जन्म: ०६ मे १८४२.
मृत्यू: २८ जनेवारी १९१६.
कार्यक्षेत्र: हवामानशास्त्र.
अलेक्सांदर वोईकोफ्
Alexander Ivanovich Wojeikov
रशियन हवामानशास्त्रज्ञ
जन्म: 6 मे, 1842
मृत्यू: 28 जानेवारी, 1916
हवामानाचे कोडे उलगडणारा शास्त्रज्ञ
एक चक्रम विद्वान म्हणून वोइकोफ पीटसबर्गमध्ये प्रसिद्ध होते. विद्यापीठातला हा प्राध्यापक सरळ अनवाणी भटकायचा, ऐन हिवाळ्यात (तापमान शून्यखाली 20 अंश से.) हिवाळी कोटाशिवाय वावरायचा, शाकाहाराचे समर्थन करून शाकाहार घ्यायचा. निसर्गाशी तो समरस झालेला होता. सूर्यकिरणांची उष्णता, मातीची ऊब, सृष्टीची सारी फळे त्याला वेडावून टाकत. आयुष्यभर निरनिराळ्या नैसर्गिक चलनवलनाचा वेध घेण्याच्या धडपडीत होता. हवामान हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. लाखो लोकांचे भवितव्य ठरवणाऱ्या हवामानाचे स्वरूप काय असते? काही वर्षे अवर्षणाची का येतात? या नैसर्गिक चलनवलनातून विज्ञानाच्या आधारे माणसाला मार्ग काढता येईल का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात ते गुंतले होते.
वोइकफ यांचा जन्म मॉस्कोचा. आई व वडील लहानपणीच वारल्याने ते मामाकडे वाढले. 1860 मध्ये त्यांनी पीटसबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला. पण विद्यार्थी असंतोषामुळे विद्यापीठ बंद ठेवले गेल्याने जर्मनीत हायडेलबर्ग व गएटिंगेन येथे त्यांनी उच्चशिक्षण पुरे केले व 1866 मध्ये रशियाला परतले. हवामानावर संशोधन करण्यासाठी त्या काळात अनुदान मिळणे शक्य नव्हते. मॉस्कोजवळचा आपला जमीनजुमला विकून वोईकोफ हवामानविषयक माहिती गोळा करायला जगप्रवासाला निघाले. आपली पुस्तके, पत्रव्यवहार, व्याख्याने, चर्चा, सभा, प्रवास, निसर्ग आणि लोक यांतच ते जगले. कौटुंबिक कोषात कधीच शिरले नाहीत. 1991 मध्ये वोल्गा खोऱ्यात भीषण दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी आपली उरलेली बहुतेक संपत्ती दुष्काळग्रस्त जनतेचे प्राण वाचवण्यासाठी खर्ची घातली. जनसामान्यात ते इतके गुंतलेले असत की आपले असे वेगळे ‘मी’पण शिल्लकच राहत नसे. स्वत:च्या खर्चाने भ्रमंती आणि लोकांचे सहकार्य यावर त्यांचे संशोधन सर्वस्वी अवलंबून होते. मध्य आशियातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी डोंगर पालथे घातले, वाळंवटातला खडतर प्रवास केला.
कोणत्याही देशातले हवामान हे विस्तृत भूप्रदेशावरील वातावरणातील चलनवलनावर अवलंबून असते, याबाबत त्यांना सखोल जाण होती. गल्फ प्रवाह युरोपातील हवामानावर परिणाम करतो. गल्फ प्रवाहामुळे आर्क्टिक समुद्रात जलप्रवास करण्यासाठी मार्ग उपलब्ध होईल, हे त्यांचे भाकित अचूक ठरले. पॅसिफिक समुद्र आणि मध्य आशियातील भूभागावर निरनिराळ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या हवेचे चलनवलन मान्सूनला पायाभूत असते. उन्हाळ्यात मंगोलियातली वाळवंटे व गवती मुलुख तापतो व हवा विरळ बनते. पॅसिफिक महासागरावरून वारे तिकडे खेचले जातात व बरोबर उन्हाळी मान्सून आणतात. मान्सूनबाबतच्या सिध्दांतात पुढे अनेक तपशील भरले गेले. पण त्यांची मूलभूत मांडणी पथदर्शक होती.
वोइकोफ यांचे महत्वाचे ग्रंथ म्हणजे ‘अॅयमोस्फेतरक सर्क्युलेशन’ (1874) या ग्रंथात त्यांनी प्रथमच हवामानाप्रमाणे जगाचे विभाग पाडले आहेत. या ग्रंथाची गतिशील हवामानशास्त्राच्या विकासास विशेष मदत झाली. ‘विंडस ऑफ द ग्लोब’ (1876) हा ग्रंथ अमेरिकन शास्त्रज्ञ कॉफिन याने गोळा केलेल्या माहिती व विश्लेषणावर आधारित आहे. कॉफिन यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे त्यांचे काम अपुरे राहिले, त्या माहितीचे संकलन व संपादन वोइकोफ यांनी केले. सैध्दांतिक व प्रत्यक्ष उपयोग (नौकानयनासाठी) या दोन्ही दृष्टीने हे पुस्तक अनेक वर्षे प्रमाणभूत ग्रंथ म्हणून वापरात होते. 1884 मध्ये त्यांचा अव्वल ग्रंथ ‘क्लायमेटस् ऑफ द ग्लोब’ हा प्रसिध्द झाला. या ग्रंथात वोइकोफ यांनी हवामानाचे जागतिक चित्र व त्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हवामानाचे घटक किती बहुविध, गुंतागुंतीचे आणि परस्परसंबंधी आहेत आणि त्यासाठी किती प्रचंड निरीक्षणांची आवश्यकता आहे हे त्यातून स्पष्ट होते. त्या काळात पृथ्वीच्या वरच्या थरातील वातावरणाचा अभ्यास करण्याची साधने उपलब्ध नव्हती. बलूनवर स्वयंचलित मापनयंत्रे लावून त्याच्या सहाय्याने माहिती गोळा करावी, असे त्यांनी सुचवले होते. पृथ्वीच्या वरील थरातील तापमान, जमीन व समुद्र या वरील तापमानातील फरकामुळे निर्माण होणारे वारे आणि बर्फाच्छादन या घटकांचे हवामान व मान्सूनमधील महत्व स्पष्ट करून त्यांनी हवामानशास्त्रात मौलिक भर घातली.
1899 मध्ये रशियात मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी आपल्या ‘हवामान व अर्थव्यवस्था’ या लेखात, अनेक वर्षांची आकडेवारी व शास्त्रीय माहिती वापरून त्यांनी दाखवून दिले की, दुष्काळाचे भाकित वर्तवणे शक्य आहे व त्याचे भीषण परिणाम तर निश्चितच टाळता येतील. पण त्यासाठी सिंचनाचा सुयोग्य विकास व वापर, तसेच योग्य मशागत पध्दती वापरल्या पाहिजेत. हे काही छोट्या शेतकाऱ्यांच्या आवाक्यातले नसल्याने सामूहिक योजनांद्वारेच ते शक्य आहे, असे त्यांनी सुचवले होते.
मानवाला हवामानावर नियंत्रण प्रस्थापित करता येईल, असे ते कधीच मानत नव्हते. परंतु, नैसर्गिक प्रतिकुलतचे आपत्तीत रूपांतर होणे हे शास्त्रीय नियोजनाने टाळणे शक्य आहे, असे त्यांचे मत होते. विशेषत: निसर्गाला ओरबाडणारी अदूरदृष्टी बाळगून केवढे नुकसान होते आहे, याकडे ते लक्ष वेधत. अशास्त्रीय नांगरटीमुळे घळी वाढत आहेत, वनस्पती व गवताच्या नाशाने वाळवंट पसरत आहे, जंगलतोडीमुळे झरे आटत आहेत, जमीन शुष्क बनत आहे. हे सर्व टाळणे तर आवश्यक आहेच, पण शास्त्रीय सिंचन व शेतीतील नियोजन केल्यास अवर्षणाचे संकट फारसे गंभीर स्वरूप धारण करणार नाही, असे विचार शंभर वर्षांपूर्वी वोइकोफ यांनी मांडले. परंतु ते विचार अजूनही अमलात आलेले नाहीत. परिणामी, अवर्षणाचे चटके शेतकऱ्यांना अजूनही भोगावे लागत आहेत.