Menu

चार्लस लायेल

(Charles Lyell)

जन्म: १४ नोव्हेंबर १७९७.
मृत्यू: २२ फेब्रुवारी १८७५.
कार्यक्षेत्र: भूगोल.

चार्लस लायेल
Charles Lyell
स्कॉटिश भूशास्त्रज्ञ
जन्म: 14 नोव्हेंबर, 1797
मृत्यू: 22 फेब्रुवारी, 1875

उत्क्रांतीवादाचा जनक डार्विन जेव्हा ‘बीगल’ या जहाजातून आपल्या क्रांतिकारी जगप्रवासाला निघाला तेव्हा “भूशास्त्राची तत्त्वे“ या शीर्षकाच्या ग्रंथाचा एक वर्षापूर्वीच प्रसिध्द झालेला पहिला खंड त्याने बरोबर घेतला होता. प्रवासात या ग्रंथाचा डार्विनने नुसताच सखोल अभ्यास केला असे नाही तर त्यात मांडलेल्या भूशास्त्रीय संकल्पना सिध्द करणारा पुरावादेखील त्याने गोळा केला. या अनमोल ग्रंथाचा लेखक होता, त्या काळातील अग्रेसर भूशास्त्रज्ञ चार्लस लायेल.
स्कॉटलंडमधील अॅगस परगण्यात, स्कॉटिश वडील व इंग्रज आईच्या पोटी जन्मलेला चार्लस, वयाच्या दहाव्या वर्षी आजारी पडला आणि त्यामुळे काही महिने तो शाळेत जात नव्हता. त्याच काळात त्याला विविध कीटक पकडून ते संग्रह करण्याचा नादच लागला. छोट्या चार्लसचे वडीलदेखील एक हौशी वनस्पती शास्त्रज्ञ होते. त्यांना दुर्मिळ वनस्पती गोळा करण्याचा छंद होता. अशा प्रकारे निसर्ग प्रेमाचे बाळकडू मिळालेल्या चार्लस लायेल ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एक्झीटर कॉलेजमधून जरी कायदे शिक्षण घेऊन बाहेर पडले होते तरी त्यांना आवड होती ती निसर्गविज्ञानाचीच. ऑक्सफर्डमध्ये असतानाच त्यांनी तेथील जिऑलॉजिकल सोसायटीचे सदस्यत्व घेतले होते. त्यामुळे नंतरदेखील वकिली करण्याऐवजी त्यांनी भूशास्त्राच्या अभ्यासाकडे आपला मोर्चा वळवला.
त्या काळी परमेश्वरनिर्मित विश्व आणि नंतर झालेला प्रलय या बायबलवर आधारित कल्पना प्रचलित होत्या. पृथ्वीच्या निर्मितीबद्दल विचारवंतांमध्येदेखील दोन गट होते. एकाचे मत होते की, प्रचंड प्रलय झाल्यानंतर जेव्हा पृथ्वी पाण्यात बुडालेली होती तेव्हाच पाण्याखाली पृथ्वीला आकार आला. या ‘जलवादी’ कल्पनेला घेतलेला आधार म्हणजे समुद्रात असणारे गाळाचे (Sedimentary) खडक. पाण्याच्या दाबामुळे पृथ्वीवर खडकांचे आवरण झाले, अशी त्यांची कल्पना होती. परंतु या कल्पनेतून अग्निजन्य खडक कसे आले, याचे उत्तर मिळत नव्हते. म्हणूनच दुसरा ‘ज्वालामुखी’वादी गट म्हणत होता की, पृथ्वीवर सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत होते; त्यामुळे तेथे संपूर्ण नाश आणि नंतर पुनर्निर्मिती यांचे चक्र चालू होते. परंतु, या मताला फारशी मान्यता मिळाली नाही. कारण त्यातून पृथ्वी शेवटी तयार कशी झाली ते मांडले जात नव्हते. अशा प्रकारे ‘जलवादी’ लोकांची प्रलयाची संकल्पना भूशास्त्रज्ञांमध्ये बहुतांशी दृढ होती.
लायेल यांनी 1820 मध्ये भूशास्त्रीय अभ्यासाद्वारे चुनखडीचे खडक कसे तयार होतात, यावर शोधनिबंध लिहिला. नंतर त्यांनी स्कॉटलंड, फ्रान्स इ. ठिकाणी तेथील खडक व भूस्तरांचा अभ्यास केला आणि आपल्या महान ग्रंथाच्या लिखाणाला सुरुवात केली. त्या काळात उपलब्ध असलेल्या भूशास्त्रीय पुराव्याचे वैज्ञानिक पायावर विश्लेषण करून 1830 ते 1833 या तीन वर्षांच्या कालखंडात त्यांनी भूशास्त्राची तत्वे हा तीन खंडांचा ग्रंथ लिहिला. यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीचा भूस्तर कसा निर्माण झाला, याचे उत्तम विवेचन करून पारंपरिक ‘प्रलयप्रणित पृथ्वी-निमिर्तीची’ संकल्पना त्यांनी निकालात काढली. त्यांच्या मते, भूशास्त्रीय तत्त्वे भक्कम पायावर उभी राहण्यासाठी जनसामान्यांतील प्रस्थापित पारंपरिक मिथ्थ्यांवर आधारित कल्पना नष्ट करणे आवश्यक असते.
प्रकाशनानंतरच्या चार दशकात लायेल यांच्या या ग्रंथांच्या अकरा आवृत्या प्रकाशित झाल्या आणि प्रत्येक आवृत्ती त्या त्या काळापर्यंत ज्ञात असलेल्या भूशास्त्रीय माहितीने अद्ययावत केलेली होती. या ग्रंथाने डार्विन फारच प्रभावित झाला आणि आपल्या बीगल जहाजाच्या सफरीनंतर इंग्लंडला परत आल्यावर दोघे जिवलग मित्र झाले. डार्विनने ‘बीगलचा प्रवास’ हे आपले पुस्तक लायल यांना अर्पण केले. “पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या निसर्गनियमांनी नियंत्रित झालेल्या भौतिक घटना आहेत,” ही मूलभूत संकल्पना लायेल यांनादेखील पटली होती. लायेल यांच्या मते वाळूंची वादळे, हिमवादळे, प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे होणारी धूप व अशा प्रकारच्या नैसर्गिक घडामोडी, ज्या आजदेखील अस्तित्वात आहेत, त्या पुरातन काळीदेखील पृथ्वी आणि त्यावरील जीवनांच्या जडणघडणीस कारणीभूत होत्या. पृथ्वीच्या वर्तमानाची सखोल वैज्ञानिक चिकित्साच आपल्याला भूतकाळाबद्दल ज्ञान प्राप्त करून देते. जमिनीखाली सापडणारे विविध प्रकारचे जीवाश्म हे या कल्पनेचे उत्तम उदाहरण आहे.
लायेल उच्चप्रतीचे वैज्ञानिक तसेच एक मानवतावादी म्हणून देखील ते नावाजले गेले. लंडनमधील बेघर लोक आणि निराधार वृध्द यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेऊन अनेक समाजसेवी गट स्थापले. त्यांचे संशोधन व समाजकार्य यांच्यामुळे इंग्लंडच्या राजाने लायेल यांना नाईटहूड आणि बॅरोनेट हे किताब दिले.