Menu

चार्ल्स डार्विन

(Charles Robert Darwin)

जन्म: १२ फेब्रुवारी १८०९.
मृत्यू: १९ एप्रिल १८८२.
कार्यक्षेत्र: जीवशास्त्र, निसर्गअभ्यास.

चार्ल्स डार्विन
Charles Robert Darwin
इंग्लिश निसर्गअभ्यासक, जीवशास्त्रज्ञ
जन्म: 12 फेब्रुवारी, 1809
मृत्यू: 19 एप्रिल, 1882

शास्त्रीय उत्क्रांतीवादाचा जनक

विज्ञानाच्या इतिहासात ज्या महान शोधांनी शास्त्रीय प्रगतीबरोबरच समाजातील पारंपरिक विचारांना धक्का देऊन आमूलाग्र नवी दिशा दिली, त्यामध्ये डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाचे स्थान अनन्यसाधरण आहे.
पृथ्वीवरील असंख्य जीवजाती, त्यांच्यातील विभिन्नता आणि विविधता ही ईश्वराने एकाच वेळी निर्माण केलेली नसून ती जीवसृष्टीच्या एकाच समाईक व क्रमश: झालेल्या विकासातून (ऑरगॅनिक इव्होल्यूशन) निर्माण झालेली आहे ही कल्पना काही आद्य ग्रीक तत्ववेत्यांमध्ये बीजरूपात आढळते. पण मध्यंतरी अनेक शतके झाकोळलेली उत्क्रांतीची कल्पना पुन्हा पुढे येऊ लागली ती फ्रेंच क्रांतिपूर्व काळात युरोपात वैचारिक मंथन सुरू झाले तेव्हा. चार्ल्स डार्विन यांचे आजोबा इरॅसमस डार्विन यांनी इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये लामार्क व सेंट हिलारिया यांनी आणि जर्मनीमध्ये गोएटे यांनी हा विचार मांडला होता. परंतु तेव्हा त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. कारण राजकीय आणि सामाजिक वातावरण धर्माचा पगडा असलेले, परंपरावादी होते. तसेच आपल्या सिध्दांतांना पुरेसा शास्त्रीय आधार उभा करणे या शास्त्रज्ञांना साधले नव्हते.
चार्ल्स डार्विन यांनी पुराव्याचा अभेद्य डोंगर रचून ‘उत्क्रांतीवादा’ला भक्कम वैज्ञानिक पायावर उभे केले आणि तो 1859 मध्ये पुस्तक रूपाने जगापुढे मांडला तेव्हा मात्र जगभर खळबळ माजली.
डार्विनचा सिध्दांत: पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी जीवन हे ईश्वराने इ.स.पूर्व 4404 साली निर्माण केले, वेगवेगळ्या प्रकारची जीवरूपे ईश्वराने स्वतंत्रपणे निर्माण केली व नंतरच्या काळात त्यांच्यात कोणताही फरक पडलेला नाही, हा बायबलप्रणित सिध्दांत भरपूर पुराव्यांसह पर्यायी सुसंगत सिध्दांत मांडून डार्विन यांनी खोडून काढला. जीवसृष्टीमध्ये लाखो वर्षांच्या काळात बदल होत गेले आहेत, असे प्रतिपादन करून हे बदल का व कसे होत गेले आहेत हेही त्यांनी सप्रमाण मांडले.
वनस्पती व प्राणी जातींमध्ये जिवंत राहण्यासाठी व प्रजोत्पादनासाठी स्पर्धा चाललेली असते. निसर्गाच्या झगड्यामध्ये ज्या जीवजातींमध्ये सभोवतालच्या विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहण्यायोग्य गुणधर्म असतात, अशाच जाती जिवंत राहतात; म्हणजे निसर्ग जगण्यासाठी त्यांची निवड करतो, हा नैसर्गिक निवडीचा सिध्दांत डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाचा गाभा आहे.
बहुतेक वनस्पती विपुल प्रमाणात बीज निर्माण करतात. क्लिमेंत तिमिरियाझेव या शास्त्रज्ञाने गणित करून अंदाज केला की, डॅडीलियॉन या फुलझाडाची सर्व बीजे अंकुरत झाली तर पृथ्वीवरील जमिनीच्या पंधरा पट क्षेत्र ही झाडे व्यापतील, एका मोसमातील एका माशीची संपूर्ण प्रजा जगली तर त्यांचा पृथ्वी ते चंद्र असा मोठा स्तंभ तयार होईल. पण प्रत्यक्षात असे घडत नाही. बहुसंख्य वनस्पती आणि प्राणी जीवनकलहात टिकत नाहीत. त्यांच्यापैकी लायक तेवढेच टिकतात. या लायकचा अर्थ बलवान किंवा सहनशील होता का? तर नाही! हे लायकपणा अवलंबून असते विशिष्ट परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मावर.
झाडांच्या बुंध्यांवर विसावलेल्या फुलपाखरांचा रंग बुंध्याच्या रंगाशी जुळणारा असतो. समजा यातील काही फुलपाखरांना बुंध्यांच्या रंगाशी जास्त साम्य असलेल्या रंग प्राप्त झाला तर फुलपाखरे शोधणे अधिक अवघड होईल. म्हणजेच ही फुलपाखरे व इतर प्रजा यात फरक असेल. म्हणजेच फुलपाखराची नवीन जात तयार झालेली असेल. येथे रंग या गुणधर्माचे उदाहरण घेतले. परंतु, ‘निवडीचा रेटा’ व परिस्थितीनुरूप आनुवंशिकतेव्दारा होणारे बदल ही तत्वे इतर गुणधर्माबाबत एकएकट्याने अथवा एकत्रितपणे लागू होऊ शकतात. या प्रक्रियेला डार्विन यांनी निसर्गनिवडीतून जीवजातींचे उत्पत्ती असे म्हटले आहे.
डार्विन यांचा हा सिध्दांत प्रचंड कष्टाने व शिस्तीने मिळविलेल्या पुराव्यावर आधारला होता. दक्षिण अमेरिकेच्या सफरीवर निघालेल्या ‘एच एम एस बीगल’ या बोटीतील सफरीत डार्विन यांनी निरनिराळ्या बेटांवरून प्राणीजीवनाचे असंख्य नमुने गोळा केले. ‘बीगल’ सफरीत गोळा केलेली माहिती व नमुने यांचे काटेकोर विश्लेषण करीत असतानाच डार्विन यांनी कबुतरखाना तयार करून निरनिराळ्या जातींच्या कबुतरांवर पैदाशीचे प्रयोग केले. तसेच त्यांनी निरनिराळ्या प्राण्यांची शरीरे व त्यांचे गर्भ यांचा तुलनात्मक अभ्यास केला. जीवशास्त्र, प्राणी व वनस्पतींचे भौगोलिक वितरण यांचा आधार घेऊन वकिली कौशल्याने आपले युक्तिवाद मांडले. 24 नोव्हेंबर 1859 रोजी ‘निसर्ग निवडीतून जीवजातींची उत्पत्ती’ (ओरिजन ऑफ स्पेसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन स्ट्रगल फॉर लाईफ) हे पुस्तक प्रसिध्द केले. नाव बोजड असले तरी या पुस्तकाच्या सर्वच्या सर्व म्हणजे 1250 प्रती एका दिवसात संपल्या. या पुस्तकावर डार्विन यांनी 15 वर्षे अथक श्रम केले होते.
याच वेळेत आलफ्रेड वॅलेस या तरूण शास्त्रज्ञाने स्वतंत्रपणे निरीक्षणे व नमुने गोळा करून उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला व तो निबंध ‘रॉयल सोसायटी’कडे पाठविला होता. वैज्ञानिक शोध हे अनेकदा एकाच वेळेस लागतात, याचे हे आणखी एक उदाहरण. डार्विन यांची सर्व मेहनत फुकट जाऊन उत्क्रांतीचे श्रेय वॅलेसला मिळणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला. परंतु, डार्विन यांचे अनेक वर्षांचे काम पाहून वॅलेसने डार्विन यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. तो निबंध दोघांच्या नावाने प्रसिध्द झाला.
सामाजिक महत्व: डार्विन यांचे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. कारण त्यामुळे ‘ईश्वराने सृष्टी निर्माण केली व तीही फक्त सात दिवसात(!)’ या बायबलच्या शिकवणुकीला, या पर्यायाने चर्चच्या सत्तेलाच, धक्का बसला होता. साहजिकच, धर्मगुरूंनी दंड थोपटले. प्रचंड वादंग माजले. शेवटी ‘ऑक्सफर्डची लढाई’ या नावाने प्रसिध्द असलेल्या वैचारिक वादात हक्सले व इतर शास्त्रज्ञांनी डार्विन यांचा सिद्धांत उचलून धरला. नंतर बऱ्याच वर्षांनी रोमन कॅथॉलिक चर्चनेही तो मान्य केला. डार्विन यांचा, वैज्ञानिक विचारप्रणालीचा विजय झाला.
डार्विन यांच्या सिध्दांताने जीवशास्त्राला नवी दिशा दिली. माणसामाणसातील, निसर्ग व माणूस यांच्यातील व एकूणच सजीवसृष्टीतील एकात्मतेला त्यांनी वैज्ञानिक आशय प्राप्त करून दिला. परंतु, त्यावेळचे निसर्गशास्त्र ‘वंश वृक्ष’ तयार करण्यातच अडकवून पडले. वनस्पती व प्राणी यांच्यातील अंतर्गत प्रक्रियांकडे किंवा वंशानुक्रमे होणारे रूपांतर नेमके कसे होते, अशा प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे डार्विन यांच्या सिध्दांतातील कमकुवत भाग म्हणजे ‘जीवसृष्टीत दिसणारी यदृच्छ विभिन्नता’ याचे स्पष्टीकरण त्यामध्ये मिळू शकले नाही. पुढे डार्विन यांचे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर दहा वर्षांनी मेंडेल या धर्मगुरू शास्त्राज्ञाने काटेकोर प्रयोग करून ‘जेनेटिक ट्रान्समिशन’चा (अनुवंशिक वाहन) सिध्दांत मांडला व आनुवंशशास्त्राचा पाया घातला.
डार्विन यांचा आधार घेऊन ‘बळी तो कान पिळी’, ‘श्रेष्ठ वंश’, ‘आर्थिक स्पर्धेत लायक तोच टिकणार’ असे विचार राजकारणी व व्यापारी वर्गाने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रसृत केले. ते इतके पराकोटीला गेले की, त्यातून ‘नाझी सुपरमॅन’ची कल्पना पुढे येऊन नाझीवादाचा भस्मासूर उभा राहिला. त्या आधारे दुर्बलांची पिळवणूक, वांशिक अत्याचार, आक्रमक युध्द, यांचे समर्थन करण्यात येऊ लागले. एका वैज्ञानिक संकल्पनेला विकृत रूप देऊन स्वार्थासाठी वापरले गेल्याचे यापेक्षा धक्कादायक दुसरे उदाहरण नसावे.