Menu

एडमंड हॅले

(Edmund Halley)

जन्म: ०८ नोव्हेंबर १६५६.
मृत्यू: १४ जनेवारी १७४२.
कार्यक्षेत्र: खगोलशास्त्र.

एडमंड हॅले
Edmund Halley
इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ
जन्म : 8 नोव्हेंबर, 1656
मृत्यू : 14 जानेवारी, 1742

चतुरस्त्र खगोलशास्त्रज्ञ

1986 मध्ये आपण हॅलेचा धूमकेतू पाहिला. त्याची माहिती एडमंड हॅले यांनी 1705 मध्ये प्रथम करून दिली. 1703 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात हॅले भूमितीचे प्राध्यापक झाले. धूमकेतूंच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास हा त्यांचा खास संशोधनाचा विषय. 1705 मध्ये त्यांनी आपले धूमकेतूंवरील खगोलशास्त्रीय संशोधन सारांशरूपाने प्रसिद्ध केले. त्यामध्ये 1337 ते 1698 या काळात निरीक्षण केल्या गेलेल्या 24 धूमकेतूंच्या अन्वस्तीय (parabolic) कक्षांचे वर्णन त्यांनी केले होते. 1682 मध्ये दिसलेला धूमकेतू विशिष्ट अशा लंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतो आहे, असे सांगून त्यांनी या कक्षेचे गणित मांडले. 1456, 1531 व 1607 मध्ये दिसलेला धूमकेतू अशाच कक्षेत दिसला होता. यावरून त्यांनी हा धूमकेतू ज्याला हॅलेचा धूमकेतू हे नाव आता दिलेले आहे, दर 75-76 वर्षांनी आकाशात अवतरतो असा शोध लावला आणि त्याप्रमाणे 1758 मध्ये तो पुन्हा अवतरला. पण तो पाहायला हॅले हयात नव्हते.
शालेय जीवनापासून हॅले यांना खगोलशास्त्रात रस होता. एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी केप्लरच्या सिध्दांतावर लिखाण प्रसिद्ध केले. 1676 मध्ये दक्षिण गोलार्धात खगोलशास्त्रीय नोंदी करण्यासाठी ते प्रवासाला निघाले, दक्षिण अटलांटिक महासागरात सेंट हेलेना बेटावर त्यांनी दक्षिण गोलार्धातील पहिली वेधशाळा उभारण्याचे काम केले. 1678 मध्ये इंग्लंडला परतल्यावर त्यांनी 341 ताऱ्यांची माहिती देणारी सारणी (catalogue) प्रसिद्ध केली व ‘दक्षिणेचे टायको’ म्हणून ते मान्यता पावले.
ग्रहांच्या भ्रमणाचे यांत्रिक गतीवर आधारित स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न हॅले, हूक व रेन हे तिघे शास्त्रज्ञ करत होते. दोन ग्रहांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात त्यांच्यामधील आकर्षणाचा जोर कमी होतो, असे गणित हॅले यांनी केलेले होते. परंतु, निरीक्षणातून दिसणाऱ्या ग्रहांच्या प्रत्यक्ष भ्रमणाशी ताळमेळ बसेल अशा कक्षेचे गणित यावरून मांडणे त्यांना जमत नव्हते. 1684 मध्ये हॅले व त्यांचे मित्र गणिततज्ज्ञ आयझॅक न्यूटन यांना भेटायला गेले होते. यावेळी न्यूटननी त्यांना सांगितले की, ही समस्या त्याने पूर्वीच सोडवली होती. ग्रहांच्या भ्रमणाची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार धरली की गणित बरोबर येते. पण हे सिद्ध करणारी सगळी आकडेमोड केलेले कागद न्यूटननी हरवले होते. हॅले यांनी न्यूटनना त्यांच्या या शोधाचे मोल पटवून देऊन तो विस्तृत स्वरूपात मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले व परिणामी न्यूटननी ग्रहगोलांच्या गतिशास्त्रावरचा त्यांचा ‘प्रिन्सिपिया’ हा अजरामर ग्रंथ लिहिला. हॅले यांनी हा ग्रंथ छापून प्रसिद्ध व्हावा याकरता स्वत:चे पैसे खर्च केले. प्रूफे तपासली व 1678 मध्ये ‘प्रिन्सिपिया’चे प्रकाशन झाले.
निरीक्षणातून मिळालेली माहिती व आकडेवारी काही एका अर्थपूर्ण सूत्रात गुंफण्याची विशेष क्षमता हॅले यांच्याकडे होती. 1686 मध्ये त्यांनी समुद्रावरील वाऱ्यांची स्थिती दाखवणारा नकाशा तयार केला. जगातला प्रसिद्ध झालेला तो पहिला वातावरणशास्त्रीय आलेख-तक्ता होता. 1693 मध्ये त्यांनी ब्रेस्लो शहरासाठी त्यांनी मृत्यूसारणी (mortality tables) बनवली. लोकसंख्येतील वयोमान व मृत्यू यांचा संबंध दाखवण्याचा तो पहिला प्रयत्न होता. जीवन-विमा व्यवसायात आवश्यक असणारे शास्त्रशुद्ध तक्ते हॅले यांच्या या प्रयत्नांच्या आधारावर पुढे बनवले जाऊ लागले. 1701 मध्ये त्यांनी अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या क्षेत्राचे चुंबकीय आलेख-तक्ते प्रसिद्ध केले. नौकानयनासाठी या तक्त्यांचे फार मोठे मोल होते.
1716 मध्ये त्यांनी सूर्यबिंबावरून शुक्र ग्रहाच्या होणाऱ्या संक्रमणाच्या निरीक्षणांच्या साहाय्याने पृथ्वीवरील भिन्न स्थळावरून पाहताना पडणारा सूर्याच्या स्थानातील भेद (सोलर पॅरॅलॅक्स) नेमकेपणाने निश्चित करण्याच्या पद्धतीची मांडणी केली. यामुळे सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजणे शक्य झाले.
खगोलशास्त्रात हॅले यांनी मोलाची भर घातली. तोपर्यंत ग्रीक खगोलशास्त्राला अनुसरून असे मानले जात असे की, आकाशाच्या घुमटाला तारे घट्ट बसवलेले असून ते स्थिर आहेत. हॅले यांनी प्रथमच ही समजूत चुकीची असून तारे गतिमान असतात असे सांगितले. 1718 मध्ये त्यांनी हे सिद्ध करणारी निरीक्षणे प्रसिद्ध केली. त्यांनी दाखवून दिले की, सीरियस, प्रोसियॉन, आरकटुरस या सगळ्यात तेजस्वी ताऱ्यांचे आकाशातील स्थान ग्रीक काळापासून बऱ्याच प्रमाणात बदलले आहे. दीडशे वर्षांपूर्वी खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राह याने नोंदवलेल्या स्थानामध्येही काहीसा बदल झाला आहे. तेव्हा तारे गतिमान आहेत. परंतु, पृथ्वीपासून त्यांचे अंतर परार्धो मैल असल्याने त्यांचे स्थानांतर प्रदीर्घ काळानंतर जाणवते. हॅले यांची चतुरस्त्र प्रतिभा, विज्ञानाच्या व्यवहारातील उपाययोजनांविषयीची आस्था व न्यूटन यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ते शेवटपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या साऱ्यांमुळे त्यांचे आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या उदयाचे एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणून स्थान आहे.