जन्म: १७ जनेवारी १७०६.
मृत्यू: १४ एप्रिल १७९०.
कार्यक्षेत्र: सर्व विषय निपुण.
बेंजामिन फ्रँकलिन
Benjamin Franklin
अमेरिकन शास्त्रज्ञ व राजकीय मुत्सद्दी
जन्म : 17 जानेवारी, 1706
मृत्यू : 14 एप्रिल, 1790
विजेचे रहस्य शोधणारा शास्त्रज्ञ
इसवी सन 1752 चा काळ. फिलाडेल्फियातला एक वादळी पावसाचा दिवस! अधूनमधून विजा चमकत होत्या आणि या वातावरणात सेहेचाळीस वर्षांचे एक गृहस्थ पतंग उडवत होते. ते होते बेंजामिन फ्रँकलिन. पतंगही साधा नव्हता. त्या रेशमी पतंगाला टोकदार तार लावलेली होती व ती पतंगाच्या रेशमी दोरीला जोडलेली होती. दोरीच्या जमिनीवरील टोकाला धातूची किल्ली बांधलेली होती. या पतंगातून आकाशात चमकणारी वीज वाहून आणण्याच्या प्रयत्नात फ्रँकलिन होते. वीज चमकली. पण काहीच घडले नाही. फ्रँकलिन परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांना दोरीवरचे काही तंतू ताठरून उभे झालेले दिसले. चटकन त्यांनी आपल्या हाताच्या बोटांच्या मागच्या बाजूने किल्लीला स्पर्श केला अन् किल्लीवर ठिणगी उडाली. या अतिशय धोकादायक प्रयोगातून प्रथमच फ्रँकलिन यांनी ढगात चमकते ती वीज असल्याचे दाखवून दिले. पुढे फ्रँकलिनप्रमाणे हा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात दोन संशोधकांना विजेच्या धक्क्याने मृत्यू आला. कोसळणाऱ्या विजेमुळे इमारतीचे नुकसान व मनुष्यहानी टाळण्यासाठी इमारतीवर धातूची टोकदार सळई बसवून तिच्यापुढे आकर्षित झालेली वीज तारेमधून जमिनीत सोडण्याचा मार्ग फ्रँकलिन यांनी सुचवला आणि इमारतींना विजेपासून सुरक्षितता मिळवून दिली.
त्या काळात विजेबाबतचे ज्ञान प्राथमिक अवस्थेत होते. विजेचे रहस्य समजावे यासाठी विविध प्रयोग चालू होते. 1745 मध्ये लेडन विद्यापीठात ‘लेडन पात्र’ नावाचे उपकरण बनवण्यात आले. एका काचेच्या बरणीच्या पृष्ठभागावर धातूचा पत्रा बसवलेला होता आणि बुचातून एक पितळी सळई बरणीमध्ये घातलेली होती. घर्षणातून वीज निर्माण करणाऱ्या एका यंत्रातून खूपसा विद्युतभार या पात्रात ओतता येई व त्याचा संचय करता येई. लेडन पात्राचा प्रयोग करत असताना फ्रँकलिन यांना असे आढळले की, बरणी एखाद्या धातूच्या वस्तूजवळ आणली की, दोन्हीमधल्या अंतरात ठिणगी उडे आणि तडतड असा आवाज येई. एखाद्या छोटेखानी विजेच्या लखलखाटासारखे व ढगांच्या गडगडासारखेच हे होते. यातूनच सुरुवातीला वर्णन केलेला इतिहासप्रसिद्ध प्रयोग करण्याची कल्पना फ्रँकलिन यांना सुचली. पुढे त्यांनी घर्षण यंत्राऐवजी पतंगाच्या दोरीद्वारा लेडन पात्रात विद्युतभार घातला आणि असे निर्विवादपणे दाखवले की, ढगांमध्ये चमकणारी ती वीजच असते व ढग व पृथ्वी हे दोन घन व ऋण ध्रुव असतात. फ्रँकलिन यांना धन व ऋण विद्युतध्रुवांची चांगली कल्पना आलेली होती. त्याआधारे त्यांनी एक विद्युतघट (Battery) बनवण्यात यश मिळवले होते. कुतुहल व विलक्षण बुध्दी यातून त्यांनी अनेक प्रयोग करून सैद्धांतिक व व्यावहारिक स्वरुपाची भर विद्युत विज्ञानात घातली.
फ्रँकलिन यांच्या बुध्दिमत्तेची चमक लहानवयातच दिसून आली होती. 1685मध्ये बेंजामिन यांचे वडील इतर अनेक शेतकरी व कारागीर कुटुंबाप्रमाणे इंग्लंडहून अमेरिकेत बॉस्टनला आपले नशीब काढण्यासाठी स्थलांतरित झाले होते. मेणबत्त्या बनविण्याच्या उद्योगावर सतरा मुलांचे कुटुंब चालवणे ओढग्रस्तीचे असल्याने इच्छा असूनही छोट्या चुणचुणीत, हुशार बेंजामिनला चांगल्या शाळेत घालणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांनी मेणबत्त्यांच्या व्यवसायात त्याला रुजू केले. तेथे पुस्तकांच्या जगात फ्रँकलिन यांचे मन रमले व चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणही सुरू केले. जेम्स एक साप्ताहिक काढत असे. त्यात गुपुचूपपणे फ्रँकलिन यांनी आपले लिखाण छापून आणले. त्या लिखाणाची बरीच प्रशंसा झाली. लेखनस्वातंत्र्य व मुद्रणस्वातंत्र्य यांचा फ्रँकलिन यांनी पुढे हिरीरीने पुरस्कार केला. विचारस्वातंत्र्याशिवाय ज्ञानविज्ञानाची प्रगती होणार नाही, असे मत त्यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी आग्रहाने मांडले. उमेदवार कामगारांना छापखान्यात मारहाण चालत असे आणि पुरेसे जेवणही मिळत नसे. या छळातून सुटका व्हावी म्हणून फ्रँकलिन 1723 मध्ये न्यूयॉर्कला पळून गेले. न्यूयॉर्क, लंडन अशी भटकंती व अत्यंत काबाडकष्टाचे जीवन याला तोंड देत अखेर 1727 मध्ये ते परत फिलाडेल्फियाला आले व आपला स्वत:चा छापखाना काढण्याची इर्षा पुरी केली.
1723 मध्ये त्यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन सुरू केले. त्यावर बोधवाक्ये, चुटके आणि विचारप्रवर्तक माहिती मोजक्या शब्दांत दिली जाई. लोक पुस्तके वाचत नाहीत, पण दिनदर्शिकेवरील संदेशांचा विचारचालनेस उपयोग होतो असा त्यांना अनुभव आला. ‘फिलाडेल्फिया गॅझेट’ हे वृत्तपत्रही त्यांनी सुरू केले. मोठ्या कष्टाने व हुशारीने धंद्यात जम बसवून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनालाही सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेले वाचनालय ‘फिलाडेल्फिया सार्वजनिक ग्रंथालय’ म्हणून नावारुपाला आले. हॉस्पिटल, आग विमा कंपनी, महाविद्यालय अशा सार्वजनिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा पुढाकार होता. पुढे त्यांनी अमेरिकेतील तेरा वसाहतींनी एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडला आणि वसाहतींच्या स्वातंत्र्यलढ्यातील वाटाघाटीत पुढाकर घेतला. अमेरिकन संयुक्त संस्थानचे एक राष्ट्र स्थापण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा वाटा होता. पण या सगळ्यापेक्षाही त्यांचे नाव अजरामर केले ते त्यांच्या पतंगाने जमिनीवर आणलेल्या विजेने!