Menu

अल्बर्ट आईनस्टाईन

(Albert Einstein)

जन्म: १५ मार्च १८७९.
मृत्यू: १८ एप्रिल १९५५.
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्र.

अल्बर्ट आईनस्टाईन
Albert Einstein
जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
जन्म: 15 मार्च, 1879
मृत्यू: 18 एप्रिल, 1955

मानवतावादी, समाजामुख शास्त्रज्ञ

1905 साली भौतिकशास्त्राच्या जर्मन नियतकालिकाने तीन शोधनिबंध प्रसिध्द केले. या संशोधनाने विज्ञान जगतात प्रचंड खळबळ उडाली. या शोधांचा जनक, अल्बर्ट आईनस्टाईन त्यावेळी अवघ्या सव्वीस वर्षांचे होते.
त्यांचा एक निबंध होता प्रकाशविद्युतीय परिणाम (Photoelectric effects), दुसरा होता ब्राऊनियन गतिविषयक आणि तिसरा होता गतिमान वस्तूची विद्युतगतिकी (Electrodynamics of moving bodies). यातील प्रत्येक शोधाला नोबेल पारितोषिक मिळू शकले असते. 1921 साली आईनस्टाईन यांना मिळालेले ‘नोबेल’ त्यांच्या ‘प्रकाशविद्युतीय परिणाम’ या शोधासाठी होते. त्यांच्या तिसऱ्या निबंधात त्यांनी सापेक्षतेच्या विशेष सिध्दांताची संकल्पना मांडली होती. हा सिध्दांत भौतिकशास्त्राला क्रांतिकारक कलाटणी देणारा ठरला. कारण न्यूटनप्रणित रूढ यांत्रिकीतून (Classical mechanics) काही प्रश्नांची स्पष्टीकरणे मिळत नव्हती. त्यांची स्पष्टीकरणे या शोधाने देता येणे शक्य झाले. आईनस्टाईन यांनी एवढेच साधले नव्हते तर सभोवतालच्या विश्वाविषयीच्या माणसांच्या दृष्टिकोनात आमूलाग्र परिवर्तन घडविले होते. शिवाय, त्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी भौतिकवादी मांडणीला भक्कम आधारही प्राप्त झाला.
असा एक गैरसमज होता की, आईनस्टाईन यांनी न्यूटनचे गतिविषयक नियम चुकीचे ठरविले. विज्ञानाला विरोध करणारे लोक हा पुरावा देऊन विज्ञान काही खरे नाही, ते परस्परविरोधी विधाने करते, बदलत असते, असा प्रचार करतात. परंतु सत्य हे आहे की, दैनंदिन व्यवहारात न्यूटनचे नियम वैध आहेत आणि भौतिकशास्त्राच्या व तंत्रज्ञानाच्या प्रगतीला त्यांचा प्रचंड उपयोग झाला आहे. आईनस्टाईन यांनी गतिमान वस्तू जेव्हा प्रकाशाच्या वेगाइतका (दर सेकंदाला 3 लाख कि.मी. किंवा त्याच्या जवळपास) वेग प्राप्त करेल तेव्हा न्यूटनच्या नियमांत परिवर्तन करून पण ते सामावून घेऊन सर्व तऱ्हेच्या वेगांना लागू पडेल अशी संकल्पना मांडली. न्यूटनचे नियम चूक न ठरवता नेमकेपणाने केव्हा व कोणत्या मर्यादेत लागू पडतात हेही त्यातून निश्चित झाले. जुन्या ज्ञानाकडे नवीन दृष्टीने पाहणे व जरूर तेथे बदल करणे हेच तर विज्ञानाच्या प्रगतीचे, यशाचे गमक आहे.
अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म जर्मनीतील उल्म या लहान शहरात झाला. त्यांचे वडील छोटे उद्योजक होते. अल्बर्ट लहान असतानाच त्यांनी म्युनिच शहरात स्थलांतर केले. अल्बर्ट यांना तीन वर्षांपर्यत धड बोलतासुध्दा येत नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी शाळेत प्रवेश घेतला. हायस्कूलमध्ये त्यांनी गणितात व लॅटिन भाषेत चांगली प्रगती केली. पण त्यांना शाळा आवडत नसे. शाळेतील छडीशाही, हडेलहप्पी, घोकंपट्टीवर भर देऊन विचारशक्ती मारणारी शिक्षणपद्धती याविरूद्ध त्यांचे बालमन बंड करून उठे. त्यामुळे ते स्वतंत्र्यपणे एकटे-एकटेच राहत. बहुसंख्य विद्यार्थ्यांप्रमाणे मेंढरांधराळेपण व पठडीबध्द विचार-चौकटीच्या सापळ्यात अल्बर्ट अडकले नाहीत. त्यांची सर्जनशीलता मारली गेली नाही. त्यांचे काका त्यांना रंजक गणिती कोडी घालत. ती सोडण्यातून त्यांना गणिताविषयी मोठी गोडी निर्माण झाली. लहानपणीच ते व्हायोलिन शिकले व त्यांची वादनाची आवड कायम राहिली.
1895 साली आईस्टाईन यांनी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील तंत्रनिकेतनात प्रवेश घेतला. 1900 मध्ये पदवीचे शिक्षण झाल्यावर तेथील प्राध्यापकांकडे सहाय्यकाची नोकरी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तेव्हा नाईलाजाने त्यांनी पेटंट कार्यालयातील तपासनिसाची नोकरी पत्करली. नोकरीतून मिळणारा मोकळा वेळ सत्कारणी लावून आईनस्टाईन संशोधन कार्यात व्यग्र झाले. 1903 साली त्यांनी सांख्यिकी यामिकीचा पायाभूत शोधनिबंध प्रसिध्द केला व 1905 साली प्रारंभी उल्लेखलेले क्रांतिकारक सिध्दांत प्रकाशित केले. 1909 साली ते झुरिच नंतर प्राग पुन्हा झुरिच आणि 1914 पासून ते बर्लिनला प्राध्यापक झाले. त्यांच्या संशोधनाची खोली व व्याप्ती फार मोठी आहे.
आईनस्टाईन अग्रगण्य शास्त्रज्ञ होते त्याचप्रमाणे ते समाजभिमुख थोर विचारवंत होते. त्यांच्या मानवतावादी-शांततावादी भूमिकेमुळेच त्यांना जर्मनीमध्ये खडतर जीवनाला तोंड द्यावे लागले. 1914 सालापासून ते बर्लिनला प्रशियन ‘अॅकॅडमी ऑफ सायन्स’मध्ये प्राध्यापक होते. हा काळ जर्मनीचे क्रूर जागतिक आक्रमण व मानवी हत्याकांडाच्या थैमानाचा होता. युद्धानंतर वाढीला लागलेल्या नाझीवादाला त्यांनी उघडपणे विरोध व्यक्त केला होता. 1933 साली हिटलरने सत्ता ताब्यात घेतली तेव्हा आईनस्टाईन व्याख्यानासाठी अमेरिकेला गेलेले होते. नाझींनी आईनस्टाईन यांच्या घरात घुसून त्यांचे ग्रंथालय उध्वस्त केले, बँक खाते जप्त केले. आईनस्टाईन ज्यू असल्याने ‘ज्यू-विज्ञान’ म्हणून त्यांच्या संशोधनाचीही बदनामी सुरू झाली. फॅसिझमच्या निषेधार्थ जर्मन नागरिकत्व सोडून ते 1933 साली अमेरिकेत स्थायिक झाले व त्यांनी प्रिस्टनला संशोधकपद स्वीकारले. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात जर्मन अणूबॉम्बच्या धास्तीने अमेरिकेने प्ररोधक बॉम्ब बनवावा या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला; पण जेव्हा आईनस्टाईन यांनी ज्याला ‘लोकशाही मानणारा देश’ मानले त्या अमेरिकेचा जपानविरूध्द अणुबॉम्बचा वापर करण्याचा डाव त्यांना कळला तेव्हा अत्यंत व्यथित होऊन अणुबॉम्बनिर्मिती थोपविण्याच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना त्यांनी मदत केली. पण व्यर्थ! सत्ताधाऱ्यांच्या हातात बॉम्बच्या चाव्या गेलेल्या होत्या. जपान शरणगतीच्या मार्गावर असूनही 6 व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले. अण्वस्त्रबंदी व जागतिक शांततेचे आईनस्टाईन कडवे पुरस्कर्ते होते. ते म्हणत, “युध्द जिंकता येते, शांतता नाही.” आईनस्टाईन महान शास्त्रज्ञ होते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व निगर्वी, साधे, मनमिळावू आणि त्यांची जीवनदृष्टी लोकशाही व मानववादी असल्यामुळे ते लोकप्रियही होते.
स्वत:च्या सैध्दांतिक भौतिकशास्त्रापलीकडे जाऊन ते मानवी समाजाच्या विकासातील विज्ञानाच्या व्यापक परिणामांबद्दल सतर्क होते. त्यांनी लिहिले आहे, “उत्पादनाच्या यांत्रिकीकरणामुळे आणि अनियोजित अर्थव्यवस्थेमुळे मानवी समाजाचा एक फार मोठा हिस्सा उत्पादनाबाहेर व परिणामी अर्थव्यवस्थेबाहेर लोटला गेला आहे. साहजिकच त्यांची क्रयशक्ती क्षीण झाल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. उत्पादन साधनांच्या मालकी हक्कात अशी एक सत्ता अंगभूत आहे की, सध्याच्या राजकीय पध्दतीतून त्यावर अंकूश लावता येणार नाही. तंत्रज्ञानाने अंतरे कमी केली व विनाशाची नवी अस्त्रे निर्माण केलेली आहेत. दळणवळणाची व प्रसारणाची माध्यमे व त्यांच्या जोडीला विनाशकारी अस्त्रे यामुळे मानवी शरीर व मन एखाद्या बलवान राष्ट्राच्या अंकीत होण्याचा धोका आहे. आधुनिक जुलुमशाही व त्याचे हानीकारक परिणाम पाहता, विज्ञानाने दिलेल्या साधनांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करण्यापासून आपण अजूनही किती दूर आहेत, हे लक्षात येते. विज्ञानाने मानवी जीवन समृध्द करण्यासाठी तंत्रज्ञान दिले पण त्याबरोबरच अनियंत्रित तंत्रज्ञानामुळे मानवापुढे गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत आणि या समस्यांचे समाधानकारक निरसन झाले नाही तर मानवजात नष्ट होईल. हे होऊ द्यायचे नसेल तर वेगळ्या सामाजिक रचनेची आणि परंपरांची निर्मिती करावी लागेल.” यासाठीच ते समान, न्याय्य व शोषणमुक्त अशा समाजवादी समाजरचनेच्या बाजूने ठामपणे उभे होते.
21 व्या शतकात पाऊल टाकल्यावर, अण्वस्त्रांचा वाढता प्रसार व धोका ही आईनस्टाईन यांनी 50 वर्षांपूर्वी व्यक्त केलेली भीती आणि एका बलवान राष्ट्राची-अमेरिकेची जगतव्यापी आर्थिक-सांस्कृतिक हुकुमत प्रस्थापित झाली असताना आईनस्टाईन यांच्या विचारांना उजाळा देण्याची विशेष निकड आहे.