विज्ञान व अंधश्रद्धा
आपल्या समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. उदा. मांजर आडवे गेले तर काम होत नाही, दुखणे चिघळले ते दैवी कोपामुळे, मासिक पाळीत स्त्री अमंगळ असते इ. यासारख्या निरनिराळ्या अंधश्रद्धा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आढळतात. चर्चा, विवेक, चिकित्सा, तपासणी या पलीकडे त्या असतात. कोणत्यातरी दैवी, अतिभौतिक शक्तीवरील ठाम विश्वास हा त्यांचा अविभाज्य भाग असतो. याउलट, ‘गोड खाल्ले की जंत होतात’ किंवा ‘टॉनिकमुळे शक्ती येते` यासारख्या गैरसमजुतीही असतात. दैवीशक्तीवरील विश्वासातून त्या आलेल्या नसतात. देवीशक्तीभोवतीची भावनिक गुंतवणूकही त्यात नसते.
अंधश्रद्धांमुळे त्यांच्या कह्यात सापडणाऱ्या हजारो लोकांचे जीवन अकारण कष्टप्रद बनते. कित्येक वेळा उध्वस्तही होते. ज्या समस्यांसाठी लोक अशा फसव्या मार्गाला लागतात त्या समस्यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण व उपाय आज उपलब्ध आहेत. या प्रश्नांमागील विज्ञान समजावून सांगणे, त्याबाबत आणि त्या प्रश्नाच्या सामाजिक-सांस्कृतिक व धोरणात्मक पैलूंबाबत चर्चा करणे असा हा कार्यक्रम आहे.