Menu

विल्हेम रोएंटगेन

(Wilhelm Röntgen)

जन्म: २७ मार्च १८४५.
मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३.
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र.

विल्हेम रोएंटगेन
Wilhelm Röntgen
जर्मन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ
जन्म : 27 मार्च, 1845
मृत्यू : 10 फेब्रुवारी, 1923

विज्ञानाच्या प्रगतीला चालना देणारा शोध

१८९५ च्या डिसेंबरमध्ये जर्मनीतून रोएंटगेन यांच्या ‘क्ष’ किरणांच्या शोधाची बातमी आली व तिने जगाला थक्क करून सोडले. रोएंटगेन यांना सापडलेले नवे किरण लाकूड, कागद रबर, कातडे यासारख्या अपारदर्शक असलेल्या वस्तूंतून आरपार जाऊ शकत होते. त्यामुळे या वस्तूंच्या पलीकडील वस्तू ‘पाहणे’ आता शक्य झाले. एक प्रकारची नवी दृष्टीच मानवाला प्राप्त झाली. या यंत्राच्या पुढे हात धरल्यावर आतल्या हाडाचे छायाचित्र रोएंटगेन यांना काढता आले. विज्ञान आणि तंत्रविकास या दोहोंच्या दृष्टीने या शोधाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. या शोधावर लक्षावधी रुपये कमावता आले असते इतका तो शोध क्रांतिकारी होता. पण रोएंटगेन यांनी आपल्या या शोधाचे पेटंट घेतले नाही. अखिल मानवी समाजाला त्याचा उपयोग मुक्तपणे व्हावा, हीच सच्च्या शास्त्रज्ञाला शोभेल अशी त्यांची भूमिका होती.
रोएंटगेन यांचा जन्म २७ मार्च १८४५ रोजी जर्मनीतील लेपेन गावी झाला. १८४८ मध्ये जर्मनीत क्रांतिकारी उठाव सुरू असल्याने धनिक व्यापारी असलेले त्यांचे वडील हॉलंडमध्ये गेले. युट्रेकला यांत्रिक विद्यालयात रोएंटगेन शिक्षण घेत होते. पण शिक्षकाची चेष्टा केल्याने त्यांची शाळेतून हकालपट्टी झाली. पुढे खाजगी शिकवणी घेऊन झुरीचमध्ये (स्वित्झर्लंड) त्यांनी स्थापत्यशास्त्राचा अभ्यास सुरू केला. या काळात अभ्यासापेक्षा सहली, गिर्यारोहण यांकडेच त्यांचे अधिक लक्ष होते. योगायोगाने ऑगस्ट कुंटड या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापकांच्या लक्षात आले की, रोएंटगेन यांना स्थापत्यशास्त्रात रस नाही. त्यांनी रोएंटगेन यांना पदार्थविज्ञान प्रयोगशाळेतील कामात मदत करायला सुचविले आणि तेव्हापासून रोएंटगेन यांनी प्रायोगिक पदार्थविज्ञानात स्वत:ला झोकून दिले. झपाटल्याप्रमाणे त्यांनी पदार्थविज्ञानाचा अभ्यास सुरू केला. नवे प्रयोग आखले, तंत्रे विकसित केली. प्रयोगाला आवश्यक अशी अत्यंत अचूक उपकरणे बनवली. १८८५ मध्ये जर्मनीत वोर्झबर्ग येथे पदार्थशास्ताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
पदार्थाच्या लवचिकतेचा गुणधर्म, वायूंची विशिष्ट उष्णता, स्फटिकांतून उष्णतेचे वहन इत्यादींवर त्यांनी संशोधन केले. वोर्झबर्गला असतानाच रोएंटगेन यांना क्ष-किरणांचा शोध लागला. इतर काही प्रयोगांमध्ये ते निर्वात काचनळीचा वापर करत. एक निर्वात काचनळी काळ्या पुठ्ठ्यात गुंडाळलेली होती व प्रयोगशाळेत अंधार केलेला होता. अचानक त्यांना दिसले की, टेबलावर जवळच पडलेला एक प्लॅटिनो सिअॅमाईड या रसायनाचा लेप लावलेला कागद चमकू लागला. निर्वात नळीतला विद्युतप्रवाह बंद केल्यावर कागदाचे चमकणे बंद झाले. म्हणजे नळीतून कोणते तरी किरण कागदावर पडत होते. कागदावर पडणारी गोष्ट कणांनी बनलेली नव्हती. कारण विद्युत या चुंबकीय क्षेत्राने कण विचलित झाले असते. तशी ती होत नव्हती पण ते साधे प्रकाशकिरणही नव्हते. कारण मध्ये भिंग ठेवले तरी त्याची दिशा बदलत नव्हती. रोएंटगेन यांनी असा निष्कर्ष काढला की, अतिशय कमी लांबीच्या लहरींनी ते किरण बनलेले होते. या नवीन प्रकारच्या किरणांना त्यांनी क्ष- किरण (X-Ray) असे नाव दिले. १९०१ साली त्यांना या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.
क्ष- किरणांच्या शोधानंतर लवकरच क्ष- किरण उत्पन्न करणारे स्वस्त व सोपे यंत्र निर्माण झाले आणि भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, छायाचित्रकार अशा सर्वांना ते अत्यंत उपयोगी ठरले. क्षयरोग, मोडलेल्या हाडांची तपासणी करताना, दंतवैद्यांना दातांची परीक्षा करायला क्ष- किरणांचा वापर मोलाची मदत करतो. धातूचे जोडकाम तपासण्यासाठी तसेच मिश्र धातूंतील निरनिराळ्या धातूंचे परस्परप्रमाण निश्चित करण्यासाठी, नकली जिनसातील मूळ धातू ओळखण्याकरिता अशा बहुविध प्रकारे कारखान्यांतही क्ष- किरणांचा उपयोग होतो. प्राचीन काळातील आवरणांनी गुंडाळलेली थडग्यातील प्रेते (ममीज) व इतर वस्तूच्या अभ्यासात पुरातत्वशास्त्रज्ञांना क्ष- किरणांची मोठी मदत होते. क्ष-किरणांमुळे पदार्थाच्या स्फटिकरूपी अंतर्रचनांचा अभ्यास करणे पदार्थवैज्ञानिकांना शक्य होते.
विज्ञानाच्या प्रगतीलाही क्ष- किरणांच्या शोधामुळे चालना मिळाली. ‘कॅथोड रे ट्यूब’मध्ये इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निर्माण करायला जे. जे. थॉमसन या शास्त्रज्ञाला यश मिळाले ते क्ष-किरणांच्या शोधाच्या आधारामुळेच. यातून पुढे थॉमसन यांनी अणूच्या अंतर्गत रचनेचा शोध लावला. किरणोत्सर्जन या विषयावर नंतर शोधमालिकाच सुरू झाली. मारी क्युरी, पिअरे क्युरी, मॅक्स प्लँक, थॉमसन, रूदरफोर्ड, आईनस्टाईन, फर्मी यांसारख्या महान शास्त्रज्ञाचे संशोधन ही या मालिकेतील पुढची पावले होती.