Menu

विलियम हर्षेल

(William Herschel)

जन्म: १५ नोव्हेंबर १७३८.
मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२.
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.

विलियम हर्षेल
William Herschel
जन्म : 15 नोव्हेंबर, 1738
मृत्यू : 25 ऑगस्ट, 1822

‘आकाशाला गवसणी’ घालणारा खगोलशास्त्रज्ञ

अठराव्या शतकाच्या अखेरचा काळ ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तंत्रज्ञान तसे मर्यादित व प्राथमिक अवस्थेत होते. तरीही या तंत्रज्ञानाच्या आधारे त्या काळातील सर्वांत मोठी दुर्बीण वा दूरदर्शी बनवून ‘आकाशाला गवसणी’ घालून ‘युरेनस’ या ग्रहाचा शोध लावणारा आणि नक्षत्रीय खगोलशास्त्राचा पाया घालणारा अग्रगण्य खगोलशास्त्रज्ञ म्हणजेच विलियम हर्षेल होय.
फ्रिडरिक विलियम हर्षेल यांचा जन्म जर्मनीमध्ये हॅनोव्हर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांनी व्हायोलिन वाजवण्याचे धडे घेतले होते. तसे जुजबीच शालेय शिक्षण झाल्यावर ते वयाच्या पंधराव्या वर्षीच वडिलांबरोबर त्यांच्या पलटणीच्या बँड पथकात दाखल झाले. नंतर युद्ध चालू असताना वडिलांच्या सल्ल्यावरून ते बँड पथक सोडून घरी आले. त्यामुळे त्यांच्यावर पळपुटा शिपाई म्हणून ठपका आला व 1757 साली हर्षेल इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झाले. नंतर त्यांनी तेथे 1773 पर्यंत संगीत शिकवण्याचे आणि चर्चमध्ये ऑर्गन वाजवण्याचे काम घेतले. तरुणपणापासून हर्षेल यांना आकाश निरीक्षणांची आवड होती. आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांविषयी त्यांना प्रचंड कुतूहल होते. याचीच परिणिती म्हणून त्यांनी खगोलशास्त्राकडे आपला मोर्चा वळवला. त्यासाठी त्यांनी स्वत:च भिंगे घासून विविध क्षमतेच्या दुर्बिणी बनवल्या. तसेच खगोलशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त अशी त्याकाळी उपलब्ध असलेली उपकरणे जमवली. त्यांचे घर म्हणजे उपकरणे व दुर्बिणी बनवण्याचा कारखानाच होता. तासनतास बसून त्यांनी जो पहिला टेलिस्कोप बनवला तो 6 फूट …(Focal Length) असलेला होता. शेवटी त्यांनी 40 फूटी टेलिस्कोप बनवला. हा टेलिस्कोप अवजड असला तरी त्याचा वापर करून हर्षेल यांनी अनेक रात्री आकाश निरीक्षण करून खगोलशास्त्रीय निरीक्षणे केली. 1780 साली चंद्रावरील पर्वतांसंबंधी आपला पहिला शोधनिबंध त्यांनी रॉयल सोसायटीपुढे मांडला आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
मार्च 1781 मध्ये रात्री आकाशात त्यांना एक प्रकाशाचा ठिपका दिसला. हा ठिपका ताऱ्यांसारखा चमकत नव्हता म्हणून हर्षेल यांना प्रथम वाटले की तो एक धूमकेतू असावा. परंतु, नंतर अनेक रात्री त्या ठिपक्याचा आकाशाला भ्रमण मार्ग व त्याची गती याची तपासणी केल्यावर त्यांनी निदान केले की तो ठिपका म्हणजे एक ग्रहच आहे. तसा हा ठिपका इतर खगोलशास्त्रज्ञांनीदेखील पाहिलेला होता. पण त्यांनी त्या ठिपक्याची फारशी दखल घेतली नव्हती. हर्षेल यांनी मात्र त्या ठिपक्याच्या अभ्यासावरून नवाच ग्रह शोधला होता, ज्याला आपण युरेनस म्हणून ओळखतो. या शोधानंतर ते नावाजले गेले आणि त्यांची रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली तसेच 1782 मध्ये त्यांची ‘राज खगोलशास्त्रज्ञ’ म्हणून नेमणूक झाली. येथून पुढे खगोलशास्त्रीय शोधांची मालिकाच सुरू झाली. सर्वप्रथम त्यांनी पुढील वीस वर्षांचा आकाशसंशोधनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. त्यांनी प्रथमच ‘दि्वतारे’ आणि ‘बहुतारे’ (Double & Multiple stars) यांची एक यादी प्रसिद्ध केली. नंतर नेब्यूलांची नोंद करण्यात ते यशस्वी झाले. त्याकाळी तंत्रज्ञानाच्या मर्यादा असूनसुद्धा आकाश गोलकांच्या उत्पत्तीसंबंधीदेखील त्यांनी कल्पना मांडली होती. त्यांनी असेही मांडले की, इतस्तत: विखुरलेले तारे कालांतराने जास्त घनता असलेल्या ताऱ्यांच्या गटांकडे त्यांच्या आकर्षणशक्तीप्रमाणे ओढले जातात आणि त्यामुळे ताऱ्यांचे समूह अथवा गुच्छ तसेच नेब्यूले बनतात. ही संकल्पना 19 व्या शतकातील खगोलशास्त्रीय पुस्तकांमध्ये बहुचर्चित होती.
हर्षेल यांनी आकाशगंगेचा (Milky way) देखील पद्धतशीर अभ्यास व निरीक्षणे केली. त्यापूर्वी गॅलिलिओने 1609 सालीच आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे आहेत, हे मांडले होते. हर्षेल यांनी आकाशगंगेच्या रचनेबद्दल अभ्यास करून मांडले की, स्वर्गातील अब्जावधी तारे या आकाशगंगेत गोलाकार फुगीर भिंगसदृश रचनेप्रमाणे वसलेले आहेत. तसेच आकाशगंगेतील ताऱ्यांचे पुंजके नमुना पद्धतीने मोजून आकाशगंगेत 10 कोटी तारे असावेत, असा अंदाज त्यांनी मांडला. अशा प्रकारे तारे व तारकापुंज यांच्या अभ्यासातून त्यांनी नक्षत्रीय खगोलशास्त्र या उपशाखेचा पाया घातला. या व्यतिरिक्त चंद्रावरील पर्वतांची उंची किती असावी याचा अंदाज देखील सूक्ष्ममापकाचा (Micrometer) वापर करून त्यांनी बांधला. चंद्रावरदेखील जीवन असणार अशी त्यांची कल्पना होती. बुध, शुक्र, मंगळ, गुरू व शनि या ग्रहांचा देखील त्यांनी अभ्यास केला. युरेनसच्या दोन चंद्रांचे अस्तित्वदेखील त्यांनी सिद्ध केले. तसेच रंगीत काचांपासून सूर्याकडे बघताना त्यांच्या लक्षात आले की, सूर्यप्रकाशातील उष्णता ही फक्त दृश्य प्रकाशलहरींशी निगडित नसते. या आधारावर तापमापक व लोलक यांच्या साहाय्याने सूर्यकिरणांचा अभ्यास करून त्यांनी (Infra-red) या अदृश्य प्रकाश किरणांच्या अस्तित्वाची कल्पना मांडली.
अशा प्रकारे खगोलशास्त्रात कळीचे संशोधन करून अनेक पारितोषिके व किताब मिळवून वयाच्या 84 व्या वर्षी हर्षेल मरण पावले. त्यांच्या खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा वारसा त्यांचा मुलगा जॉन हर्षेल यांनी पुढे चालवला. जॉनदेखील एक नावाजलेले खगोलशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. येथे नमूद करणे आवश्यक आहे की विलियम हर्षेल यांची बहीण कॅरोलिना यांची हर्षेल यांना फारच मदत झाली. 1772 पासून त्या त्यांच्यासोबत राहून त्यांना अनमोल सहकार्य करत होत्या. क्लिष्ट गणिती सूत्रे व आकडेमोड तर त्या करत असतच, शिवाय आकाश निरीक्षणे करून कॅरोलिन यांनी स्वत:च आठ धूमकेतू व काही नेब्यूलांचा शोध लावला. हर्षेल यांच्या मृत्यूनंतर त्या बरीच वर्षे जगल्या. आणि वयाच्या 94 व्या वर्षी मरण पावल्या. 1864 मध्ये प्रशियाच्या राजाने त्यांना विज्ञान संशोधनाबद्दल सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते.