Menu

लिओनार्दो दा व्हिंची

(Leonardo da Vinci)

जन्म: १५ एप्रिल १४५२.
मृत्यू: ०२ मे १५१९.
कार्यक्षेत्र: सर्व विषय निपुण, चित्रकला, संशोधन, स्थापत्यशास्त्र, युद्धसामग्री, खगोलशास्त्र, शरीररचनाशास्त्र, भूगर्भ अभ्यासक.

लिओनार्दो दा व्हिंची
Leonardo da Vinci
इटालियन चित्रकार व शास्त्रज्ञ
जन्म: 15 एप्रिल, 1452
मृत्यू: 2 मे, 1519

बहुपेडी व्यक्तिमत्त्व

उत्तम चित्रकार, कल्पक संशोधक, स्थापत्यशास्त्रज्ञ, युद्धसामग्रीतज्ज्ञ, खलोगशास्त्रज्ञ, शरीररचनाशास्त्रज्ञ, भूगर्भ अभ्यासक हे सर्व एक व्यक्ती असू शकते काय? या प्रश्नाचे उत्तर ‘लिओनार्दो दा व्हिंची’ असेच येते. इटलीतील फ्लॉरेन्स शहराजवळच्या व्हिंची खेड्यात जन्मलेल्या लिओनार्दो यांचे बालपण त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी गेले. शालेय जीवनातच अवघड गणिते व प्रमेये सोडवून आपल्या बुध्दीची चमक दाखवून त्यांनी सर्वांना चकीत केले होते. चित्रकलेचे कसब उपजतच त्यांच्याकडे होते. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते व्हेरोजिओ नावाच्या चित्र-शिल्पकाराकडे उमेदवारी करू लागले. तेथे त्यांनी लाकूड, संगमरवर आणि धातूंची शिल्पे बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. लिओनार्दो यांच्या अंगातील कला-गुणांनी व्हेरोजिओ खूपच प्रभावित झाला होता. वयाच्या सव्वीस वर्षांपर्यंत लिओनार्दो यांनी त्याच्याकडे उमेदवारी केली. तोपर्यंत ते मान्यताप्राप्त कलाकारांमध्ये गणले जाऊ लागले होते आणि कलाकार संघाचे (आर्टिस्ट गिल्ड) सदस्यत्व त्यांना मिळाले. आता स्वतंत्रपणे स्वत:चे कसब दाखविण्यास लिओनार्दो मोकळा झाले.
लिओनार्दो यांनी वीणेसारखे एक वैशिष्ट्यपूर्ण तंतूवाद्य बनवले. त्याचा आकार घोड्याच्या तोंडासारखा होता आणि तोंडातील दातांच्या रचनेचा वापर स्वर निवडीसाठी होत असे. हे वाद्य बघून तेव्हाचा मिलानचा राज्यकर्ता ड्यूक लूडोव्हिको प्रभावित आणि थक्क झाला.
त्या काळात इटलीतील विविध राज्ये एकमेकांशी युद्धात गुंतलेली होती. लिओनार्दो यांनी आपले लक्ष भिन्न भिन्न युद्धसामुग्रीचे आराखडे तयार करण्याकडे वळवले. तत्कालीन तंत्रज्ञानाच्या पल्ल्यांच्या पलीकडच्या युद्धसामग्रीचे आराखडे या कल्पक शोधकाने तयार करून त्यांची प्राथमिक स्वरूपाची चित्रे काढून ठेवली. त्यात रणगाडे, विमाने यांचाही समावेश होता, तसेच त्यांच्यासाठी लागणारी दंतचक्रे (गिअर्स), निरनिराळ्या साखळ्या, एका दांड्याला लावलेली दंतचक्रे (रेचेट), इत्यादींचे आराखडेही आहेत. विमानांचे आराखडे करताना त्यांनी प्रथम पक्ष्यांच्या उडण्याचा अभ्यास केला. त्यासाठी पक्षी पाळून त्यांना आकाशात उडवून निरीक्षणे केली व ती लिहून ठेवली. आपली निरीक्षणे गुप्त ठेवण्यासाठी त्यांनी उलट्या अक्षर लिपीचा (आरशातील प्रतिमेसारखी) उपयोग केला. तशी अक्षरे ते नेहमीच वापरत असत. एकीकडे युद्धसामग्रीचे कल्पक आराखडे बनवणाऱ्या लिओनार्दो यांना प्राण्यांबद्दल प्रेम होते. त्यामुळे ते कट्टर शाकाहारी होते त्यांच्या संशोधनातील कौशल्यामुळे सरदार, सेनापतींकडून त्यांना मागणी होती. मिलान राज्यासाठी शस्त्रास्त्रांचे आराखडे बनवत असतानाच त्यांनी ड्यूकसाठी एक अप्रतिम चित्र काढले. त्याचे नाव द लास्ट सपर. 1500 मध्ये त्यांनी काढलेले अजरामर चित्र मोनालिसा जगप्रसिद्ध आहे. आजदेखील मोनालिसाचे स्मित बघण्यासाठी पॅरिसमधील संग्रहालयात पर्यटकांची गर्दी जमते.
लिओनार्दो यांनी शरीररचनेचा सखोल अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांनी समकालीन प्रसिद्ध शल्यचिकित्सकांची मदत घेतली. आणि सुमारे तीस शवांचे विच्छेदन करून मानवी शरीरातील विविध स्नायू, हाड, हाडांचे सांधे यांच्या रचनांची कलात्मक पण अचूक चित्रे काढून ठेवली. हृदय, त्यातील झडपा आणि त्यांचे स्पंदन यांचादेखील अभ्यास त्यांनी केला होता. विल्यम हॉर्वेने रक्ताभिसरणाचा शोध लावण्याआधी शंभर वर्षे लिओनार्दो यांनी ही संकल्पना मांडली होती.
लिओनार्दो यांनी जडत्वाची (Inertia) संकल्पनादेखील मांडली होती. तसेच उंचावरून खाली पडणाऱ्या वस्तूची गती जमिनीकडे पोचताना सतत वाढते हे गॅलिलिओच्या शंभर वर्षे आधी त्यांच्या ध्यानात आले होते. चंद्र पृथ्वीपासून बनलेला आहे आणि सूर्याच्या परावर्तीत प्रकाशामुळे तो प्रकाशमान दिसतो. विश्व पृथ्वी केंद्रित नसते आणि पृथ्वी स्वत:च्या आसाभोवती फिरते, या नंतर सिद्ध झालेल्या गोष्टी त्यांनी पूर्वीच नोंदवून ठेवल्या होत्या. भौतिकीशास्त्रातील या नोंदीव्यतिरिक्त लिओनार्दो यांनी वनस्पतींच्या नोंदीही करून ठेवल्या होत्या. काही वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने तर काही विरुद्ध दिशेने वाढतात, काही झाडांची मुळे जमिनीबाहेर वाढतात यांचे निरीक्षण त्यांनी केले होते. वृक्षांच्या खोडातील वृक्षांचे वय दर्शविणारी वलये असतात, फुलांमध्ये स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा भाग असतो, हेही त्याने काढलेल्या चित्रांमध्ये दर्शविलेले आहे.
लिओनार्दो यांनी कल्पनेची भरारी मारून मानवाने आकाशात भरारी मारण्यासाठीच्या यंत्रांचे आराखडे काढले. त्यामध्ये मोठ्या पंखांचा वापर सुचवला होता. त्या पलीकडे जाऊन आजच्या हेलिकॉप्टरप्रमाणे दिसणारे यान त्यांनी चित्रित केले होते. आकाशातून उडी मारण्यासाठी पॅराशूटदेखील शोधले होते. त्याचा उपयोग करून उंच पिरॅमिडवरून उडी मारताना उतरण्याचा वेग कमी करण्याची क्लृप्तीसुद्धा त्यांनी केली.
लिओनार्दोबद्दल असे म्हणता येते, की तो असा एक प्रतिभासंपन्न माणूस होता की, ज्याने अगम्य कल्पनाशक्तीला निरीक्षणांची, शोधकतेची, प्रयोगांची आणि चित्रकलेची जोड देऊन मानवोपयोगी संशोधनाला स्वत:ला वाहून घेतले होते. पण त्यांच्या उत्तुंग कामगिरीबरोबरच एक गोष्ट विसरता येत नाही की, लिओनार्दो यांनी आपले संशोधन गुप्त ठेवल्याने अनेक वर्षे त्याच्याविषयीची माहिती इतर वैज्ञानिकांना उपलब्ध झाली नाही. त्याचे संशोधन पूर्वीच प्रसिद्ध झाले असते, तर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाला कदाचित अधिक गती मिळाली असती.