Menu

एमी नूथर

(Emmy Noether)

जन्म: २३ मार्च १८८२.
मृत्यू: १४ एप्रिल १९३५.
कार्यक्षेत्र: गणित.

एमी नूथर
Emmy Noether
जर्मन गणितज्ज्ञ
जन्म: २३ मार्च १८८२
मृत्यू: १४ एप्रिल १९३५

२० व्या शतकातील महत्त्वाच्या गणितज्ज्ञ म्हणून एमी नूथर यांना मान्यता मिळत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते नूथर यांचे १९१८ साली प्रसिद्ध झालेले भौतिक प्रणालींमधली अविकारीता (invariance) आणि उर्जा, संवेग, विद्युतभार इ. सारख्या अक्षय्यी राशींना (Conserved Quantity) जोडणारे प्रमेय हे आधुनिक भौतिकशास्त्राच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे ठरलेले असे गणिती प्रमेय आहे.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पाया गुणिले उंचीच्या निम्मे असते. यात पाया कोणती बाजू याला महत्त्व नाही. तसेच, त्रिकोण कसाही फिरवला तरी त्याचे क्षेत्रफळ काही बदलत नाही. यावरून ‘अविकारीतेची’ची संकल्पना स्पष्ट व्हावी. यात एखादी राशी (Quantity) तिच्याशी संबंधित घटकांमध्ये बदल केले तरी बदलत नाही. तसेच सूर्याचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बल हे फक्त अंतरावर अवलंबून असते. सूर्य केंद्र स्थानी धरून पृथ्वीवरचे स्थान बदलले तरी बल बदलत नाही. नूथर यांच्या प्रमेयानुसार ह्यात एखादी राशी अक्षय्यी राहिलीच पाहिजे, आणि ती म्हणजे कोनीय संवेग (Angular Momentum).
नूथर यांचे हे प्रमेय प्रसिद्ध झाले तेव्हा त्याचे महत्त्व कुणालाच कळले नाही आणि ५ दशके त्याचा खरा उपयोगही कळला नाही. आज मात्र क्लासिकल फिजिक्स, क्वांटम फिजिक्स आणि सामान्य व विशेष सापेक्षता यांमध्ये नूथर प्रमेयाचा महत्त्वपूर्ण उपयोग वेळोवेळी होतो. क्वांटम फिल्ड थिअरीमधील गेज सिमेट्री सिद्धांताच्या आकलनात या प्रमेयाचे मोठे योगदान आहे. यातूनच १९८३ मध्ये W आणि Z बोसॉन्स ह्या मूलकणांच्या अस्तित्त्वाबद्दलचे अनुमान बांधता आले आणि पुढे २०१२ मध्ये हिग्ज बोसॉन मूलकणांचा शोध लागला.
नूथर यांचं गणितातील काम पण मूलभूत आहे. गणितामध्ये कित्येकदा एखादा निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी अनेक मार्ग असतात. उदा. पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करण्याच्या शंभरहून अधिक पद्धती आहेत. पण सर्वात सोपी सिद्धता सहसा सखोल असते आणि त्यासाठी फक्त अत्यावश्यक बाबी वापरल्या जातात. नूथर यांना गणितातील या कमीत कमी, पण निष्कर्षाप्रत नेणाऱ्या अत्यावश्यक बाबी ओळखण्याची जणू देणगी लाभली होती. याला अमूर्त मार्ग (Abstract Approach) म्हणतात आणि नूथर यात वाकबगार होत्या. त्यांनी मांडलेल्या ‘रिंग थिअरी’ मुळे १९३० साली ‘Modern Algebra’ नावाचे अत्यंत प्रभावशाली पाठ्यपुस्तक लिहिलेल्या बार्टेल लेनडर्ट फॉन दर वॅरदन या त्यांच्याच विद्यार्थ्याने त्यांना अमूर्त बीजगणिताच्या निर्मात्या मानले.
एमी यांचा जन्म २३ मार्च १८८२चा. एलांगन विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक मॅक्स नूथर त्यांचे वडिल! तेव्हा स्त्रियांना जर्मन विद्यापीठात गणित शिकण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्या इंग्रजी व फ्रेंच शिकल्या. १८९३ पासून जर्मनीत मुलींना गणित शिकण्याची परवानगी मिळाली. तेव्हा त्यांनी एलांगन विद्यापीठात प्रवेश घेऊन १९०७ मध्ये अविकारीता सिद्धांतातील (Invariant Theory) तज्ज्ञ प्रा. पॉल गॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पीएच्. डीचा प्रबंध पूर्ण केला. डॉक्टरेट मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या आवडीच्या सामान्य आणि अमूर्त गणिती पद्धतींवर (General and Abstract Methods) काम करणं पसंत केलं.
तेव्हा गटिंगन विद्यापीठ जगातील गणिताचे प्रमुख केंद्र होते. १९१५ मध्ये आईनस्टाईनने डेव्हिड हिल्बर्ट यांना गटिंगन विद्यापीठात गुरुत्वाकर्षण आणि सापेक्षतावादावरील व्याख्यानांसाठी निमंत्रित केलं. उर्जेच्या अविनाशित्वासंबंधी पुढे आलेल्या एका प्रश्नाने हिल्बर्ट आणि आईनस्टाईन दोघेही गोंधळात होते. हिल्बर्ट यांनी नूथर यांना या प्रश्नाचा अभ्यास करण्यास सांगितले. नूथर यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने हा प्रश्न फक्त गुरुत्वाकर्षणापुरताच नव्हे तर भौतिकशास्त्राच्या इतर शाखांसाठी पण सोडवला.
नूथर यांची स्वतःची पक्की राजकीय मते होती. त्या १९१७ च्या रशियन क्रांतीच्या खंद्या समर्थक होत्या, तसेच पहिल्या महायुद्धाला विरोध करणाऱ्या ‘इंडिपेंडंट सोशल डेमोक्रॅटिक पार्टी’ पक्षाच्या सदस्यही होत्या. १९३३ मध्ये हिटलरने सत्ता काबीज केल्यावर गटिंगन विद्यापीठातील नाझी समर्थकांनी नूथर यांना काढून टाकलं. तेव्हा नाझी जर्मनीतून बाहेर पडणाऱ्या अनेक शास्त्रज्ञ, प्राध्यापकांप्रमाणे त्यांना अमेरिकेतील ब्रिन मावर विद्यापीठात संधी मिळाली. एका शस्त्रक्रियेनंतर झालेल्या अनपेक्षितपणे गुंतागुंतीमुळे त्यांचा १४ एप्रिल १९३५ रोजी मृत्यू झाला.
२० व्या शतकातील पाच श्रेष्ठ गणितज्ज्ञांपैकी एक आणि गटिंगन विद्यापीठातील नूथर यांचे एक सहकारी हेर्मन वायल यांनी नूथर यांच्या मृत्युलेखात लिहिलं की “मला जेव्हा गटिंगन विद्यापीठात १९३० मध्ये कायमचं बोलावलं गेलं, तेव्हा नूथर यांना अधिक चांगले पद मिळावं म्हणून मी विद्यापीठाकडे प्रामाणिक प्रयत्न केले. गणितामध्ये माझ्यापेक्षा अनेक बाबतीत श्रेष्ठ असलेल्या नूथर यांच्या तुलनेत वरच्या पदावर काम करण्याची मला लाज वाटत होती. पण मला यश आलं नाही. नूथर यांची गुणवत्ता आणि वैज्ञानिक महानता यांपेक्षा पूर्वग्रह, परंपरा आणि इतर बाह्य गोष्टीच वरचढ ठरल्या. माझ्या गटिंगनमधील १९३०-३३ या काळात एमी नूथर अव्वल वैज्ञानिक संशोधनामुळे आणि विद्यार्थ्यांवरील त्यांच्या प्रभावामुळे निःसंशयपणे गणितविषयक उपक्रमांचे जणू केंद्रच होत्या.”