Menu

रूदोल्फ समोइलोविच

(Rudolf Samoylovich)

जन्म: ०१ सप्टेंबर १८८१.
मृत्यू: ०१ जून २०१८.
कार्यक्षेत्र: भूगर्भशास्त्र, भूगोल.

रूदोल्फ समोइलोविच
Rudolf Samoylovich
रशियन भूगर्भशास्त्रज्ञ
जन्म: 1 सप्टेंबर, 1881
मृत्यू: 1939

मनमिळाऊ व कार्यमग्न संशोधक

दक्षिण रशियातील अझोव शहरातील एका सधन व्यापाऱ्याच्या मोठ्या कुटुंबात रूदोल्फ यांचा जन्म झाला. रूदोल्फ यांना वडिलांच्या व्यापारी उलाढालीत अजिबात रस नव्हता. लहानपणापासून ते पुस्तकात आणि निसर्ग विज्ञानाच्या अभ्यासात गढलेले असत. ओदेसाला नोवोरस्सिया विद्यापीठात भौतिकीच्या शिक्षणासाठी ते रूजू झाले, तेव्हापासूनच ते क्रांतिकारी गटात सामील होते. वडिलांनी धास्तावून त्यांची जर्मनीत रॉयल मायनिंग अकादमीत रवानगी केली. परंतु तेथेही त्यांचे क्रांतिकारी कार्य चालूच राहिले. अकादमीतून भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्रात प्राविण्य मिळवल्यावर रशियामध्ये दोनबसमधील खाणीत अभियंता म्हणून रूजू होण्याऐवजी दक्षिण रशियात मार्क्सवादी विचाराच्या प्रचारकार्यात, सभा, मोर्चे यात गुंतल्याने 1906 मध्ये त्यांना अटक करून हद्दपारीची शिक्षा ठोठावण्यात आली. तेथून निसटून रूदोल्फ पीटर्सबर्गमध्ये भूमिगत क्रांतिकारी लढ्यात सामील झाले. 1908 मध्ये पुन्हा अटक झाल्यानंतर उत्तरेतील हद्दपारीच्या शिक्षेचा काळ करणी लावून रूसानोव (जेष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ) बरोबर हिमाच्छादित सागर-शोधन सफरीमध्ये रूदोल्फ सामील झाले. येथूनच त्यांच्या आर्क्टिक महासागरातील संशोधनाचा प्रारंभ झाला.
1912 मधील स्पितसबरगेन सफरीमध्ये विस्तृत हिमाच्छादित प्रदेशाचे सर्वेक्षण करून एक हजार कि.मी.चा मार्ग त्यांनी आखला. कोळशाच्या साठ्यांचा शोध लावला. या सर्वेक्षणावरून आर्क्टिक परिसरामधील समृध्द निसर्गसंपदेचा अंदाज आल्याने उत्तर ध्रुव प्रदेशात सखोल संशोधनाची गरज समोइलोविच यांनी आग्रहाने मांडली. ती प्रत्यक्ष साकारण्याची संधी त्यांना 1917 साली ऑक्टोबरमध्ये रशियात कम्युनिस्ट क्रांती होऊन समाजसत्तावादी लोकशासन प्रस्थापित झाल्यानंतर मिळाली. मार्च 1920 मध्ये 60 अंश रेखांशाच्या उत्तरेकडील हिमाच्छादित प्रदेशाचे शास्त्रीय संशोधन व आर्थिक विकास यासाठी उत्तर मोहीम (Northem Expedition) आयोजित करण्यात आली व समोइलोविच यांना त्याचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. सोविएत युनियनमधील 40 टक्के एवढ्या विस्तृत प्रदेशाचे-म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्राचे-सर्वेक्षण व विकास याची मोठी जबाबदारी समोइलोविच यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यामागे होता त्यांचा भूगर्भशास्त्र व खाण-वेधन आदी संशोधनातला अधिकार, संशोधन संघटन कुशलता आणि प्रदीर्घ क्रांतिकारी कार्य व श्रमिकांशी बांधिलकी. श्वेत, बॅरेटस व कारा समुद्र, कोला द्वीपकल्प, पिचोरा नदीचे खोरे हा सारा मुलुख एकात्मिक संशोधन कार्यक्रमाखाली आणून भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण, हवामानाच्या नोंदी, मच्छीमारी व मृदूलोमी (fur) प्राण्यांच्या शिकारी टापूंबाबत तपशीलवार माहिती, स्थानिक वंश-जाती व लोकजीवन अशी सर्वसमावेशक माहिती पध्दतशीरपणे प्रथमच गोळा करण्यात आली. आर्क्टिक्ट प्रदेशाच्या औद्योगिक व सामाजिक-आर्थिक विकासाच्या प्रादेशिक योजना आखण्यासाठी हे पथदर्शक संशोधन पायाभूत होते. 1932 साली स्पितसबर्गेनमधील 20 वर्षापूर्वी रूस्सनोव व समोइलोविच यांनी शोधलेल्या कोळशाच्या खाणी विकसनाचे काम शासनाने हाती घेतले.
आर्क्टिक्ट सागरातल्या तोवर अज्ञात हिमबद्ध प्रदेशाच्या समन्वेषणाची (Exploration) या काळात अत्यंत बिकट परिस्थिती होती. द्रव इंधनाचा हिमभंजकात (ice breakers) वापर, हिमसागरातील समन्वेषणाला विमानाची जोड, जहाजावर फिरती प्रयोगशाळा आदी सुविधा मिळाल्याविना प्रदीर्घ काळ संशोधन सफर चालू ठेवणे अशक्य असल्याने त्याबाबत विकास व्हावा, या दृष्टीनेही समोइलोविच प्रयत्नशील होते. 1934 पासून समोइलोविच यांनी हाती घेतलेल्या मोहिमांमधून हिमबध्द कारा समुद्र व आसमंत यामध्ये 7500 कि.मी. प्रवास करून अंतर्गत प्रवास, समुद्राची खोली, समुद्रतळाचे नकाशे, अनेक नवीन बेटांचा शोध, विस्तृत जलशास्त्रीय व चुंबकीय निरीक्षण केली आणि निघायतल (Shelf) प्रदेशाच्या आखणीची गरज मांडली (तेलाचे मोठे साठे निघायतल प्रदेशात आढळले) अशा प्रकारे समोइलोविच यांनी सोविएत युनियनच्या शास्त्रीय संशोधनात तसेच सोविएत अर्थव्यवस्थेत पायाभूत असे ऊर्जास्त्रोत व खनिजसंपत्तीच्या समन्वेषणाव्दारे विकासकार्यात मोठी कामगिरी बजावली.
हिमखंड व हिमगंगा हल्ला झेलत अपघाती मृत्यूच्या धोक्याची टांगती तलवार कायम शिरावर घेऊन अत्यंत अनिश्चित हवामान व बिकट परिस्थितीमध्ये सर्व सहकाऱ्यांची जबाबदारी समर्थपणे पेलून खेळीमेळीने सर्व सहकाऱ्यांचा उत्साह टिकवून संशोधन कार्य पुढे नेण्याचे आव्हान जवळजवळ वीस वर्षे समोइलोविच यांनी समर्थपणे पेलले. ते मनमिळावू, शांत स्वाभावाचे व सर्व सहकाऱ्यांना समजून, सांभाळून घेणारे असल्याने अतिशय लोकप्रिय होते. लेनिनग्रादमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॉर्थ’चे ते संचालक होते. असा केवळ संशोधनाला आणि देशाच्या विकासाला वाहिलेला जीवनक्रम समोइलोविच यांना काही कल्पनाही नसताना अचानक खंडित झाला.
1938 साली ऑगस्टमध्ये त्यांचे कॉकेशसमध्ये किस्लोवोदस्क येथे आरोग्याधामात वास्तव्य होते. उत्तर ध्रुवीय मोहिमांचे अनुभव, शास्त्रीय माहिती, तेथील लोक व निसर्ग याबाबत रोज व्याख्याने चालू होती आणि लोक भरभरून स्वागत करत होते. अशाच एका सभेतून त्यांना उचलण्यात आले आणि तुरूंगात टाकले. त्यांच्या नावाचा उल्लेख सर्व शास्त्रीय संशोधन व मोहीमा यातून नाहीसा झाला. तुरूंगात ते नक्की केव्हा व कसे मृत्युमुखी पडले हे ज्ञात नाही. 1957 सालानंतर तिशीच्या अखेरीस नाहीशी झालेल्या अनेक शास्त्रज्ञ व नेते, यांच्यावरचे आरोप सोविएत युनियनमध्ये मागे घेण्यात आले आणि त्यांच्या कार्यास यथायोग्य मानमान्यता देण्यात आली. समोइलोविच यांचे नाव व संशोधन कार्य पुन्हा प्रकाशझोतात आले.