जन्म: इसविसनपूर्व ०२७६.
मृत्यू: इसविसनपूर्व ०१९४.
कार्यक्षेत्र: भूगोल, खगोलशास्त्र.
इरॅतोस्थिनीस
Eratosthenes
ग्रीक भूगोल व खगोलशास्त्रज्ञ
जन्म: इ.स.पूर्व 276 ,
मृत्यू: इ.स.पूर्व 194
अष्टपैलू शास्त्रज्ञ
इरॅतोस्थिनीस हे इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील प्रसिद्ध ग्रीक शास्त्रज्ञ. त्यांचे शिक्षण अथेन्समध्ये झाले. त्यांचे विद्वत्तापूर्ण लिखाण पाहून तिसरा टोलेमी राजाने त्यांना अलेक्झांड्रियाच्या जगप्रसिद्ध ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून पाचारण केले. त्या वेळच्या ज्ञात जगताचा पहिला भौगोलिक नकाशा त्यांनी बनवला. त्यामध्ये ब्रिटिश बेटांपासून श्रीलंकेपर्यंत व कॅप्सियन समुद्रापासून इथिओपियापर्यंतचा प्रदेश समाविष्ट होता. तारामंडळाचांही नकाशा त्यांनी बनवला. त्यामध्ये 675 ताऱ्यांचा समावेश होता. सूर्याच्या भासमान भ्रमणाच्या पातळीशी पृथ्वीच्या अक्षाचा असणारा कोन म्हणजे क्रांतिवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांच्यामधला कोन त्यांनी जवळपास अचूक मोजून काढला होता. कालगणना अचूक होण्यासाठी त्या वेळच्या प्रचलित इजिप्शियन सौर वर्षात चार वर्षांनी एक दिवस वाढवावा असे त्यांनी सुचवले. परंतु ही तर्कशुद्ध सूचना सनातन्यांनी त्या काळात मान्य केली नाही.
इ. स. पूर्व 240 च्या सुमारास पृथ्वीचा परीघ 25,000 मैल असल्याचा जवळपास अचूक अंदाज त्यांनी शास्त्रीय पद्धतीने, गणिती आकडेमोड करून मांडला. उन्हाळ्यातील अयन दिवशी, म्हणजे 21 जूनला, इजिप्तमधील साईनी या गावी मध्यान्हीचा सूर्य अगदी डोंगरावर असतो व त्यामुळे वस्तूची सावली पडत नाही, पण अलेक्झांड्रिया या गावी मात्र सूर्यकिरण 7।। अंशाने तिरके पडतात व त्यामुळे वस्तूची विशिष्ट लांबीची सावली पडते, हे निरीक्षणांवरून इरॅतोस्थिनीस यांच्या लक्षात आले. हा फरक पृथ्वीचा पृष्ठभाग वक्र असल्यामुळे पडतो आहे हे उघडच होते. (त्या काळी ग्रीक शास्त्रज्ञांचा पृथ्वी गोल आहे हे ज्ञान होते.) इरॅतोस्थिनीस यांना या दोन गावांमधले अंतर ठाऊक होते. एवढ्यावरून पृथ्वीचा परीघ काढणे सहज शक्य झाले. परीघाचा अचूक आकडा व इरॅतोस्थिनीसचा आकडा यात फक्त एक टक्का फरक आहे. परंतु, त्या काळात पृथ्वीचा थोडाच भाग ज्ञात असल्यामुळे पृथ्वीची व्याप्ती एवढी मोठी आहे हे पटणे कठीण होते. उर्वरित भागात समुद्र असेल असे इरॅतोस्थिनीस यांनी मांडले. पृथ्वी प्रदक्षिणा करून त्याची सत्यता तपासणे त्या काळात शक्य नव्हते. त्यामुळे इरॅतोस्थिनीस यांचा निष्कर्ष अचूक असूनही त्या काळात त्याला मान्यता मिळू शकली नाही. इ. स. पूर्व 100 मध्ये पॉसिडोनस या ग्रीक खगोलशास्त्रज्ञाने आकडेमोड करून पृथ्वीचा परीघ 18,000 मैल असल्याचे सांगितले व तोच आकडा पुढे मान्यता पावला. कोलंबसच्या काळीदेखील पृथ्वीचा परीघ 18,000 मैल मानला गेला होता व आपण 3000 मैल पश्चिमेला सफर केली की आशियात पोहचू, असे त्याला वाटत होते. खरा आकडा माहीत असता तर कोलंबस कदाचित त्याच्या साहसी सफरीवर निघालासुद्धा नसता. पुढे इ. स. 1520-21 मध्ये मजेलनने संपूर्ण जगप्रदक्षिणा केल्यानंतर इरॅतोस्थिनीस यांचाच आकडा अचूक असल्याचे सिद्ध केले.
इरॅतोस्थिनीस हे महान गणिती, खगोलशास्त्रज्ञ व भूगोलतज्ञ तर होतेच, पण अष्टपैलू विद्वान म्हणून त्याची ख्याती होती. त्यांनी अनेक ग्रीक नाटकांची समीक्षणे, अनेक खंडकाव्ये व शोकगीते लिहिली. ट्रॉयच्या युद्धापासूनच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक घटनांचा कालनिर्णय करताना लीप वर्ष त्यांनी लक्षात घेतले होते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानावरचे त्यांचे भाष्य अद्वितीय समजले जाते.
इरॅतोस्थिनीस यांनी काटेकोर निरीक्षणे व गणिती पद्धतीचा वापर करून आपले सिद्धांतन केले. त्याचा पडताळा पाहणे त्या काळात शक्य नसले तरी शास्त्रीय पद्धतीमुळे ते आज अचूक निघाले. त्यांची मते त्या काळातील विचारांच्या फार पुढे असल्याने त्यांचा सनातन्यांकडून स्वीकार झाला नाही. पण एक महान ग्रीक शास्त्रज्ञ म्हणून त्याचे स्थान मोठे आहे.