जन्म: इसविसनपूर्व ०६००.
कार्यक्षेत्र: तत्त्वज्ञान, तत्वज्ञान.
कणाद Kanaad
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ
ख्रिस्तपूर्व सहावे शतक असावे
कणाद हा वैशेषिक दर्शनाचा आद्य प्रवर्तक. हा सुमारे इ.स. पूर्व सहाव्या शतकात होऊन गेला. तो बुद्धपूर्वदेखील असण्याची शक्यता आहे. त्याच्या दर्शनाला उलुकाचे दर्शन असेही म्हणतात. उलुक हे त्याचे वा त्याच्या पित्याचे नाव असावे. (उलूक = घुबड). कणाद याचा अर्थ शेतात पडलेले धान्याचे कण वेचून उपजीविका करणारा असाही होतो.
कणादाने मांडलेला अणुवाद हा त्याच्या वैशेषिक तत्वज्ञानाचा एक भाग आहे. आपली अशी समजूत असते की भारतीय तत्वज्ञान म्हणजे वेदांत, ‘ब्रह्म सत्य जगत् मिथ्या’ असे म्हणणारे अध्यात्मवादी तत्वज्ञान. पण हे खरे नाही. फार प्राचीन काळापासून या अध्यात्मवादाच्या विरोधी तत्वज्ञाने भारतात अस्तित्वात होती. कणादाचे वैशेषिक दर्शन हे त्यापैकी एक होय. वैशेषिक दर्शन हे सामान्य माणसाला व्यवहारात, अनुभवातून जे ज्ञान होते त्याचे तात्विक विश्लेषण करणारे तत्वज्ञान आहे. ते स्वत:ला ‘अनुभवशरण’ म्हणवते. तसेच वस्तूंचे ज्ञाननिरपेक्ष स्वतंत्र अस्तित्व ते मानते. त्या अर्थाने ते वास्तववादी आहे. जगात वस्तू आहेत तरी कोणकोणत्या, त्यांचे आपल्याला ज्ञान कसे होते, ते ज्ञान खरे वा खोटे कसे ठरवायचे इत्यादी प्रश्नांचा या तत्वज्ञ ऋषींनी विचार केला. यासाठी ज्ञानमिमांसाशास्त्र, तर्कशास्त्र यांचा फार मोठा विकास वैशेषिकांनी केला. न्याय व वैशेषिक अशा दोन्ही दर्शनाना – ज्यांचा उल्लेख नेहमी एकत्रितपणे न्यायवैशेषिक असा केला जातो. भारतातील विज्ञानाच्या दृष्टीने म्हणूनच मोठे महत्त्व होते.
जगात असणाऱ्या पदार्थांचे वर्गीकरण करताना कणादाने द्रव्य ही एक कोटी मानली. एकूण नऊ द्रव्य पदार्थ-पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश, दिक्, काल, आत्मा व मन असे आहेत आणि यातले पहिले चार परमाणूंनी बनलेले आहेत. अशा संदर्भात परमाणूवादाची मांडणी वैशेषिक दर्शनात झालेली आहे. आपल्याला छपरातून पडणाऱ्या किरणांमध्ये जे धुळीचे कण दिसतात त्यांना त्र्यणुक किंवा त्र्यसरेणू म्हटले आहे. ह्यांचे विभजन होऊ शकते. ते केल्यास मिळतात ते द्वयणूक आणि द्वयणुकाचे विभाजन केल्यावर मिळतात ते परमाणु. परमाणू अविभाज्य व नित्य असतात. उलट केल्यास दोन परमाणूंनी एक द्वयणुक बनते व तीन द्वयणुकांच्या संयोगाने त्र्यणुक. पुढे क्रमाने चतुरणुक वगैरे जास्तजास्त स्थूल पृथ्वी, जल इत्यादी बनतात व त्यांच्या निरनिराळ्या मिश्रणांनी सृष्टीचा पसारा बनतो. प्रत्येक द्रव्यातील म्हणजे पृथ्वीच्या, जलाच्या परमाणूंचे गुणधर्म भिन्न वा विशेष असतात, असेही वैशेषिकांनी मानलेले आहे.
या ठिकाणी इ.स.पूर्व पाचव्या शतकात डिमॉक्रिट्स आदी ग्रीक तत्वज्ञांनी पुरस्कारलेल्या अणुवादाशी वैशेषिकांच्या कल्पनांशी तुलना केल्यास काही गोष्टी स्पष्ट होतील.
ग्रीकांच्या मतामध्ये देखील सृष्टीची उभारणी पृथ्वी, जल, तेज, वायू या चार द्रव्यांच्या परमाणूंनी झालेली असल्याचे मांडले आहे. मात्र भिन्न द्रव्यांच्या परिमाणूंचे गुणधर्म भिन्न असतात असे त्यांनी मांडलेले नाही. ह्यापेक्षा तार्किकदृष्ट्या जास्त चांगली मांडणी वैशेषिकांनी केली होती. मात्र डेमॉक्रिट्सच्या मते परमाणू एकत्र येतात व संयोग पावतात याचे कारण त्यांच्यात मुळातच असणाऱ्या तशा प्रेरणा व पोकळी भरून काढण्याची प्रवृत्ती हे दिले आहे, म्हणजे निसर्ग नियमानुसार हे घडते असे मानलेले आहे. परंतु कणादोत्तर काळात वैशेषिकांमध्ये र्इश्वर हे मूळ कारण ही कल्पना शिरलेली दिसते. सर्व परमाणू अलग असणे, वस्तू ‘मोडून पडलेल्या’ असणे म्हणजे प्रलय. प्रलयातून सृष्टी निर्माण करावी अशा इच्छेने प्रेरित होऊन व आत्म्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे संचित लक्षात घेऊन परमाणूंमधून स्थूल सृष्टी परमेश्वर निर्माण करतो असे नंतरचे तत्वज्ञ मानत.
कणादाने मांडलेल्या अणुवादाच्या मर्यादा येथे आपल्याला दिसतात. आजच्या आधुनिक अर्थाने या कल्पनांना वैज्ञानिक आधार ह्या काळात असणे शक्य नव्हते. त्यामुळे वास्तववादी व निरीश्वरवादी भूमिकेतून अणु सिद्धांत मांडला जाण्यात त्रुटी राहिल्या, मोकळ्या जागा राहिल्या व यामुळे भोवतालच्या प्रबल विचारांचा – र्इश्वरवाद व कर्मवाद – यांचा शिरकाव वैशेषिक दर्शनात झाला. असे जरी असले तरीही प्राचीन भारतामधल्या तत्वज्ञानामध्ये विशेषत: वास्तववाद, तर्कशुद्ध विचारांचे महत्त्व, सृष्टीच्या उद्भवाविषयीचा अणुवादी सिद्धांत असे महत्त्वाचे योगदान कणादाने केले, ज्ञानाच्या व विज्ञानाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावला.