Menu

युरी कन्द्रात्यूक

(Yuriy Kondratyuk)

जन्म: ०९ जून १८९७.
मृत्यू: ०१ जून २०१८.
कार्यक्षेत्र: अवकाशशास्त्र.

युरी कन्द्रात्यूक
Yuriy Kondratyuk
सोविएत अवकाशशास्त्रज्ञ व अभियंता
जन्म: 9 जून, 1897,
मृत्यू: , 1941

प्रतिभावान शास्त्रज्ञ

युरी यांना बालपणापासून विज्ञानकथांमध्ये मोठा रस होता. ‘बोगदा’ नावाची विज्ञानकथा वाचून पृथ्वीच्या पोटात अतिखोल जाणारा बोगदा खणून पृथ्वीच्या गर्भाचा अभ्यास व तेथील प्रचंड उष्णतेचा वापर आणि अंतराळ उड्डाण या दोन विषयावरील प्रकल्पांच्या योजना करण्याचा उद्योग शाळकरी युरीने केला. मोठेपणी यापैकी अवकाश प्रवासाविषयी त्यांनी पथदर्शक संशोधन केले. सैध्दांतिक संशोधनाच्या तयारीसाठी त्यांनी गणित, स्थितीशास्त्र, यंत्रशास्त्र, भौतिकी व रसायनशास्त्र यांचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास केला. रॉकेटचा उपयोग करून अवकाश प्रवास शक्य होईल, या निष्कर्षाप्रत तरूणपणीच युरी पोचले होते.
4 ऑक्टोबर 1857 रोजी, त्सिओल्कवस्की या ‘अवकाश प्रवासाचा जनक’ मानला गेलेल्या रशियन शास्त्रज्ञाच्या जन्मशताब्दी वर्षी, सोविएत युनियनने जगातले पहिले आकाशयान-स्पुटनिक अंतराळात सोडून साऱ्या जगाला विस्मयचकित केले. सोविएत युनियनच्या दुसऱ्या महायुध्दात नाझी जर्मनीने पुरा विध्वंस केल्याने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये सोविएत युनियनमधले संशोधन चालू होते. तरीही सोविएत युनियनने पहिले यशस्वी अवकाश उड्डाण केले, त्यामागे होता सोविएत युनियनमधील अवकाश विज्ञानातील संशोधनाचा त्सिओल्कवस्कीपासूनचा प्रगल्भ वारसा आणि समाजवादी समाज उभारणीसाठी संशोधनाला वाहून घेतलेले समर्पित शास्त्रज्ञ. 1903 मध्येच कॉन्स्तन्तिन् त्सिओल्कवस्की या बहिऱ्या शिक्षकाने स्वाध्याय व कल्पक संशोधन या आधारे रॉकेटच्या उड्डाणविषयी सैध्दांतिक मांडणी एका लेखमालेतून सुरू केली. रॉकेटशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या वाहनाने वातावरण भेदून पलीकडे जाणे अव्यवहार्य असल्याने रॉकेटचा सैध्दांतिक व मूलतत्वाचे विवरण हे या दृष्टीने पथदर्शक होते. याशिवाय झांदर, फिओदरफ आदी रशियन शास्त्रज्ञांनी या विषयांत सैध्दांतिक भर घातली होती. कन्द्रात्यूक यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सैध्दांतिक व अभियांत्रिकी या दोन्ही अंगांनी आपले संशोधन पुढे नेले. त्यामुळे अवकाशशास्त्रात फार मौल्यवान प्रगती त्यांना साधता आली.
युरी यांचा जन्म युक्रेनमधील पलतावा येथे 1897 मध्ये झाला. त्यांचे आई-वडील बालपणीच वारल्याने त्यांचे शालेय शिक्षण आजोळी होऊन, 1916 मध्ये पिगाग्राद (लेनिनग्राद) येथे उच्च शिक्षणासाठी युरी यांनी प्रवेश घेतला; परंतु लगेचच पहिल्या महायुध्दात त्यांना सैन्यात दाखल व्हावे लागले. 1917 मध्ये त्यांनी अवकाशशास्त्रातील संशोधनावरचे पहिले पुस्तक तयार केले. ‘तुमच्यासाठी, भविष्यातील रचनाकारांनो’ (For You, Tomorrows Builders) हा सर्वसमावेशक ग्रंथ त्यांनी 1919 मध्ये पुरा केला. परंतु, पुढे क्रात्युंत्तर धुमश्चक्री व आर्थिक उभारणीचे प्रचंड आव्हान सोविएत युनियनपुढे उभे असल्याने सर्व शास्त्रज्ञांनी पडेल ती जबाबदारी उचलली. युरी यांच्यावर रेल्वेस्टेशनवरील देखभालीचे काम, साखर कारखान्यात भट्टीवरील काम, धान्य कोठारात, मेकॅनिक अशी अनेक कामे पडली. या काळात त्यांनी आपल्या अभियांत्रिकी व शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून कार्यक्षमता वाढवणाऱ्या, शारीरिक श्रम कमी करणाऱ्या अनेक सुधारणा केल्या. एक महाकाय धान्यकोठार, धान्य व इतर माल वर-खाली करणाऱ्या लिफ्ट, वाऱ्यावर चालणारे प्रचंड विद्युत केंद्र इत्यादींची उभारणी केली. प्रत्येक प्रकल्पामध्ये बरोबरच्या तरूण सहकाऱ्यांना नवनवीन आव्हान पेलण्यास तयार केले व शास्त्रीय पध्दतीने, जीव ओतून काम करण्याची स्फूर्ती दिली. एवढी सर्व जबाबदारी पेलून त्यांनी आपले अवकाश संशोधन सातत्याने चालू ठेवले व 1927 मध्ये त्यांचे ‘आंतरग्रहीय अवकाशावर विजय’ हे पुस्तक प्रसिध्द झाले.
अवकाश संशोधनाचा त्यांचा मुख्य उद्देश होता, सूर्यमालेतील ग्रहांवरील साधनसामग्रीचा मानवाच्या समृध्दीसाठी कसा उपयोग करता येईल, हे पाहणे. शास्त्रीय पध्दतीने हा प्रश्न हाताळला तर अवकाश प्रवासाचे आपले ध्येय निश्चित साधता येईल, असा त्यांना दृढविश्वास होता. अवकाश प्रवासाबाबतचे आपले सर्व संशोधन त्यांनी प्रसिध्द मात्र केले नाही. त्याचा कोण, कसा दुरूपयोग करेल, याबाबत त्यांना शंका होती. आधुनिक रॉकेटचे जनक त्सिआल्कवस्की यांना कन्द्रात्यूक यांचे पुस्तक पोहचल्यावर ते म्हणाले की, “गेली 40 वर्षे मी रॉकेट इंजिनावर संशोधन करीत आहे; पण आता मात्र आपल्यापैकी काहीजण अवकाशप्रवास डोळ्यांनी पाहू शकतील, असा मला विश्वास वाटतो.” त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनीच सोविएत युनियनने अंतराळात अवकाशयान सोडले. दुसऱ्या महायुद्धात मृत्यूमुखी पडले नसते, तर कन्द्रात्यूक यांनी आपल्या साठाव्या वर्षी अवकाशयानाचे उड्डाण पाहिले असते.
कन्द्रात्यूक यांनी अवकाश प्रवासाच्या शास्त्रात फार मोलाची सैध्दांतिक व अभियांत्रिकी स्वरूपाची भर टाकली आहे. उदा. उड्डाणमध्ये रॉकेटच्या एकूण वजनाचे सक्रिय भागांचे-म्हणजे इंधनाचे वजन व निष्क्रीय भागांचे वजन असे दोन भाग त्यांनी केले. पुन्हा निष्क्रीय भागांचेही दोन भाग त्यांनी कल्पिले-एक केवळ अथवा उपयुक्त भाग म्हणजे प्रवासी व त्यांना जीवनावश्यक असणाऱ्या यंत्रणा; दुसरा प्रमाणबध्द निष्क्रीय भाग म्हणजे रॉकेटचे इंजिन, उपकरणे वगैरे यंत्रणा. या ‘प्रमाणबध्द निष्क्रीय’ भागाच्या वजनाचा इंधनाच्या वजनाशी जो संबंध असायला हवा, त्याचा त्यांनी अभ्यास करून बहुपदी (मल्टिस्टेज) रॉकेटची कल्पना मांडली. आधुनिक रॉकेट या कल्पनेशिवाय अस्तित्वातच येऊ शकली नसती. त्याचप्रमाणे चंद्र व ग्रहांच्या गुरूत्वाकर्षणाचा उपयोग करून घेऊन इंधन न वापरता अवकाशयनाची कक्षा बदलण्याची विक्षोभ संचलन (Perturbation manoveuvre) संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली. पृथ्वी व चंद्राभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना पृथ्वीवरून रसद पुरवणाऱ्या मानवरहित प्रक्षेपक यंत्रणांची कल्पनाही त्यांनी विकसित केली होती. याचबरोबर अवकाशयनाच्या तांत्रिक अंगाबद्दलही त्यांनी अनेक महत्वाचे अभियांत्रिकी शोध लावले. खुद्द इंधनाच्या काही घटकांव्दारे, रॉकेटच्या इंजिनामधील ज्वलन कोठी व इतर भाग थंड करण्याची पध्दत, टर्बोपंपाच्या सहाय्याने इंधनाचे घटक हव्या त्या जागी पोचविणे, इंधन व ऑक्सिडायझर पूर्णपणे व सुरक्षितपणे एकमेकांत मिसळण्यासाठी या दोन्हीच्या पिचकाऱ्यांची जाळीदार रचना इत्यादींचा त्यात समावेश आहे.
संशोधन हेच जीवनध्येय असलेला हा प्रतिभावान शास्त्रज्ञ 1941 मध्ये नाझी जर्मनीने सोविएत युनियनवर आक्रमण केल्यावर सोविएत भूमीच्या रक्षणाच्या ध्यासाने सैन्यात दाखल झाला आणि नाझींचा क्रूर हल्ला थोपविण्याच्या धुमश्चक्रीत अकाली मृत्यूमुखी पडला.