जन्म: ३१ डिसेंबर १५१४.
मृत्यू: १५ ऑक्टोबर १५६४.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र.
अॅड्रिअस वेसॅलिअस
Andreas Vesalius
बेल्जिअन शरीरशास्त्रज्ञ
जन्म: 31 डिसेंबर, 1514
मृत्यू: 15 ऑक्टोबर, 1564
विज्ञाननिष्ठ, बंडखोर वैज्ञानिक
मानवी शरीरातील विविध अवयवांचे अचूक ज्ञान हा वैद्यकीय विज्ञानाचा खरे तर महत्वाचा पाया. पण आश्चर्य म्हणजे असे नेमके ज्ञान युरोपामध्ये सोळाव्या शतकापर्यंत विकसित झालेले नव्हते. याचे कारण म्हणजे पाश्चिमात्य वैद्यकपरंपरेमध्ये असलेला आंधळा, परंपरावादी दृष्टिकोन. इ.स दुसऱ्या शतकात गालेन या ग्रीक शरीरशास्त्रज्ञाने कुत्री, डूकरे, बकरे, माकडे आदींचे शवविच्छेदन करून त्या आधारे मानवी शरीराविषयी ग्रंथ लिहिला. अर्थातच बरीच चुकीची माहिती त्यामध्ये होती. तरीही गालेननंतरचे वैद्यकीय तज्ज्ञ गालनचा ग्रंथ वाचून पोपटपंची करण्यात धन्यता मानत. त्याकाळी मानवी शरीराचे विच्छेदन करणे निषिध्द मानले जाई. त्यामुळे गालेनच्या पुढे जाण्याचे धाडस कोणी करेना. गालेनचा दरारा व वैद्यकीय क्षेत्रातील आंधळा पंरापरावादी दृष्टिकोन यांचा पगडा इतका होता की जे कोणी थोडे शरीरशास्त्रज्ञ मानवी शवांचे विच्छेदन करीत त्यांना सांगण्यात येई की, गालेनच्या ग्रंथात जे दिले आहे त्यापेक्षा वेगळे त्यांना काही दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण गालेनने मांडले आहे तेच सत्य! खरे तर गालेनने स्वत: वेळोवेळी आपली मते बदलली होती पण त्याकडे दुर्लक्ष करून हा आंधळा कर्मठपणा 1700 वर्षे टिकून होता. अॅड्रिअस वेसॅलिअसचे वेगळेपण हे की त्या आंधळेपणाविरूद्ध बंड पुकारले. मानवी शवविच्छेदनातून प्रत्यक्ष जे दिसेल ते खरे यावर ठाम विश्वास ठेवून त्यांनी मानवी शरीराचा पध्दतशीरपणे व सूक्ष्म अभ्यास केला.
त्यांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासपध्दतीमुळे गालेनप्रणित शरीररचनेची समज अनेक बाबतीत भ्रामक ठरू लागली. त्यामुळे गालनचे पुरस्कर्ते चिडले व त्यांनी टीकेचा भडीमार सुरू केला. वेसॅलिअस यांच्या पॅरिस विद्यापीठातील पूर्वीच्या प्राध्यापकांच्या पुढाकाराखाली उभारलेला विरोध इतका प्रखर होता की ‘डी ह्युमानी कार्पोरिस फॅब्रिका’ (मानवी शरीररचना) या वेसॅलिअसच्या सात खंडांत प्रसिध्द झालेल्या ग्रंथराजाच्या प्रकाशनानंतर त्यांना संशोधनच सोडावे लागले.
वेसॅलिअस यांचा जन्म बेल्जियममध्ये ब्रुसेल्स येथे झाला. त्यांचे वडील राज-औषधकार होते. वेसॅलिअस यांना लहानपणापासूनच निरनिराळे प्राणी आणि पक्षी यांचे शवविच्छेदन करायची आवड होती. त्यांची आवड व घरातील वैद्यकीय परंपरा यामुळे अर्थातच ते वैद्यकीय शाखेकडे वळले. लोवेन व पॅरिस येथे त्याचे वैद्यकीय शिक्षण झाले. गालेनच्या शिकवणीचा तेथे फार मोठा पगडा होता. त्यामुळे पॅरिसला त्यांचे शिक्षकांबरोबर कडाक्याचे वादंग माजे. शवविच्छेदन करून शिकण्याची त्याची तीव्र इच्छा होती. पण उत्तर युरोपातल्या सनातनी वातावरणात ते जमेना म्हणून वेसॅलिअस इटलीला गेले व पदुआ विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. पुढे शरीरशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी बलोना व पीसा विद्यापीठात काम केले. त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. तिथे त्यांनी शवविच्छेदन करून पारंपरिक शरीरशास्त्राला मुळापासून हादरवणारा धाडसी अभ्यास सुरू केला. विद्यापीठात ते अतिशय लोकप्रिय होते. विद्यार्थी त्यांच्याभोवती नेहमी गर्दी करून असत. विद्यार्थ्यांनाही ते स्वत: शवविच्छेदन करायला लावत. नुसते उभे राहून बघायला परवानगी नव्हती. विद्यार्थ्यांना ते सांगत की, त्यांनी लिहिलेले पुस्तक हे केवळ मार्गदर्शक पुस्तक आहे. स्वत: शरीराचा अभ्यास करायला पर्याय नव्हे.
त्यांच्या पथदर्शक अभ्यासपध्दतीचे व श्रमाचे फळ म्हणजे त्यांचा सातखंडीय जगप्रसिध्द ग्रंथराज. तो त्यांनी वयाच्या केवळ अठ्ठाविसाव्या वर्षी प्रसिध्द केला! या ग्रंथाचे एक वैशिष्ट्य म्हणजे फॉन कॅलकार या चित्रकाराने त्यात काढलेली मानवी शरीररचनेची रेखीव, अचूक, सुबक चित्रे. ती अजूनही एक अभिजात ठेवा मानली जातात. इतका काटेकोर, सुंदर ग्रंथ प्रसिध्द केल्याबद्दल वेसॅलिअस यांचे कौतुक मात्र झाले नाही. उलट, या ग्रंथामुळे पारंपरिक वैद्यकीय दुढ्ढाचार्य इतकी खवळले, की वेसॅलिअस यांना पदुआ विद्यापीठातून बाहेर पडावे लागले व त्यांनी राजवैद्याची जागा पत्करली. पण त्यामुळे त्यांना पुढे आवडत्या शरीरशास्त्राचा अभ्यास करायला मिळाला नाही. राजवैद्य म्हणून मानमान्यता वाढली तसे त्यांच्या विरोधकांचे त्यांच्यावरचे हल्ले अधिक कडवट बनू लागले. त्यांच्यावर प्रेते पळवण्याचे आरोप होऊ लागले. त्यांच्या तथाकथित गुन्ह्यांमुळे देहदंडाची शिक्षा होईल की काय, असे वाटू लागले. राजाच्या वजनामुळे त्यांना ‘पवित्र भूमी’च्या यात्रेवर जाण्याची सजा देण्यात आली. परंतु यात्रेहून परतताना जहाज फुटून वयाच्या पन्नासाव्या वर्षी समुद्रसमाधी मिळून वेसॅलिअस यांना अकाली मृत्यू आला.
1543 साली वेसॅलिअस यांचा मानवी शरीराच्या रचनेविषयीचा ग्रंथ प्रसिध्द झाला त्याच वर्षी कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित ग्रहमालेचा सिध्दांत प्रसिध्द झाला. पदार्थविज्ञान व जीवशास्त्र यांच्यामधील या दोन क्रांतिकारक ग्रंथांनी वैज्ञानिक क्रांतीचा युरोपात पाया घातला.