जन्म: १७ मे १७४९.
मृत्यू: २४ जनेवारी १८२३.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र.
एडवर्ड जेन्नर
Edward Jenner
इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
जन्म : 17 मे, 1749
मृत्यू : 24 जानेवारी, 1823
देवीची लस टोचणारा पहिला डॉक्टर
आज देवीरोगाचे जगातून उच्चाटन झाले असले तरी जगभर विविध ठिकाणी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत देवीरोगाचा हाहाकार चालूच होता. अठराव्या शतकात तर एकट्या यूरोप खंडात सहा कोटी माणसे देवीरोगाच्या साथीत बळी पडली. या रोगाचे जगातून समूळ उच्चाटन करण्यात यश आले ते 1980 च्या सुमारास. या यशात देवी प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा वाटा होता. आज अनेक रोगांवर प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. रोगप्रतिबंधक लस ही संकल्पना प्रयोगाने व शास्त्रीय पध्दतीने शोधून काढणारा वैज्ञानिक म्हणजे एडवर्ड जेन्नर.
इंग्लंडमधील ग्लुस्टरशायर परगण्यात जन्मलेल्या जेन्नर यांना शाळेत असल्यापासून जीवशास्त्राची गोडी होती. त्यामुळेच त्यांनी पुढे वैद्यकीय शिक्षण घेतले. त्या काळी डॉक्टर होण्यासाठी अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली प्रशिक्षण घ्यावे लागे. एकवीस वर्षांच्या जेन्नर यांनी लंडनमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये तत्कालीन प्रथितयश डॉक्टर हंटर यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरूवात केली. डॉ. हंटर यांचे असे मत होते की जेन्नर यांनी डॉक्टर झाल्यावर शहरात न राहता खेड्यात वैद्यकीय व्यवसाय करावा. जेन्नर यांचा अभ्यासक्रम पुरा झाल्यावर हंटर यांनी त्यांना ग्लुस्टरशयरमधील आपल्या गावी जाण्याचा सल्ला दिला.
त्या काळी आजच्यासारखी प्रभावी औषधे अस्तित्वात नव्हती, तसेच रोगप्रतिबंधक उपायही फारसे ज्ञात नव्हते. तेव्हा पारंपरिक पध्दतीची झाडपाल्याची औषधे वापरात होती. देवी रोगाला औषध नव्हते. पण असा अनुभव होता की, एकदा देवी झालेल्या माणसाला पुन्हा देवी येत नसत. देवीच्या जंतूंवर प्रक्रिया करून ते सौम्य करून टोचण्याची पध्दत भारतात वापरली जात होती. परंतु अशी लस टोचलेल्यापैकी काही जण देवीच्या रोगाला बळी पडण्यापासून वाचत असले तरी त्यातील काही या लसीमुळेच होणाऱ्या देवीरोगाला बळी पडत होते.
देवी प्रतिबंधक लसीचा शोध: जेन्नर यांना आपला व्यवसाय करताना ग्लुस्टरशायरमधील लोकांकडून समजले की, गाईंना होणा देवीरोगाची ज्या गवळ्यांना लागण झालेली असते त्यांना देवीरोग होत नाही. या गोष्टीचा जेन्नर यांनी शोध घेण्यास सुरूवात केली. गाईच्या देवीची लागण झालेल्या सत्तावीस माणसांचा जेन्नर यांनी अभ्यास केला व प्रत्येक निरीक्षण काळजीपूर्वक लिहून ठेवले. त्यांना आढळून आले की, खरोखरीच अशा माणसांचा देवीच्या रोग्याशी संपर्क आला तरी त्यांना देवी येत नाहीत. नंतर त्यांनी देवीच्या रोग्याच्या खपल्यातील द्रव या सत्तावीस जणांना टोचला तरी देखील देवी न येता ते सुरक्षित राहिले.
आता या निरीक्षणानंतर जेन्नर यांनी एक अत्यंत धाडसी प्रयोग करायचे ठरविले. जिमी फिप्स नावाचा त्यांच्या ओळखीचा एक आठ वर्षांचा मुलगा होता. त्याच्या आईवडिलांना आपल्या प्रयोगाचे महत्व समजावून देऊन जिमीवर प्रयोग करण्यासाठी त्यांची परवानगी घेतली. या लहानग्या जिमीचे आणि त्याच्या आई-वडिलांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे! जेन्नर यांनी जिमीला गाय-देवीचे विषाणू टोचून त्याच्यात गाय-देवी रोग उत्पन्न केला. जिमी बरा झाल्यानंतर जेन्नर यांनी माणसाच्या देवीरोगाचे जंतू जिमीला टोचले आणि त्याच्याबरोबर गाय-देवीरोग न झालेल्या दुसऱ्या माणसालाही हे जंतू टोचले. त्यात असे दिसून आले की, जिमीला देवी आल्या नाहीत, दुसऱ्या माणसाला मात्र देवी आल्या. आजच्या काळात माणसांवर असे प्रयोग करणे वैद्यकीय नीतीशास्त्रात व कायद्यात बसत नाही. आज प्रयोगासाठी विविध प्राण्यांचा उपयोग करतात. पण त्या काळी ही पध्दत विकसित झालेली नव्हती.
आपली निरीक्षणे जेन्नर यांनी प्रसिद्ध केल्यावर सर्वत्र खळबळ माजली. जेन्नर यांनी आपली निरीक्षणे काटेकोरपणे लिहून ठेवलेली असल्याने हा शोध विज्ञान जगतात पटवून देणे त्यांना शक्य झाले. जेन्नर यांचे जगभर कौतुक झाले. त्यांनी उभारलेल्या भक्कम पायावर देवीरोगाला प्रतिबंधक करणारी प्रभावी लस निर्माण करून त्या रोगाचे नियंत्रण आणि अंतिमत: निर्मूलन करणे शक्य झाले. एवढेच नव्हे तर इतर रोगांवर लस निर्माण करण्याचा मार्ग खुला झाला व लसनिर्मिती शास्त्रशाखेच्या विकासाचा पाया घातला गेला. जेन्नर यांचे आपल्यावरील ऋण महानच आहे, पण त्याचबरोबर प्रयोगासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या जिमीसारख्यांचे ऋणही आपल्यावर आहे.