जन्म: २० जनेवारी १७७५.
मृत्यू: १० जून १८३६.
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञान.
आंद्रे ऑम्पेर
André-Marie Ampère
फ्रेंच पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ
जन्म: 20 जानेवारी, 1775
मृत्यू: 10 जून, 1836
मोलाचे योगदान
‘इलेक्ट्रिसिटी’ हा शब्द प्रथम इंग्लिश शास्त्रात विल्यम गिल्बर्ट यांनी 16 व्या शतकात अखेरीस वापरला, तरी खऱ्या अर्थाने ‘विद्युतयुग’ सुरू होण्यास 18वे शतक उजाडावे लागले. इटालियन भौतिकशास्त्र व्होल्टा यांनी पहिली बॅटरी तयार केल्यानंतर विद्युतप्रवाहाच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग करणे शक्य झाले. व्होल्टा यांची बॅटरी म्हणजे आजच्या बॅटरीचा आद्य नमुना.
पुढे 19व्या शतकाच्या सुरूवातीला डॅनिश शास्त्रज्ञ हॅन्स ख्रिश्चन ओरस्टेड यांनी विद्युत प्रवाहवाहकाशी समांतर टांगलेली चुंबकीय सुई विद्युतप्रवाहाशी 90 अंशाने फिरून स्थिरावते, हे शोधून काढले. विद्युतवाहक आणि चुंबकीय सुई यांच्यामध्ये काच, लाकूड, दगड इ. अवाहक असले तरी चुंबकीय सुई दिशा बदलते. ओरस्टेड यांच्या या प्रयोगातून विद्युत व चुंबकत्व यांचा निकटचा संबंध स्पष्ट झाला.
ओरस्टेड यांनी 11 सप्टेंबर, 1820 रोजी पॅरीसच्या विज्ञान अकादमीत या प्रयोगावरचा आपला निबंध वाचला. हा शोध इतका महत्वाचा व वेधक होता की, पुढील चार महिने त्यावर सखोल चर्चा चालू राहिली. याच सुमारास फ्रेंच शास्त्रज्ञ आन्द्रे ऑम्पेर हेही विद्युतप्रवाहावर प्रयोग करत होते व ओरस्टेडच्या निबंधानंतर आठच दिवसात ऑम्पेर यांनीही आपले निष्कर्ष सादर केले.
ऑम्पेर यांनी नंतर धातूच्या दोन तारा समांतर उभ्या करून त्यातून विद्युतप्रवाह सोडला. विद्युतप्रवाह दोन्ही तारांत एकाच दिशेने सोडला तेव्हा दोन्ही तारा एकमेकांकडे ओढल्या जातात म्हणजेच आकर्षित होतात, असे त्यांना आढळून आले. मग त्यांनी एका तारेतील विद्युतप्रवाहाची दिशा बदलली ज्यायोगे या दोन तारेतील प्रवाह एकमेकांच्या विरूध्द दिशेला वाहत होता. आता त्यांना आढळले की, तारा एकमेकांपासून दूर ढकलल्या गेल्या म्हणजे त्यांच्यात प्रतिकर्षण निर्माण झाले होते. या निरीक्षणाचे आणि चुंबकातील चुंबकीय ध्रुवांमधील आकर्षण-प्रतिकर्षण क्रियेशी साधर्म्य होते.
विद्युतप्रवाह वाहताना दोन तारांमध्ये यांत्रिक परस्पर क्रिया घडते व त्या एकमेकांमध्ये गती निर्माण करतात. ऑम्पेर यांनी या दोन तारांमधले अंतर व दोहोतल्या विद्युतप्रवाहांचे प्रमाण यांचा संबंध त्या दोन तारांमध्ये निर्माण होणाऱ्या आकर्षण-प्रतिकर्षण प्रेरणांशी गणिती सुत्राच्या रूपात लावून दाखविला. त्यांनी असेही सिध्द केले की, चुंबकत्व निर्मितीसाठी चुंबकत्वाची गरज नाही. फक्त विद्युत प्रवाह वापरून चुंबकत्व निर्माण होते. चुंबकाच्या भोवती असणाऱ्या प्रेरणाक्षेत्रासारखेच क्षेत्र विद्युतप्रवाह वाहकाभोवती अस्तित्वात असते. नंतर काही वर्षांनी सिध्द केले की, लोहचुंबकातील चुंबकत्व हेसुध्दा त्याच्या रेणूंमधील विद्युतप्रवाहांमुळे आलेले असते.
सरळ तारांमधील प्रयोगानंतर ऑम्पेर यांनी तारांच्या वेटोळ्यावर (Coil) प्रयोग सुरू केले. पोलादी पट्टीभोवती गुंडाळलेल्या तारेमधून विद्युतप्रवाह सोडला तर ती पट्टी (वेटोळे) पट्ट-चुंबकासारखे ( Bar-Magnet) कार्य करते आणि त्याच्या दोन्ही टोकांना विरुध्द चुंबकीय ध्रुव तयार होतात. तारेचे वेढे जेवढे जास्त तेवढा चुंबकीय परिणाम जास्त असतो. या वेटोळ्यांना त्यांनी ‘सोलोनाईड’ असे नाव दिले. या सोलोनाईडचा वापर करून त्यांनी पोलादी सुयांमध्ये कायमस्वरूपी चुंबकत्व निर्माण करून दाखविले. खरे तर त्यांना विद्युतचुंबकत्वाचा शोध लागावयास हवा होता. पोलादात कायमस्वरूपी चुंबकत्व येते त्याऐवजी त्यांनी मृदु-लोखंड (Soft iron) वापरले असते तर विद्युत चुंबकाच्या शोधाचे श्रेय त्यांना मिळाले असते.
ओरस्टोडच्या विद्युत व चुंबकत्व यांच्या निकटच्या संबंधात शोधाने आणि ऑम्पेर यांच्या विद्युत गणितशास्त्राच्या मूलतत्वांच्या मांडणीमुळे व्होल्टा, हेन्द्री, फॅराडे यांनी या क्षेत्रात पुढे केलेल्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. त्याआधारे विद्युत जनित्रे, मोटर्स वगैरे यंत्रनिर्मिती शक्य झाली व विजेचा व्यावहारिक उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. विद्युतशक्तीच्या वापरामुळे औद्योगिक तंत्र, वाहतूक आणि गृहसुविधा यांच्यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आले.
ऑम्पेर यांचा जन्म 20 जानेवारी 1775 मध्ये लियो शहरात झाला. त्यांचे वडील एक मोठे व्यापारी होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत त्यांचा 1793 मध्ये गिलोटीनवर शिरच्छेद करण्यात आला. त्याचा फार मोठा धक्का ऑम्पेर यांना बसला. वडिलांची सर्व मालमत्ता गेल्याने त्यांनी शिकवण्या करून आपले शिक्षण चालू ठेवले. लहानपणापासून त्यांना गणितात विशेष गोडी व गती होती व त्यांचे प्रारंभीचे संशोधन ‘संभाव्यताशास्त्राचे नियम’ यावर होते. परंतु केवळ पुस्तकी संशोधनात त्यांना रस नव्हता. सिध्दांताबरोबरच प्रत्यक्ष प्रयोग आणि ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग या दृष्टीने त्यांचे सर्व संशोधन झाले. प्रकाशशास्त्र, वायूविषयक सिध्दांत, रेणू-पदार्थविज्ञान, प्राण्यांच्या शारीरिक, मानसशास्त्र इत्यादी अनेकविध क्षेत्रात त्यांनी संशोधन केले.
आजदेखील ऑम्पेर यांचे नाव अजरामर आहे कारण सन 1881 मध्ये विद्युतप्रवाह मोजण्याच्या एककास ‘ऑम्पेर’ असे नाव दिले गेले.