जन्म: ११ डिसेंबर १८४३.
मृत्यू: २७ मे १९१०.
कार्यक्षेत्र: जीवाणूशास्त्र, जीवशास्त्र.
रॉबर्ट कोख
Robert Koch
जर्मन जीवाणूशास्त्रज्ञ
जन्म : 11 डिसेंबर, 1843
मृत्यू : 27 मे, 1910
प्रयत्नवादी जीवाणूशास्त्रज्ञ
डॉ. रॉबर्ट कोख यांना खरेतर पर्यटक बनून अपरिचित प्रदेशांत साहसी मोहिमांवर जायचे होते. पण त्यांची प्रेयसी एमी हिने अट घातली की, त्यांनी हा धोकेदायक बेत रद्द करून डॉक्टरकी केली तरच ती त्यांच्याशी विवाह करेल. एमीची अट रॉबर्ट यांनी मान्य केली खरी, पण डॉक्टरकीत त्यांचे मन रमेना. त्या काळात आजारी रुग्णांना बरे करणारी, दिलासा देणारी प्रभावी औषधे डॉक्टरांकडे नव्हती. कारण मुळात रोग कशामुळे होतात, याचे शास्त्रीय ज्ञान फारच तुटपुंजे होते. रुग्ण मरताना असाहाय्यतेने बघत राहणे व समाधानासाठी काही तरी थातूरमातूर उपचार करणे, हे रॉबर्ट यांना मान्य नव्हते. त्यांचे अस्वस्थ मन रमावे म्हणून एमीने त्यांच्या अठ्ठाविसाव्या वाढदिवसाला त्यांना आवडेल अशी वस्तू भेट दिली, ती म्हणजे सूक्ष्मदर्शक. या नवीन खेळण्याने जर्मनीच्या खेड्यातील या डॉक्टरला वेडे केले. मिळेल त्या गोष्टी ते सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून तपासू लागले.
त्या काळात “अँथ्रॅक्स’ नावाच्या जीवघेण्या आजाराने हजारो गुरे व त्यांच्यानंतर त्यांचे पालक- शेतकरी मृत्युमुखी पडत. हे का होते, याचा कोख शोध घेऊ लागले. “अँथ्रॅक्स’ग्रस्त गाईच्या रक्ताचे थेंब सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून ते न्याहाळून पाहू लागले. त्यात त्यांना बुटक्या काड्यांसारखे अँथ्रॅक्सचे जीवाणू आढळले. निरोगी गाईच्या रक्तात ते नव्हते. एवढ्याशा पुराव्यावरून या बुटक्या काड्या सजीव आहेत व त्यांच्यामुळे अँथ्रॅक्स होतो, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी उंदरांवर प्रयोग सुरू केले. त्यांच्या दवाखान्यात एक लाकडी भिंत उभारून अर्ध्या खोलीएवढ्या लहानशा जागेत त्यांनी प्रयोगशाळा उभारली. पत्नीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून डॉक्टरकीपेक्षा या कुबट प्रयोगशाळेत ते जास्त लक्ष घालू लागले. अँथ्रॅक्सने दगावलेल्या मेंढीचे रक्त त्यांनी उंदराला टोचले. दुसऱ्या दिवशी बघिल्यास तो उंदीर मरून पडलेला त्यांना दिसला. कोख यांना त्याच्या प्लीहेत अँथ्रॅक्सचे जंतू थव्याने आढळले. एवढ्यात त्यांचे समाधान झाले नाही. बैलाच्या डोळ्यांतील द्रावात त्यांनी अँथ्रॅक्सचे जंतू वाढवले. त्या जीवाणूंच्या आठ पिढ्या अशा प्रकारे वाढवल्या व बुटक्या काड्या सजीव असतात, हे त्यांनी सिद्ध केले. प्राण्यांच्या शरीराबाहेर वाढवलेल्या या ‘बुटक्या काड्या’ त्यांनी परत उंदरात टोचल्या. दुसऱ्या दिवशी उंदीर मेलेला आढळला व त्याच्या प्लीहेतही याच बुटक्या काड्यांचे थवे आढळले. अशा प्रकारे कोख यांनी काटेकोरपणे शास्त्रीयरीत्या प्रयोगांद्वारे अँथ्रॅक्स हा या सूक्ष्म रोगजंतूंमुळे होतो, हे सिद्ध केले.
तत्पूर्वी, लुई पाश्चर वीस वर्षे सूक्ष्मजंतूंमुळे रोग होतात, हे सिद्ध केले नव्हते. संशोधनासाठी प्रशिक्षण नसलेल्या कोख यांनी एका खेड्यात डॉक्टरकी करत, अर्ध्या खोलीत स्वत: बनवलेल्या प्रयोगशाळेत निर्विवादपणे सिद्ध केले. त्याचबरोबर कोणत्या विशिष्ट जंतूंमुळे कोणते विशिष्ट रोग होतात, हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रीय निकष बनवले. ‘कोखचे निकष’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकषांनुसार त्या रोगाचे जंतू त्या आजाऱ्यामध्ये सापडले पाहिजेत, ते निरोगी प्राण्याला टोचल्यावर तसाच आजार त्या प्राण्याला व्हायला हवा व परत तेच जंतू त्या रोगी केलेल्या प्राण्यात सापडले पाहिजेत. या क्षेत्रातील पुढील सर्व संशोधकांना या कसोट्यांना उतरावे लागले व अजूनही या कसोट्या प्रमाणभूत मानल्या जातात.
सर्व शास्त्रज्ञांना त्यातील काटेकोरपणामुळे चकीत करणाऱ्या या शोधानंतर, 1876 साली वयाच्या चौतिसाव्या वर्षी, रॉबर्ट कोख क्षयरोगाकडे वळाले. त्या काळात क्षयरोग युरोपमधील जनतेचा कर्दनकाळ ठरला होता. तोही एखाद्या रोगजंतूंमुळे होत असावा, असा काही शास्त्रज्ञांचा कयास होता. पण ते सिद्ध करायला कोणाला जमले नव्हते. अँथ्रॅक्सप्रमाणे त्यांनी त्याच पद्धतीने क्षयरोगावर संशोधन केले. क्षयरोगाचे जंतू फार हळू वाढतात. त्यामुळे ते वाढलेले लवकर दिसेनात. पण कोख यांनी चिकाटी सोडली नाही. शेवटी त्यांच्या चिकाटीला व अचूक संशोधन पद्धतीला यश आले व क्षयरोग हा अँथ्रॅक्सप्रमाणेच विशिष्ट प्रकारच्या जंतूंमुळे होतो हे त्यांनी 1882 मध्ये सिद्ध केले. आपल्या प्रयोगाचा वारंवार पडताळा पाहिल्याखेरीज ते घाईने निष्कर्ष काढत नसत. शरीराबाहेर प्रयोगनळ्यांमध्ये क्षयरोगाचे जंतू वाढवण्याचे तंत्र त्यांनी शेकडो प्रयोगांनंतर पक्के केले. आपल्या प्रयोगशाळेत क्षयरोगाच्या जंतूंची 43 कुटुंबे ऊर्फ कॉलनीज त्यांनी वाढवल्या. क्षयरोगाचे जंतू सूक्ष्मदर्शकातून नीट उठून दिसावेत म्हणून त्यांनी ते वेगवेगळ्या रंगांनी, रसायनांनी रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दोनशे एकाहत्तराव्या प्रयत्नाला यश आले व मेथिलिन ब्ल्यू नामक रंगामुळे क्षयाचे जंतू उठून दिसतात, हे लक्षात आले. एका अस्सल शास्त्रज्ञाची चिकाटी कोखमध्ये कशी भिनली होती, हे यावरून लक्षात येईल.
चिकाटी, नवे शोधण्याचा ध्यास, प्रयोगांमधील काटेकोरपणा व वैचारिक स्पष्टता या गुणांमुळे हुशार जर्मन ‘खेडुत’ डॉक्टरने वैद्यकीय शास्ज्ञात अजरामर कामगिरी केली.