जन्म: ०७ नोव्हेंबर १८६७.
मृत्यू: ०४ जुलै १९३४.
कार्यक्षेत्र: रसाशनशास्त्र.
मारी स्कोदोव्स्का क्यूरी
Madame Marie Curie
पोलिश – फ्रेंच रसाशनशास्त्रज्ञ
जन्म : वार्सा, पोलंड, 7 नोव्हेंबर 1867
मृत्यू : ओत सहवॉं, फ्रान्स, 4 जुलै 1934
प्रवासाचा तिसरा दिवस ! पोलंड मागे टाकून गाडी पॅरीसकडे धावत होती. मारी स्कोदोव्स्का उच्च शिक्षण पुरे करण्याच्या निग्रहाने पॅरीसमध्ये पोचली आणि सोबोर्न विद्यापिठात दाखल झाला. वार्साला उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते, पॅरिसला राहण्याची ऐपत नव्हती तरी जिद्दीने पाव-चहावर भागवत मारी अभ्यासात गढली. 1891-93 मध्ये पदवी शिक्षण पुरे करून ती लिपमन प्रयोगशाळेत कामाला लागली. प्रसिद्ध पदार्थ शास्त्रज्ञ पेरी व मारी यांची तिथेच गाठ पडली आणि 1885 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. त्यांच्या संशोधकांचा खडतर सहजीवनास तेथूनच प्रारंभ झाला. मारी त्यावेळी प्रबंधावर काम करत होती, शाळेत शिकवत होती व संशोधन काम तर जोरात चालू हाते.
युरेनियमच्या किरणोत्साराचे रहस्य उकलण्याच्या जिद्दीने मारीला झपाटले होते. युरेनियम खनिजाच्या किरणोत्साराच्या मापनाचे काम तिने हाती घेतले. अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर शुद्ध युरेनियमपेक्षा कितीतरी अधिक किरणोत्साराची नोंद उपकरणावर झाली. ही अधिक किरणोत्सार देणारी द्रव्ये अलग करण्यासाठी पुन्हा हजारो प्रयोग मोठ्या चिकाटीने आणि प्रयोगाअंती आपल्या हाती नवे द्रव्य लागेल या दुर्दम्य आत्मविश्वासाने मारीने चालू ठेवले. अखेर 1898 जुलैमध्ये युरेनियमहून शतपटीहून अधिक किरणोत्सारी द्रव्य वेगळे करण्यात मारीला यश आले. त्या द्रव्यास आपल्या मायदेशाच्या स्मरणार्थ पोलोनियम असे नाव मारीने दिले. परंतु त्यातूनही तीव्र किरणोत्सारी द्रव्य अजून सापडायचे होते. म्हणून प्रयोग पुढे चालू ठेवले. आणि डिसेंबरमध्ये रेडियमचा शोध लागला. परंतु ते दृश्य प्रमाणात मिळवणे अवश्य होते. क्यूरींजवळ प्रयोगासाठी सुसज्ज प्रयोगशाळा नव्हती, संशोधन चालू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य नव्हते. पण संशोधन चालू ठेवण्याची जिद्द होती. स्वत:ची तुटपुंजी बचत घालून त्यांनी टनावारी युरेनियम खनिज आणण्याची व्यवस्था केली व त्याचे शुद्धीकरण सुरू केले. चार वर्षे शुद्धीकरणाच्या कामात मारी-पेरी राबत होते. गळक्या लागडी छपरीत, झोंबणाऱ्या धुरात नि दुर्गंधीत शुद्धीकरणाचे काम मारीने चिकाटीने चालू ठेवले आणि अखेर 1902 मध्ये 1।10 ग्रॅम रेडियम मिळवण्यात क्यूरी यशस्वी झाले. लोकविलक्षण अशा त्या रेडियम द्रव्याचा पुढचा अभ्यास त्यांनी सुरू केला. रेडियम प्रचंड किरणोत्सारी होते. स्पर्श झाला तर त्याने त्वचा जळून जार्इ. त्यावरून पेरीने रेडियमच्या वैद्यकिय वापराबाबत संशोधन सुरू केले आणि रेडियमच्या सहाय्याने कॅन्सरपेशी जाळून त्वचेचा कॅन्सर बरा करणे शक्य असल्याचे आढळून आले. रेडियमचे महत्व एकदमच वाढले. कारखानदारांनी रेडियमच्या उत्पादनात पडण्याच्या दृष्टीने त्याबाबतची माहिती क्यूरींना विचारली. क्यूरींनी रेडीयमच्या निर्मितीचे पेटंट न काढता माहिती सर्वांना खुली ठेवली. शास्त्रज्ञांचे शोध अखिल मानवाच्या कल्याणासाठी वापरले जावे अशी उदात्त भूमिका त्यामागे होती.
1903 साली पदार्थविज्ञानातील संशोधनासाठी मारी व पेरी क्यूरी यांना नोबेल पारितोषिक मिळून जगत् मान्यता मिळाली. मारी ही जगातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती स्त्री. त्यांच्या कामाला मान्यता मिळाल्याने आता सुसज्ज प्रयोग शाळेत संशोधन चालू ठेवायची शक्यता निर्माण झाल्याने क्यूरी पुढच्या कामाच्या योजना आखत होते. परंतु 1906 मध्ये घोडा गाडीखाली चिरडून पेरीचा अपघाती मृत्यू झाला. दोघांनी मिळून योजलेल्या कामाचा भार एकट्या मारीवर पडला. तो तिने जिद्दीने स्वीकारला. 1911 मध्ये रसायनशास्त्रातील कामासाठी तिला दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक मिळाले. 1914 मध्ये पॅरीसमध्ये रेडियम इंस्टिट्यूट उभी राहिली. नवीन काम सुरू करणार, तो पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. मारी स्वस्थ बसणे शक्य नव्हते. ती लागोलाग मदतीला बाहेर पडली. जखमींना एक्सरे सुविधा मिळाव्यात म्हणून सुविधासज्ज खास गाडी तयार करून युद्ध भूमिवर जखमींच्या मदतीसाठी मारी अहोरात्र खपली.
रेडियमचा उपयोग कॅन्सर बरा करण्यासाठी होऊ शकतो. त्याच रेडियमचा संसर्ग प्रमाणाबाहेर झाला तर त्याने कॅन्सर होतो. मारीच्या प्रदीर्घ संशोधनाच्या काळात रेडियमशी सतत संसर्ग होत होता. तिला रक्ताचा कॅन्सर होऊन 1934 मध्ये कॅन्सरमुळे त्या थोर संशोधिकेचा अंत झाला. त्यावेळी प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइननी मारी क्यूरीचा यथार्थ गौरव केला. ते म्हणाले, “त्यांचा कणखरपणा, लोकांच्या उपयोगी पडण्याची अविरत धडपड, व्यक्तिगत जीवनातला कमालीचा साधेपणा, वस्तुनिष्ठ दृष्टी, अविचलनीय विवेकबुद्धी हे सारे गुण त्यांच्या ठायी एकवटलेले होते. एकाच व्यक्तिमत्वाच क्वचित सापडणाऱ्या या गुणांचा अनोखा संगम मादाम क्यूरींमध्ये झालेला होता. आपण केलेले काम फार अपुरे आहे असेच त्यांना सतत वाटे. त्यामुळे त्या मिळालेल्या मोठ्या यशाबाबत आत्मसंतुष्ट कधीच झाल्या नाहीत, आणि म्हणूनच वैज्ञानिक संशोधनातील सर्वोच्च मानबिंदू त्या गाठू शकल्या.”