जन्म: २२ जुलै १८२२.
मृत्यू: ०६ जनेवारी १८८४.
कार्यक्षेत्र: निसर्ग वैज्ञानिक.
ग्रेगॉर मेंडेल
Gregor Mendel
ऑस्ट्रियन निसर्ग वैज्ञानिक
जन्म: 22 जुलै, 1822
मृत्यू: 6 जानेवारी, 1884
आनुवंशशास्त्राचा जनक
एकोणिसाव्या शतकात लागलेला एक क्रांतिकारक शोध म्हणून डार्विनच्या ‘उत्क्रांतीवादा’च्या सिध्दांताचा उल्लेख केला जातो. साधरणत: त्याच सुमारास तितक्याच महत्वाचा शोध म्हणजे मेंडेल यांचे ‘आनुवंशिकतेचे नियम’ (Laws of heredity) या नियमांपासूनच पुढे अनुवंशशास्त्रासारख्या (Genetics) महत्वाच्या शाखेचा विस्तार झाला.
ग्रेग्रार जे मेंडेल (1822-84) हे ऑस्ट्रियन धर्मगुरू होते. व्यवसायाने धर्मगुरू असूनसुध्दा आवड म्हणून बागबगीचे व विविध वनस्पतींचा अभ्यास ते करत असत. प्रचंड कार्यनिष्ठेने व योजनापूर्वक संख्यात्मक अभ्यासाच्या साहाय्याने त्यांनी वनस्पतींवर आठ वर्षे संशोधन केले.
मेंडेल यांनी बगीचात सहजपणे वाढणारी ‘वाटाणा’ ही वनस्पती प्रयोगासाठी निवडली. या वनस्पतीतील गुणधर्माच्या एकूण सात प्रकारांचा त्यांनी अभ्यास केला. हे गुणधर्म परस्परविरोधी होते. उदा. काही झाडे उंच तर काही खुजी, काहींची फुले लाल तर काहींची पांढरी, काहींच्या शेंगा पोकळ तर काहींच्या भरीव इत्यादी. या झाडांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे एका फुलातील स्त्रीकेसर हे त्याच फुलातील पुंकेसरापासून फलित होत. म्हणजेच नवीन झाडाचे मातृत्व व पितृत्व एकाच झाडाकडे असे. त्यामुळे एका झाडापासून वाढवलेल्या दुसऱ्या झाडाचे गुणधर्मही तेच असत. म्हणजेच उंचपणाच्या बाबतीत ते झाड ‘अस्सल’ असते. त्याचप्रमाणे एखाद्या झाडाचे ‘खुजेपण’ हेसुध्दा अस्सल वैशिष्ट्य होते.
मेंडेल यांनी आपल्या प्रयोगासाठी एक ‘अस्सल’ उंच झाड व एक ‘अस्सल’ खुजे झाड घेतले व एका झाडाचे स्त्रीकेसर हे दुसऱ्या झाडाच्या पुंकेसरापासून फलित केले. या संयोगातून निर्माण झालेल्या ‘प्रथम पिढी’तील झाडाला त्यांनी संकर (Hybrid) असे नाव दिले. या संकरीत झाडामध्ये ‘बुटके’पणाच्या गुणधर्मावर ‘उंच’पणाचा गुणधर्म मात करतो. म्हणून प्रथम पिढीतील (Fl) सर्व संकरीत झाडे ‘उंच’ होती हा मूळ झाडांपैकी एका झाडाचा गुणधर्म मात करतो. तेव्हा खुजेपणाच्या गुणधर्माचे काय झाले, हे तपासण्यासाठी त्यांनी संकरीत झाडामध्ये स्वपरागीकरणाने पुन्हा संयोग घडून आणला. या व्दितीय पिढीतील (F2) चारपैकी तीन झाडे ‘उंच’ तर एक झाड ‘खुजे’ होते.
या आपल्या निरीक्षणाच्या साहाय्याने त्यांनी ‘वर्चस्वाचा’ (मात करण्याचा) नियम मांडला.
‘एकाच गुणधर्मातील दोन भिन्न प्रकारांचा (‘उंचपणा व खुजेपणा’ यांचा) संयोग घडवून आणला असता, प्रथम पिढीत एक प्रकाराचा गुणधर्म दुसऱ्या प्रकाराचा गुणधर्म झाकून टाकतो. या झाकणाऱ्या गुणधर्मास ‘वर्चस्वी गुणधर्म’ (Dommant), तर झाकलेल्या गुणधर्मास (Recessive) ‘दबलेला गुणधर्म’ असे म्हणतात. हा दबलेला गुणधर्म प्रथम पिढीत लुप्त न होता. ‘सुप्त’ राहतो. व व्दितीय पिढीत पुन्हा दिसून येतो. ‘वर्चस्वी’ व ‘दबलेल्या’ गुणधर्माचे प्रमाण दुसऱ्या पिढीत 3:1 असे असते. पुढे मेंडेल यांना असे दिसून आले की;
1) आनुवंशिकतेमध्ये प्राण्यांचे गुणधर्म हे ‘घटक’ स्वरूपात असतात व ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गणिती नियमांनुसार संक्रमित होतात.
2) प्रथम पिढीत नेहमी ‘वर्चस्वी’ गुणधर्मच दृष्टिगोचर होतो.
3) एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाताना ‘घटकांवर’ संयोगाचा परिणाम होत नाही, त्यात बदल होत नाही, व हे घटक स्वतंत्र्य व्यवस्थापनाच्या नियमानुसार संक्रमित होतात.
मेंडेल यांच्या क्रांतिकारक संशोधनाच्या नंतर थोडक्यात काळात सटन व इतर वैज्ञानिकांच्या असे निदर्शनाला आले की ‘अनुवंशिक गुणधर्माचे घटक’ ज्यांना ‘मेंडेलचे घटक’ असे नाव होते, हे गुणसूत्रांवर आधारित असतात.
1909 मध्ये जोहानसेन या शास्त्रज्ञाने ‘मेंडेलच्या घटकां’ना जीन्स (जुनके) असे नाव दिले. रासायनिकदृष्या ‘जनुक’ हे डीऑक्सीरायबोन्युक्लिक अॅसिड (डीएनए) या आम्लापासून बनलेले असतात. 1953 साली वॅटसन व क्रिक या शास्त्रज्ञांना त्यांनी लावलेल्या डीएनएच्या संरचनेबद्दल ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले. सध्याच्या शास्त्रानुसार जनुक हे आनुवंशिकतेचे घटक असून ते गुणसुत्रांवर माळेतील मण्यांप्रमाणे एका मागोमाग एक असतात. साधरणत: जनुक स्थिर असतात. परंतु त्यांच्यामध्ये अचानक बदल घडून येऊ शकतो. मेंडेल यांच्यानंतर अनुवंशशास्त्रामध्ये व त्यावर आधारित तंत्रविज्ञानामध्ये बरीच प्रगती झाली आहे. या सर्वांचा पाया मेंडेल यांनी केलेल्या मूलभूत संशोधनात आहे.