजाने त्यांच्यामागे यंत्रे करण्याचा तगादा लावला नसता तर कदाचित त्यांनी आपले सर्व आयुष्य भूमितीशास्त्राच्या संशोधनात घालवले असते. परंतु गणित शास्त्रातील संशोधनापेक्षा अनेक प्रकारच्या यंत्रांमुळेच ते जगप्रसिद्ध झाले. व्यवहारातल्या निरनिराळ्या कामांसाठी उपयोगी अशी चाळीसहून अधिक यंत्रे त्यांनी तयार केली. त्यांची विशेष आश्चर्यकारक यंत्रे : उंच जागी पाणी चढविण्याचाआर्किमिडीझ स्क्रू आणि चाके व कप्प्यांच्या सहाय्याने अवजड जहाज हलविण्याची किमया करणारी यंत्रे. तरफ आणि कप्पी या दोन अत्यंत उपयुक्त अशा यंत्रशास्त्रातील तत्त्वांच्या सहाय्याने मोठी वजने हलविण्याची अनेक प्रकारची यंत्रे त्यांनी बनविली. जहाजे बुडविणारे यंत्र, शत्रूंवर तोफगोळ्यांचा तूफान मारा करणारे यंत्र, आदि यंत्रे सिराक्यूस शहराला पडलेला रोमन सैन्याचा वेढा परतवण्यासाठी उपयोगी पडली. ग्रीक विज्ञानातील महत्त्वाच्या शाखांपैकी स्थितीशास्त्र आणि जलस्थितीशास्त्र यांचा त्यांनी पाया घातला. तरंगणाऱ्या वस्तूंविषयी निरीक्षण व प्रत्यक्ष प्रयोग यांच्या आधारे तरणशीलतेचे तत्त्व तसेच याचप्रकारे स्थितीशास्त्रातील सिस्धांत त्यांनी शोधून काढले व यामुळे प्राचीन काळातील सप्रयोग संशोधनाने नवे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये आर्किमिडीझ अग्रगण्य ठरतात. हाइरोच्या सोन्याच्या मुकुटाची शुद्धता तरणशीलतेच्या तत्त्वाच्या आधारे त्यांनी सप्रयोग तपासली ही कथा जगप्रसिद्ध आहे. त्यांचे तरफेसंबंधीचे सिद्धांत इतके अचूक ठरले आहेत की आजही त्यांच्यात म्हणण्याजोगा फरक पडलेला नाही.

आर्किमिडीझचे गणित शास्त्रातील संशोधन तेवढेच महत्त्वाचे आहे. वर्तुळाचा परीघ व त्याचा व्यास यांचे परस्परप्रमाण ३.१४१६ इतके असते हा त्यांचा निष्कर्ष ‘पाय’ या किमतीशी जुळणारा आहे. याशिवाय वक्ररेषा, नागमोडी रेषा आणि इतर अनेक आकृत्या यांच्यासंबंधी त्यांनी माहिती लिहून ठेवलेली आहे.
आज सर्वपरिचित असलेले गणित व पदार्थविज्ञानातील अनेक मूलभूत सिद्धांत, त्या काळात अत्यंत मर्यादित प्रयोगसाधने उपलब्ध असताना आर्किमिडीझने एकप्रकारे मांडले होते. त्यामागे त्यांची गाढ विचारशक्ती आणि एकाग्र परिश्रम होते. भूमितीतील प्रमेये सोडवताना ते तहानभूकही विसरून जात. ते अक्षरशः भूमिती जगत असत. भूमितीतले काही जटिल सिद्धांत त्यांनी अगदी सोप्या भाषेत लिहून ठेवले, परंतु युद्धात उपयोग करण्याच्या यंत्रासंबंधीची माहिती मात्र त्यांनी कोणत्याही पुस्तकात लिहून ठेवली नाही. अशाप्रकारची प्राणघातक यंत्रे तयार करणे हे ते नीच व लोभीपणाचे समजत पण नाइलाजास्तव त्यांना अशी यंत्रे बनवावी लागली.
आर्किमिडीझ यांच्या सैद्धांतिक कामाचे महत्त्व त्यांच्या काळात जाणवले नाही. त्याआधारे तंत्रविज्ञानाची प्रगती करण्याएवढी इतर शास्त्रज्ञांची प्रगती झालेली नव्हती व तशी गरजही निर्माण झाली नव्हती. त्यांच्या कामाचे महत्त्व जाणवले ते युरोपातील आधुनिक प्रबोधनाच्या काळात. आर्किमिडीझच्या पहिल्या ग्रंथाची पहिली आवृत्ती कोपर्निकस यांच्या ग्रंथाबरोबर म्हणजे १५४३ साली – आर्किमिडीझच्या मृत्यूनंतर १७०० वर्षांनी निघाली!