Menu

लुई पास्तर

(Louis Pasteur)

जन्म: २७ डिसेंबर १८२२.
मृत्यू: २७ सप्टेंबर १८९५.
कार्यक्षेत्र: जीवशास्त्र.

लुई पास्तर
Louis Pasteur
फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
जन्म: 27 डिसेंबर, 1822
मृत्यू: 27 सप्टेंबर, 1895

सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक

सूक्ष्म जीवजंतूंमूळे रोग होतात, हे सिध्द करून त्यांवर रोगप्रतिबंधक लसीचा शोध लावणारा आणि सूक्ष्म जीवशास्त्राचा जनक म्हणून अजरामर झालेला लुई पास्तर हा मुळात रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. चामडे कमावणाऱ्या सामान्य कुटुंबात जन्मलेला, हा तल्लख बुध्दीचा प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्राकडे वळला तो एका प्रश्नाचा मागेवा घेताना. लीली येथील मद्य तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये तयार करण्यात आलेली बीअर काही काळाने आंबट होत असे. आंबवण्याच्या नेहमीच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या यीस्टऐवजी सूक्ष्म जीवाणूंची (पास्तर यांनी त्यांना “व्हिब्रिओज’ नाव दिले होते.) वाढ झाल्याने असे होते, हे पास्तर यांनी शोधून काढले. आंबवण्याची क्रिया ही जीव प्रक्रियेची अभिव्यक्ती आहे हे त्यांनी सिद्ध केले. त्यापूर्वी आंबवण्याची क्रिया ही केवळ रासायनिक असते, असा समज होता. एकदा हा महत्त्वाचा धागा मिळाल्यावर पास्तर तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी प्रदीर्घ संशोधन करून जीवजंतूजन्य रोग सिध्दांत (जर्म थिअरी) उभा केला.
पास्तरपूर्वीही काही लोकांनी किण्व (आंबवणे) आणि कुजणे (प्युट्रीफिकेशन) या क्रिया चिघळलेल्या जखमांमध्ये दिसतात व याला सूक्ष्मजीव कारणीभूत असावेत, असे संदिग्ध अंदाज व्यक्त केले होते. पास्तर यांनी संशयाला वाव राहणार नाही असे काटेकोर प्रयोग करून या क्रिया सूक्ष्मजीवांमुळे घडतात, हे निर्विवाद सिद्ध केले. जंतूजन्य रोग या सिध्दांताला डॉक्टरांचा विरोध होता, पण पास्तर यांच्या प्रयोग-प्रामाण्यामुळे हा विरोध दुबळा होऊन रोगांतील सूक्ष्मजीवांच्या भूमिकेची दखल घेणे सुरू केले.
पास्तर यांनी मेंढ्या व गुरांच्या “अँथ्रॅक्स’ नावाच्या रोगावरील संशोधनाने जंतूजन्य रोग सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले. हा जीवाणू रोग एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे संसर्गाने पसरतो हे तर त्यांनी सिद्ध केलेच पण त्याचबरोबर “अँथ्रॅक्स’चे जीवाणू प्रयोगशाळेत वेगळे करून कृत्रिम माध्यमात त्याचे संवर्धन केले व पुन्हा निरोगी प्राण्यांना टोचून रोग उत्पन्न करून दाखवला. जीवाणूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झाल्याने रोगप्रतिबंधक लस तयार करणे शक्य झाले. त्याचबरोबर रोगाच्या अचूक निदानासाठी प्रयोगशाळेचा वापर सुरू झाला. पास्तर व कोरव यांचे “अँथ्रॅक्स’वरील काम व कोरवने 1882 मध्ये क्षयाचे जीवाणू वेगळे करण्यात मिळवलेले यश यामुळे दोन दशकांत बहुतांशी जीवाणू रोगांचा शोध लागला.
रोगप्रतिबंधक लस: जीवाणूंचे संवर्धन शक्य झाल्यावर पास्तर यांनी लस निर्माण करण्यावर भर दिला. जेन्नर (1749-1823) याने गाईला होणाऱ्या देवी रोगाचे विषाणू (व्हायरस) टोचून देवी रोगापासून संरक्षण मिळवता येते, हे पूर्वीच दाखवून दिले होते. पण त्याला प्राण्यांमधील रोगप्रतिकारशक्तीच्या प्रक्रियेबद्दल स्पष्टता नव्हती. जेन्नरचा धागा पकडून “अँथ्रॅक्स’वर प्रतिबंधक लस तयार करता येईल, अशी कल्पना पास्तर यांना आलेली होती. परंतु प्रश्न होता लस तयार करण्याकरता असे जीवाणू जे शरीरात रोगप्रतिकारकशक्ती तर निर्माण करतील पण रोग मात्र होऊ देणार नाहीत ते मिळवण्याचा. या प्रश्नाचे उत्तर पास्तर यांना अपघातानेच मिळाले. कोंबडीच्या कॉलऱ्यावर काम करत असताना प्रयोगशाळेत वाढवलेले काही जीवाणू काही काळानंतर रोग निर्माण करण्यास असमर्थ ठरल्याचे त्यांच्या लक्षात आले. पास्तर यांच्या तल्लख बुद्धीला यातूनच लस तयार करण्यासाठी आवश्यक असे सौम्य जीवाणू निर्माण करण्याचा मार्ग सापडला. “अँथ्रॅक्स’ रोगाच्या जीवाणूंवर प्रयोग करून त्यांची दाहकता (रोग निर्माण करण्याची शक्ती) हवी तेवढी कमीजास्त करता येते, हे त्यांनी शोधून काढले व लस तयार करून विद्वानांसमोर व शेतकऱ्यांसमोर त्याचे नाट्यमय प्रात्यक्षिकही केले. परिणामी, विरोधकांना पास्तर यांच्या जंतूजन्य रोग सिद्धांताला मान्यता द्यावीच लागली.
आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून होणाऱ्या रेबीज या भयानक रोगावर लस शोधण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. ती तयार करण्यात त्यांना यशही आले. परंतु, सुरुवातीला माणसांना ही लस देण्यास पास्तर तयार नव्हते. पास्तर यांच्याकडे कुत्रे चावलेले काही लोक आले, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणताच उपाय नव्हता. तेव्हा लस टोचण्याचा त्यांच्या ड़ॉक्टरांनी आग्रह केल्यामुळे व त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामळे पास्तर यांनी या लोकांना लस टोचली व त्यांचे प्राण वाचवले. प्रयोग करताना प्राण्यांना, कुत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून ते फार काळजी घेत असत. प्रतिबंधक लसनिर्मितीमागील तात्विक बैठक पक्की झाल्यानंतर घटसर्प, धनुर्वात इ रोगांवरही त्यांनी लस तयार केली.
पास्तर यांनी लावलेले शोध मानवी आरोग्याच्या दृष्टीने क्रांतिकारी असले तरी युरोपातील जनतेच्या आरोग्य सुधारणेला लुई पास्तर यांचा “जीवाणूंमुळे रोग होतो’ हा विचारच मुख्यत: जबाबदार आहे, असे म्हणणे मात्र अतिशयोक्तीच ठरेल. रूडॉल्फ विरचॉव या जर्मन शास्त्रज्ञाने 1847 साली टायफस रोगाची साथ अभ्यासताना अस्वच्छता, दाटीवाटीचे राहणीमान, दूषित पाणी, कुपोषण अशा गरिबीमुळे उद्भवलेल्या सामाजिक पातळीवरील घटकांमुळे समाजात रोगराईचा प्रसार होतो, हे सिद्ध केले. ही वेगळीच दिशा मिळाल्यामुळे आरोग्यात सुधारणा आणि रोगाचा प्रतिबंध व्हावा म्हणून सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, सार्वजनिक स्वच्छता मोहीम आणि कामगारांच्या राहणीमानात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेली सुधारणा या दोन बाबींचा युरोपातील जनतेचे आरोग्य सुधारण्यात फार मोठा वाटा आहे. “जीवाणूंमुळे रोग होतो’ या शोधामुळे आपल्या रुग्णांचे योग्य रोगनिदान करणे इ. कामात डॉक्टरांना खूप उपयोग झाला. लसी तयार करण्याचे शास्त्र उदयाला आले. पण त्या काळातील जनतेचे आरोग्य सुधारण्यात त्याचा वाटा लहान होता.
सामाजिक उपायांपेक्षा वैद्यकीय उपायांचे महत्त्व जास्त आहे, असा समज पसरविणाऱ्यांनी मात्र प्रत्यक्ष इतिहासाकडे पाठ फिरवून या शोधाभोवती एक वलय निर्माण करून ठेवले आहे व त्यायोगे सामाजिक सुधारणांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पास्तर यांना हे मुळीच आवडले नसते. त्यांचा पिंड हा निखळ मानवतावादी होता. त्यांनी आपले सर्व संशोधन मानवतावादी प्रेरणेतून केले. एवढेच नव्हे तर सामाजिक पैलूंबद्दल त्यांना स्पष्ट जाणीव होती. 1888 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या संशोधन संस्थेच्य़ा उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले होते, ”सध्याचे युग म्हणजे दोन परस्परविरोधी प्रवृत्तींमधील लढाई आहे. एका बाजूला रक्तपात, तर दुसऱ्या बाजूला शांतता, आरोग्य, कार्यप्रवणता यांना जोपासणारी, मानवाला ग्रस्त करणाऱ्या संकटापासून वाचवण्यासाठी सतत नवे मार्ग हुडकून काढणारी प्रवृत्ती.”