जन्म: ०८ जनेवारी १८२३.
मृत्यू: ०७ नोव्हेंबर १९१३.
कार्यक्षेत्र: निसर्गवैज्ञानिक, जीवशास्त्र.
आल्फ्रेड रसेल वॉलेस
Alfred Russel Wallace
ब्रिटिश निसर्गवैज्ञानिक
जन्म: 8 जानेवारी, 1823
मृत्यू: 7 नोव्हेंबर, 1913
उदार मनाचा उत्क्रांतीवादक
जीवशास्त्रीय सिध्दांतांपैकी एक क्रांतिकारी सिध्दांत म्हणून मानला जातो तो म्हणजे ‘निसर्ग निवडीतून होणारी जीवांची उत्क्रांती’! हा सिध्दांत व त्याचा जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार्ल्स डार्विन यांचे नाते अतूट आहे, हे सर्वजण जाणतात. परंतु डार्विनचा समकालीन आल्फेड वॉलेस यांनीही स्वतंत्रपणे तोच सिध्दांत विकसित केला होता, हे अनेकांना माहीत नसते.
आल्फ्ररेड वॉलेस यांचा जन्म 9 जानेवारी 1823 रोजी इंग्लंडमधील मॉनमॉऊतशायर परगण्यात झाला. वॉलेस यांचे तरूणपण डार्विनप्रमाणेच वेगवेगळे व्यवसाय शोधण्यात गेले. निसर्गविज्ञानाची त्यांना प्रथमपासूनच गोडी होती. 1848 साली ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचे संशोधन करण्यासाठी जाणाऱ्या जहाजावर जाण्याची संधी मिळून त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. चार वर्षे अॅमेझॉनच्या खोऱ्यात पायपीट करून अनेक निरीक्षणे व प्राणी, वनस्पती, दगड इत्यादींचे नमुने गोळा करून वॉलेस परतीच्या प्रवासाला लागले. परंतु, वाटेत जहाजाला आग लागून त्यांनी गोळा केलेला सर्व अमूल्य ठेवा सागराच्या उदरात गडप झाला. नावेच्या मदतीने कसाबसा जीव वाचवून वॉलेस मायदेशी परतले. ब्राझीलमध्ये केलेली निरीक्षणे आणि आलेले अनुभव यांचे आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या मदतीने संकलन करून ते लेखन प्रकाशित केल्यावर त्यांना थोडी प्रसिध्दी मिळाली. दक्षिण अमेरिकेत गोळा केलेल्या नमुन्यांपैकी काही नमुने संग्रहप्रेमी लोकांना विकून, आशिया खंडातील मलायाच्या समुद्रविभागात सफर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण अपघातामुळे ते स्वप्न सागरतळाला गेले. तरीही काही निसर्गप्रेमीकडून कर्ज घेऊन 1954 साली वॉलेस यांनी मलायाच्या व्दीपसमूहाकडे प्रयाण केले. पुढील आठ वर्षे मलेशिया व इंडोनेशियाच्या विविध बेटांचा प्रवास करून त्यांनी कीटक, प्राणी, पक्षी यांचे सव्वा लाखाहून अधिक नमुने गोळा केले. निरीक्षणांवरून त्यांच्या लक्षात आले की, बाली-बोर्नियो बेटांवरील प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या नजिकच्या पूर्वेकडील सेलेबीस आदी बेटांवरील प्राणी जास्त पुरातन होते. बाली-बोर्नियो बेटावर आढळणारे प्रगत प्राणी तेथे नसल्याने पुरातन प्राणी टिकून राहिले, असा निष्कर्ष त्यांनी काढला.
निसर्ग निवडीतून उत्क्रांती: उत्क्रांतीच्या इतिहासाच्या क्रमाचा अर्थ लावण्यासाठी डार्विनप्रमाणे वॉलेस यांनी मालीथसच्या जीवनस्पर्धेच्या सिध्दांताचा आधार घेतला. निसर्ग-निवडीमार्फत होणाऱ्या उत्क्रांतीचा सिध्दांत त्यांना सुचवल्यावर तापाने फणफणलेल्या स्थितीतही झपाटल्याप्रमाणे त्यांनी तो सिध्दांत लिहून काढला व इंग्लंडला डार्विनकडे पाठवला. या सिध्दांतानुसार, सजीवांच्या सर्व जीवजातींमध्ये जिवंत राहण्यासाठी स्पर्धा चाललेली असते. या झगड्यामध्ये ज्या जीवजातींमध्ये सभोवतालच्या विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहण्यायोग्य गुणधर्म असतात, या टिकून राहतात. म्हणजे निसर्ग जगण्यासाठी त्यांची निवड करतो. उत्क्रांतीच्या या क्रमात अनेक जाती नामशेष होतात आणि भौगोलिक व हवामानातील मोठ्या बदलांबरोबर त्यामध्ये तग धरू शकतील अशा जाती उत्क्रांत होतात.
याच वेळी चार्ल्स डार्विन उत्क्रांतीवर काम करत होते. निसर्ग निवडीचा सिध्दांत प्रसिध्द करण्यापूर्वी अभेद्य पुराव्याची तटबंदी ते उभारत होते. कारण विविध जीवजातींची निर्मिती ही ईश्वरी किमया आहे व ईश्वराने हे वनस्पती व प्राणीजीवन इ.स. पूर्व 4404 साली निर्माण केले, अशी बायबलमधील मांडणी होती, आणि बायबलला म्हणजेच धर्मपीठाला आव्हान देणे धाडसाचे होते, म्हणून त्यांनी निसर्ग निवडीची संकल्पना बनवली, तरी ते संशोधन प्रसिध्द केलेले नव्हते.
तेव्हा आता प्रश्न होता की, या सिध्दांताचा अग्रहक्क वॉलेस यांना मिळणार का? परंतु, वॉलेस यांना जेव्हा कळले की, डार्विनने स्वतंत्रपणे अभ्यास करून तीच संकल्पना विकसित केली आहे, तेव्हा वॉलेस यांनी डार्विनच्या सखोल व प्रदीर्घ सिध्दांताला मान देऊन उत्क्रांतीच्या सिध्दांताचा अग्रमान डार्विनना दिला. उत्क्रांतीचा सिध्दांत डार्विन व वॉलेस या दोघांच्या नावाने ‘निसर्गनिवडीतून उत्क्रांती’ म्हणून प्रसिध्द केला. वॉलेस यांनी पुढे पृथ्वीवरील विविध भौगोलिक विभागात प्राण्यांची वाटणी कशी झाली आहे याचा अभ्यास केला. त्यातूनच ‘झूजिऑग्राफी’ (प्राण्यांच्या भूगोलीय वाटणीचे शास्त्र) ही प्राणीशास्त्राची एक शाखा उद्यास आली. वॉलेस यांनी प्राण्यांच्या विभागाची जे विभाग निर्देशले त्यांना ‘वॉलेस विभाग’ असे नाव पुढे देण्यात आले.