Menu

श्रीनिवास रामानुजन

(Srinivasa Ramanujan)

जन्म: २२ डिसेंबर १८८७.
मृत्यू: २६ एप्रिल १९२०.
कार्यक्षेत्र: गणित.

श्रीनिवास रामानुजन
Srinivasa Ramanujan
भारतीय गणितज्ञ
जन्म : २२ डिसेंबर १८८७
मृत्यू : २६ एप्रिल १९२०

“मी ज्या गाडीने आलो तिचा नंबर विचित्रच होता. १७२९. १३ ने भागून १३३ देणारा, तेरा आकडा अशुभ…” , डॉ. हार्डी आपल्या शिष्याला म्हणाले. रामानुजननी झटकन प्रश्न केला, “असं कसं म्हणता? हा तर किती चांगला आकडा आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारांनी मांडता येणारा. बाराचा घन अधिक एकचा घन हा एक प्रकार आणि दहाचा घन अधिक नऊचा घन हा दुसरा प्रकार.
(12 x 12 x 12)+(1 x 1 x 1) = 1729 आणि (10x10x10)+(9x9x9) = 1729
क्षयाने जर्जर होऊन इस्पितळात अंथरूणात खिळलेल्या रामानुजनच्या तल्लख बुद्धीचे तेज व्याधीमुळे बिलकुल झाकोळले नव्हते. प्रत्येक आकडा हा त्यांचा जिवलग मित्र. रामानुजन आकड्यांबरोबर जगले, तेच त्यांचे विश्व होते. गहन गणिती रहस्ये एकाग्र बुद्धीने उलगडत अचंबा वाटाव्या एवढ्या सुलभतेने ते सोडवत. त्यांनी ऐंशी वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली कितीतरी सूत्रे आहेत ज्यांचा उलगडा अनेक गणितज्ञ अजूनही करत आहेत.
रामानुजन यांचा जन्म २ २ डिसेंबर १८८७ रोजी तंजावरनजिक एरोड या छोट्या खेडेगावात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगार कुंभकोणम गावात कापडाच्या दुकानात नोकरीला होते. कमाई अल्प-स्वल्पच. रामानुजनचा अगदी बालपणापासूनचा छंद म्हणजे आकड्यांशी खेळ. मोठ्या कळपातल्या मेंढ्या अचूक मोज, वडिलांच्या हिशोबा-ठिशोबाबद्दलच्या गप्पा ऐकून गणिते मांड, यांतून त्याचे आकड्यांचे शिक्षण चालू होते. शाळेच्या क्रमिक पुस्तकात त्याला नवीन काहीच मिळेना तेव्हा त्याने स्वतःच त्रिकोणमिती शिकायला सुरूवात करून आपले संशोधन १५ व्या वर्षीच सुरू केले. १९०३ साली मॅट्रिक होऊन कॉलेजला दाखल झाल्यावर गणिताशिवाय कोणत्याच विषयात गोडी नसल्याने परीक्षा उत्तीर्ण होणेही जमेना. ‘नापास’ शिक्का घेऊन अखेर १९१२ साली पोटासाठी मद्रास पोर्ट कमिशनच्या कचेरीत कारकुनाची नोकरी धरली. कचेरीचे काम सांभाळून उरलेला सर्व वेळ गणिती सूत्रे मांडून त्यांचे संशोधन चाले. त्यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्याने १२० सिद्धांतांची जंत्री केंब्रिजच्या प्रा. हार्डी या नावाजलेल्या गणितज्ञाकडे पाठविली. ते संशोधन पाहून प्रा. हार्डींनी रामानुजनला केंब्रिजला आवर्जून बोलावले. कर्मठ परंपरेतल्या रामानजनना इंग्लंडमधले हवामान, खाणेपिणे, राहणी काहीच मानवण्याजोगे नव्हते. ते स्वतःच भात शिजवून खात. प्रकृतीची खूपच आबाळ होत होती. परंतु गणितातली प्रगती मात्र वायुवेगाने चालू होती. प्रा. हार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गणितातील अव्वल ग्रंथांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे संशोधनही वेगाने पुढे जात होते. तीन वर्षांच्या काळात त्यांचे पंचवीसवर निबंध प्रसिद्ध झाले. शिवाय त्यांची प्रसिद्ध न झालेली शेकडो सूत्रे व लेख दप्तरी पडून होते. त्यांच्या संशोधनाची दखल घेऊन १९१८ साली त्यांना इंग्लंडमधील रॉयल सोसायटीचे सन्माननीय सभासदत्व बहाल करण्यात आले. त्यांची कीर्ती पसरत होती. काम वाढत होते. परंतु ही सारी बौद्धिक मेहनत पेलताना खाण्याची आबाळ झाल्यामुळे त्यांना क्षयरोगाने ग्रासले. वारंवार आजार बळावू लागल्याने डॉक्टरी सल्ल्याने ते १९१९ साली मायदेशी परत आले. पण उपाय चालले नाहीत. २६ एप्रिल १९२० रोजी त्यांचे मद्रास येथे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झाले. सारे गणिती जग हळहळले.
रामानुजन हे भारतीय गणिती परंपरेतील अर्वाचीन पंडित होत. त्यांचे पाश्चात्य गणितात शास्त्रशुद्ध शिक्षण झालेले नव्हते. तेव्हा पूर्वपद्धती कारणमीमांसेपेक्षा अंतःप्रेरणेने ते उत्तरे शोधत. पाश्चात्य परंपरेप्रमाणे औपचारिक सिद्धता न देता त्यांनी अनेक सिद्धांत नोंदवलेले होते. त्यांनी अभ्यासासाठी निवडलेल्या वास्तव विश्लेषण (Real Analysis) , आधुनिक बीजगणित, अशा उपपत्तीगर्भ शाखा त्यांच्या प्रतिभापद्धतीच्या संशोधनाला अनुकूल होत्या. रामानुजन यांनी संख्योपपत्ती (Number Theory), परंपरित अपूर्णांक (continued fractions) आदि क्षेत्रांत संशोधन केले. अतिगुणेत्तरीय श्रेढी (Hyper geometric series) संबंधातील अनेक समीकरणे व अतिशय सूक्ष्म सूत्रे त्यांनी सिद्ध केली. यातील कित्येक सूत्रे व समीकरणे रामानजुन-डुगॉल या नावाने विख्यात झाली आहेत. त्यांचा एक महत्त्वाचा शोध म्हणजे “मूळ संख्यांच्या पखरणीचा (distribution) सिद्धांत”. परंपरित अपूर्णांक या प्रांतातही त्यांनी महत्त्वाची प्रमेये सिद्ध केली. त्यांच्या वह्यांतून अनेक महत्त्वाचे सिद्धांत नोंदवलेले आहेत पण त्यांची सिद्धता दिलेली नाही.
त्यांनी नोंदवलेल्या काही सिद्धांतांच्या सिद्धता नंतर शोधून काढण्यात आल्या तर काही सिद्धांत चुकीचे ठरले. तरीही या चुका गणिताला मोठी समृद्धी देऊन गेल्या. बैजिक सूत्रांवरील त्यांचे प्रभुत्त्व व मोठमोठ्या श्रेढींवर गणिती क्रिया करण्याचे त्यांचे कौशल्य आश्चर्यकारक होते असे प्रा. हार्डी म्हणतात.
त्यांचे मौलिक संशोधन ‘श्रीनिवास रामानुजन यांचा लेखसंग्रह’ हे इंग्लंडमध्ये १९२७ साली प्रसिद्ध करण्यात आले. प्रा. अग्रवाल यांनी रामानुजनच्या संशोधनांच्या वह्यांचे संपादन केले. ते टाटा इनस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च तर्फे १९५७ मध्ये दोन खंडांत प्रसिद्ध करण्यात आले. या लेख संग्रहांद्वारे गणितज्ञांना आव्हानात्मक शिदोरी अजूनही पुरवली जात आहे.