Menu

योहान केप्लर

(Johannes Kepler)

जन्म: २७ डिसेंबर १५७१.
मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०.
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.

योहान केप्लर
Johannes Kepler
जर्मन खगोलशास्त्रज्ञ
जन्म :27 डिसेंबर, 1571
मृत्यू : 15 नोव्हेंबर, 1630

‘पृथ्वीच्या कक्षेभोवती एक द्वादशफलक (बारा पृष्ठभाग असलेली घनाकृती) काढा म्हणजे कोपऱ्यातून जाणारा गोल मंगळाची कक्षा होईल. मंगळाच्या गोलाभोवती चतुष्फलक (चार कोनांची घनाकृती- विशेषत: त्रिकोणी पिरॅमिड) काढा म्हणजे त्याच्या कोपऱ्यातून जाणारा गोल गुरूची कक्षा होईल…’ अशा प्रकारच्या ग्रहांच्या कक्षांबाबतचा कल्पनाविलास, पायथागोरसने मांडलेली ग्रहगोलांची संगीताविषयीची कल्पना बरोबर मानून निरनिराळ्या ग्रहांची स्वरमाला बसवण्याचा प्रयत्न, फलज्योतिषविद्येचे शास्त्र बनवण्याचा खटाटोप अशा गूढ, कल्पनारम्य भ्रामक जगतामध्ये वावरणारा योहान केप्लर.
1597 साली कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील धार्मिक वितुष्ट विकोपाला गेल्यामुळे कॅथॉलिकांच्या प्रभावाखालील जर्मनीत राहणे प्रॉसेस्टंट केप्लर यांना सुरक्षित वाटेना. म्हणून प्रागमध्ये टायको ब्राह या वयोवृद्ध खगोलशास्त्रज्ञाकडे केप्लर यांनी काम पत्करले. 1601 मध्ये ब्राहच्या मृत्यूनंतर ब्राहने आयुष्यभर पद्धतशीरपणे ग्रहगती संदर्भात गोळा केलेल्या निरीक्षणांची खाणच केप्लरच्या हाती आली. या निरीक्षणांची संगती लावण्याचा प्रयत्न केप्लर यांनी निरनिराळे प्रचलित सिध्दांत वापरून सुरू केला. तेव्हा त्यांना आढळून आले की, त्यावेळी सर्वमान्य असलेल्या पवित्र वर्तुळाकार गतीच्या सिध्दांतात ब्राहने नोंदलेली निरीक्षणे बसवणे अशक्य आहे. त्यांनी अंडाकृतीचा वापर केला पण यश आले नाही. अखेर त्यांनी लंबवर्तुळाकार वापरला व त्या आधारे संगतवार मांडणी करणे शक्य झाले. 1609 मध्ये ‘अॅस्ट्रॉनॉमिया नोव्हा’ या आपल्या ग्रंथातून त्यांनी आपले संशोधन प्रसिद्ध केले. त्यामुळे एकच खळबळ माजली. कारण केप्लर यांच्या सिध्दांतामुळे ग्रीकांपासून मानण्यात येणारे वर्तुळाकार गतीचे पावित्र्य निकालात निघाले आणि स्वर्गीय गोलांची कल्पकता धुळीला मिळाली. ग्रीक शास्त्रज्ञांनी असे मानले होते की, आकाशात स्वर्गीय गोलाकार ग्रहतारे घुमटांवर चिकटवलेले आहेत व ते घुमट फिरत असल्याने ग्रह-तारे फिरताना दिसतात. हे घुमटच अस्तित्वात नसतील तर ग्रहतारे त्यांच्या कक्षांमध्ये नियमितपणे फिरत कसे राहतात असा नवा प्रश्न उपस्थित राहिला. ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षांच्या दोनपैकी एका केंद्रावर सूर्य असतो, तो नेहमी या कक्षेच्या पातळीमध्ये असतो आणि ग्रह सूर्याच्या जितका जवळ, तितकी त्याची भ्रमणाची गती जास्त असते. या सर्व निरीक्षणांवरून केप्लर यांना एक गोष्ट उघड दिसली की, सूर्य ग्रहांच्या गतीचे नियमन करतो. चुंबकीय शक्तीमुळे ग्रह सूर्याभोवतीच्या भ्रमणकक्षेत राहतात असा सिध्दांत त्यानी मांडला, पण तो समाधानकारक ठरला नाही. पुढे पन्नास वर्षांनंतर न्यूटनने गुरूत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडून ग्रहांच्या भ्रमणाचे समाधानकारक उत्तर दिले.
गॅलिलिओने टेलिस्कोप बनवून ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण 1610 मध्ये सुरू केले. तोपर्यंत खगोलशास्त्रातील निरीक्षणे डोळ्याला दिसतात तेवढ्या ग्रह-ताऱ्यांपुरती निरीक्षणे मर्यादित होती. केप्लर यांनी दुर्बिणीतून गुरूच्या चंद्राचे निरीक्षण केले आणि त्यांना गुरूचे उपग्रह अशी संज्ञा दिली. त्यांनी दुर्बिणीत सुधारणा सुचवली. गॅलिलिओने वापरल्याप्रमाणे एक बहिर्गोल व एक अंतर्गोल भिंगाऐवजी दोन बहिर्गोल भिंगांचा वापर त्यांनी सुचविला. परावर्तनावर आधारलेल्या दुर्बिणी विकसित करण्यासाठी समांतर प्रकाशकिरण, पॅराबोलाच्या आकाराच्या आरशाद्वारे केंद्रिभूत होतात, या त्यांच्या शोधाचा उपयोग झाला. 1627 मध्ये त्यांनी ग्रहांच्या भ्रमणाची नवी कोष्टके आणि टायको ब्राहच्या तारांगण नकाशाची स्वत: विस्तृत केलेली आवृत्ती प्रकाशित केली.
खगोलशास्त्रातील केप्लर यांची आणखी एक कामगिरी म्हणजे बुध व शुक्र या सूर्य व पृथ्वी यांच्या मधल्या ग्रहांना सूर्यबिंब ओलांडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाला किती वेळ लागतो, याचे गणित त्यांनी केले. या गणिताच्या आधारे त्यांनी भाकीत केल्याप्रमाणे, 1631 साली सूर्यबिंबावरून बुधाच्या झालेल्या प्रवासाची निरीक्षणे गॅसेंदी यांनी केली व केल्पर यांचे भाकीत अचूक ठरले.
केप्लर यांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्यांची ‘सेम्नियन’ ही विज्ञानकथा निव्वळ कल्पनारम्य कथांऐवजी चंद्रावरच्या प्रवासाचे वर्णन करते आणि या कथेमध्ये चंद्राचे वास्तव वर्णन आढळते. विज्ञानाधिष्ठित ललित साहित्यामधली (सायन्स फिक्शन) ही पहिली कथा म्हणता येईल.
योहान केप्लर हे जन्मत: अशक्त होते. तिसऱ्या वर्षी देवीमुळे त्यांचा एक हात व दृष्टी अधू झाली होती. शारीरिक ताणांचे आयुष्य सहन होणार नाही म्हणून योहान यांना धार्मिक शिक्षणाकडे घालण्यात आले. परंतु केल्पर यांचे गणितावरचे प्रभुत्व एवढे स्पष्ट झाले की, 1594 मध्ये ग्राझ विद्यापीठात शास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले. कल्पनासृष्टीत वावरणाऱ्या केप्लर यांना प्रागमध्ये ब्राहच्या सूक्ष्म निरीक्षणांच्या नोंदीची जोड मिळाल्याने कल्पनाविलासाला वास्तव निरीक्षणांचे बंधन पडले. शास्त्रीय पद्धतीने सिद्धांताच्या शोधात गुंतल्यावर प्रस्थापित ग्रीक खगोलशास्त्रीय विचारांविरोधी सिद्धांत तपासायला ते तयार झाले. केप्लर यांचा हा प्रवास फार बोलका आहे. माहिती व निरीक्षणांचा डोंगर रचूनसुद्धा सिद्धांताची भरारी घेण्याची कुवत नसेल तर शास्त्रीय प्रगती होणार नाही, तसेच कल्पनाविलासाने जर वस्तुस्थितीत घट्टपणे पाय रोवले नाहीत तर कविकल्पना बहरतील पण शास्त्र पुढे जाणार नाही.