जन्म: १३ ऑक्टोबर १८२१.
मृत्यू: ०५ सप्टेंबर १९०२.
कार्यक्षेत्र: वैद्यकशास्त्र.
रूडॉल्फ फिरशाव्ह
Rudolf Virchow
जर्मन वैद्यकशास्त्रज्ञ
जन्म: 13 ऑक्टोबर, 1821
मृत्यू: 5 सप्टेबर, 1902
समाजसुधारक वैज्ञानिक
शरीरात कोणते दोष निर्माण झाल्यामुळे माणूस कोणत्या आजारांनी ग्रस्त होतो, याचा अभ्यास करणारी वैद्यकशास्त्रातील शाखा म्हणजे शरीरविकारविज्ञान (Pathology) या शाखेत केलेल्या भरघोस कामगिरीबद्दल रूडॉल्फ फिरशाव्ह जास्त प्रसिद्ध आहेत. पण त्याच्या जीवनाची दुसरी बाजू तितकीच महत्वाची असूनही ती पुरेशी पुढे आली नाही.
मध्यम परिस्थितीत वाढलेले, पण लहानपणापासून अत्यंत तल्लख व बंडखोर म्हणून प्रसिध्द असलेले फिरशाव्ह दडपलेल्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहत. 1847 मध्ये उत्तर सिलेसिया या जर्मन प्रांतात सुरू झालेल्या टायफस या जीवघेण्या आजाराबाबत वैद्यकीय पथकाबरोबर पाहणी करायला गेल्यावर डॉ. फिरशाव्ह यांना आढळले की, या रोगाचा प्रसार उवांमार्फत होतो; पण भूक, दारिद्र्य, अस्वच्छता, दुर्लक्ष, हे साथीचे मूळ कारण आहे. अशा साथी टाळण्यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणा, आर्थिक उन्नती, सार्वजनिक स्वच्छता असे उपाय सुचविले. सामाजिक प्रगतीचा आड येणाऱ्या राजेशाही विरूध्द कामगारवर्गीय जनतेच्या उठावात भाग घेतला. हा उठाव दडपला गेल्यानंतर फिरशाव्ह व त्यांचे सहकारी चळवळीपासून दूर अशा इतर वैद्यकीय संशोधनाकडे वळले. नंतरच्या आयुष्यातही संधी मिळेल तेव्हा त्यांनी वैद्यकीय व सामाजिक व्यवस्थेत सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला. बर्लिनमध्ये 1870 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण फार मोठे होते. त्याचा अभ्यास करताना मैल्यामुळे पाणी दूषित झाल्यामुळे ही रोगराई आहे, हे त्यांनी दाखवून दिले. आता ते एक मोठा शास्त्रज्ञ म्हणून गणले जात होते. त्यामुळे त्याच्या सुचनेनुसार सार्वजनिक स्वच्छतेसंबंधी सुधारणा करण्यात आल्या. जर्मनीतील इतर शहरांत, एवढेच नव्हे तर इतर अनेक युरोपीय राष्ट्रांत या सुधारणांचे लोण पोचले. या सुधारणांमुळेच मुख्यत: साथी आटोक्यात येऊन मृत्यूचे प्रमाण कमी झाले.
1848-1850 चा क्रांतिकारक उठाव चिरडला गेल्यानंतर रूडॉल्फ फिरशाह शरीरविकारशास्त्रातील संशोधनाकडे वळाले. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्याची पध्दत त्यांनी अवलंबली. शवविच्छेदनातून तसेच उत्तक व पेशींच्या सूक्ष्मदर्शी अभ्यासातून रोगांची शरीरशास्त्रीय कारणे व स्वरूप यावर प्रकाश टाकता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. उदा. एका रूग्णाच्या बाबतीत रक्तातील पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत व त्या रूग्णाच्या मृत्यूपर्यंत हे प्रमाण तसेच राहिले. या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी ल्युकेमियाचे स्वरूप शोधले. जर्मनीत त्या काळात ट्रिकिनोसिस या विचित्र रोगाने हजारो लोक ग्रस्त झाले होते. शवविच्छेदन व स्नायूंची सूक्ष्मदर्शकातून तपासणीच्या आधारे त्याला आढळले की, या रूग्णांच्या स्नायूमध्ये ‘ट्रिकिनेला’ या जंताच्या आळ्यांचे कोष असतात व खाण्याच्या मासातून ही लागण होते. यावरून प्राण्यांच्या मासाची तपासणी करूनच त्याची विक्री करायला परवानगी देण्यात आली व रोगाचे जर्मनीतून उच्चाटन करण्यात आले. त्यांचे संशोधनात्मक निबंध व त्यांनी सुरू केलेले शरीरविकारशास्त्राचे नियतकालिक यामुळे या वैद्यकीय शाखेला नवी दिशा मिळाली.