Menu

आर्यभट

(Aryabhat)

जन्म: ०१ जुलै ०४७६.
मृत्यू: ०१ जुलै ०५५०.
कार्यक्षेत्र: गणित, खगोलशास्त्र.

आर्यभट Aryabhat
भारतीय गणित-खगोल शास्त्रज्ञ
जन्म : 476

आर्यभट हा भारतातील पहिला ज्ञात गणिती. मोहेंजोदडो – हडप्पा संस्कृतीपासून भारतात खगोलशास्त्र व गणित यांची प्रगती बरीच झाली होती. पण या ज्ञानात निश्चित मांडणी ग्रंथरुपात करण्याची मौलिक कामगिरी आर्यभटाने केली. आर्यभटाबद्दल व्यक्तिगत माहिती जवळजवळ काहीच उपलब्ध नाही. त्याने आर्यभटीय इ.स. 499 साली म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी पुरा केला असे दिसते. मूळचा केरळमधील आर्यभट त्यावेळी पाटण्यानजीकच्या प्रसिध्द नालंदा विद्यापिठात होता.
‘आर्यभटीय’ या ग्रंथात गणितशास्त्र व ज्योतिर्विद्या या संबंधी सैद्धांतिक विवेचन संक्षिप्त सूत्रबद्ध व श्लोकबद्ध रुपाने मांडलेले आहे. त्याच श्लोकसंख्या फक्त 121 आहे. त्यामध्ये गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद व गोलपाद असे चार विभाग आहेत. गीतिकापदामध्ये मोठमोठ्या संख्या लिहिण्याची परिभाषा दिली आहे. त्यासाठी त्यांनी अक्षरांक मालेचा वापर केला आहे. व्यंजनाचा उपयोग आकडे दर्शविण्यासाठी तर स्वरांचा पट (शंभर, दहाहजारपट इ.) दर्शविण्यासाठी केला आहे. याशिवाय राशी, अंश, कला यांचे परस्परसंबंध, युग पद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, चंद्र, ग्रह यांच्या गती व अंतर मोजण्याची मापे वगैरे माहिती दिली आहे. वर्तुळाचा व्यास आणि परीघ यांचे गुणोत्तर सांगताना ∏ चे मूल्य आर्यभटाने 3.1416 इतके सूक्ष्म सांगितले. पण तेही संनिकट मूल्य आहे असे म्हटलेले आहे. शिवाय संपूर्ण व सुस्पष्ट अशी भुजज्या (sine) मूल्यांच्या तक्त्यांची रीत आर्यभटाने दिली आहे.
गणितपादात 33 श्लोक असून त्यात अंकगणित, बीजगणित व रेखागणित यांचा विचार आहे. तसेच क्षेत्रफळ, घनफळ इत्यादींचे नियम सूत्ररुपाने दिले आहेत. याखेरीज त्रैराशिक, अपूर्णांक, कूटप्रश्न इत्यादीसंबंधी माहिती आहे.
कालक्रियापादात 25 श्लोक आहेत. मास, वर्ष, युग याबद्दल माहिती आहे. गोलपादात 50 श्लोक असून सूर्य, चंद्र, पृथ्वी इत्यादी गोलांची माहिती व सूर्यापासूनची अंतरे दिली आहेत. पृथ्वी, ग्रह व नक्षत्रे यांचा अर्धा भाग काळोखात व दुसरा सूर्याभिमुख म्हणून प्रकाशित आहे असे म्हटले आहे. पृथ्वी स्वत:भोवती फिरते हे निश्चितपणे सांगणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ असावेत. पृथ्वीची घडण, आकार, क्रांतीवृत्त, खगोलवर्णन, ग्रहण वर्तवण्याची रीत इत्यादी माहिती गोलपादात आली आहे. ग्रहणाच्या विवेचनामध्ये राहूला स्थान दिलेले नाही. स्वत: घेतलेले सूक्ष्मवेध व वेधसिद्ध आकड्यांची संगती या ग्रंथाला असल्याने हा ग्रंथ फार महत्वाचा मानला जातो.
वैज्ञानिक – प्रगतीवरील मर्यादा : बौद्ध विद्यापिठांचा ऱ्हास झाल्यावर भारतामध्ये ज्ञानसाधनेत ब्राह्मणांची मौखिक परंपरा प्रमुख बनली. बौद्ध विद्यापिठात सिद्धांत चर्चा एकत्रित होऊन सम्मिलीत व्हायची संधी होती. ती नाहीशी झाल्यावर केवळ व्यक्तिगत गुरु परंपरा चालू राहिली. मौखिक परंपरेमुळे ज्ञानप्रसार हा मुख्यत: छोट्या छोट्या गोळीबंद सूत्रांमार्फत व्हावा लागे. सूत्रांमागील विस्तृत सिद्धता त्यात समाविष्ट केलेली नसे. त्यामुळे युक्लिडच्या भूमितीसारखी एक स्वयंपूर्ण तर्कनिष्ठ व्यवस्था या स्वरुपात गणितशास्त्र भारतात उभे राहिले नाही. गणितशास्त्राचा विकास ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाच्या अंगाने मुख्यत: झाला. ज्योतिषशास्त्राचा वापर प्रामुख्याने कालगणना व ऋतुनिश्चिती यासाठी केला जात होता. युरोपमध्ये किंवा चीनमध्ये खगोलशास्त्र जसे नाविकांशी व नौका नयनाशी जोडले गेले तसे येथे झाले नाही. त्यामुळे खगोलशास्त्राचे ज्ञान अधिकाधिक अचुक बनवण्याची निकड निर्माण झाली नाही. तसेच ब्राह्मणी परंपरेमुळे ज्ञान फक्त संस्कृतमध्ये उपलब्ध असल्याने लोकांपासून तुटलेले राहिले.