जन्म: ३० जून १८६१.
मृत्यू: १६ मे १९४७.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र.
सर फ्रेड्रीक हॉपकिन्स
Frederick Gowland Hopkins
इंग्लिश जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्म: 30 जून, 1861
मृत्यू: 16 मे, 1947
जीवरसायनशास्त्राचे जनक
विसाव्या शतकापर्यंत प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांसारख्या जीवशास्त्रांच्या विकासाचा आधार मुख्यत: निरीक्षण व वर्गीकरण एवढ्यापुरता मर्यादित होता. दरम्यान रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान यांमध्ये जी क्रांतिकारक प्रगती झाली तिच्याव्दारे निरनिराळी प्रयोगतंत्रे विकसित झाली तसेच अत्यंत गुंतागुंतीची व संवेदनाक्षम अशी उपकरणे व यंत्रे (उदा. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक) उपलब्ध झाली. त्यामुळे जीवशास्त्रातील संशोधनाच्या कक्षा रूंदावण्यास मोठी मदत झाली. शरीररचनाशास्त्रातील संचित ज्ञान, विकसित संशोधनपध्दती, संख्याशास्त्रातील सिध्दांतन व विश्लेषण तंत्रे हे सर्व जीवशास्त्राच्या प्रगतीला पोषक ठरले. याचबरोबर खाद्यप्रक्रिया उद्योग व औषध उद्योग यांच्या विकासासाठीही जीवशास्त्राच्या आधाराची निवड निर्माण झालेली होती. या सगळ्याची परिणती म्हणजे जीवशास्त्राची प्रगती व जीवभौतिकी, जीवरसायनशास्त्र आदी नव्या शास्त्रशाखांचा विकास.
सर हॉपकिन्स हे इंग्लिश शास्त्रज्ञ जीवरसायनशास्त्राचे जनक मानले जातात. सजीवांमध्ये घडून येणाऱ्या अत्यंत नाजूक व सुनियंत्रित जीवरासायनिक प्रक्रियांचा शोध घेणे व त्या प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, हे जीवरसायनशास्त्राचे संशोधन क्षेत्र होय. उंदरावर प्रयोग करताना त्यांना असे आढळले की, कृत्रिम दूध दिले तर उंदरांची वाढ होत नाही. पण त्या दुधात गाईचे थोडे जरी दूध मिसळले तरी एकदम वाढ होते. तेव्हा हे उघड झाले की, केवळ प्रथिने, स्निग्धपदार्थ व पिष्टमय पदार्थ यांतून प्राणिमात्रांचे पुरेसे पोषण होत नाही. त्यात क्षारांची भर घालूनही भागत नाही, काही तरी ‘पूरक पदार्थ’ लागतात. म्हणून या घटकांना त्यांनी ‘प्रथम पूरक पदार्थ’ असे नाव दिले. त्यांनाच पुढे जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) हे आज आपल्याला परिचित असणारे नाव पडले. हॉपकिन्स यांनी फुलपाखरांच्या पंखांतल्या रंगांचे रासायनिक विश्लेषण केले. पुढे या कामातून त्यांना (बी) व्हिटॅमिनच्या एका घटकाचा शोध लागला.
वास्तविक अन्नाच्या काही घटकांच्या कमतरेतेमुळे काही रोग किंवा विकृती उद्भवतात, हे अनुभवाने त्या अगोदर लक्षात आले होते तरी हा नेमका घटक कोणता, याचा शोध लागला नव्हता. उदा. स्कर्व्ही हा रोग झाल्यास ताजी फळे देऊन उपयोग होतो असा अनुभव होता. हे कशामुळे होते, हे हॉपकिन्सच्या संशोधनामुळे स्पष्ट झाले. जीवनसत्त्वांच्या या शोधासाठी 1929 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.
जीवनसत्त्वांचा शोध हा आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा शोध आहे. त्याच्याआधारे शास्त्रशुद्ध आहार व जीवनसत्त्वांच्या कमतरेतेमुळे होणाऱ्या रोगांवर (उदा. स्कर्व्ही, मुडदूस, पेलाग्रा, बेरीबेरी, रातांधळेपणा) उपाययोजना आखणे शक्य झाले. तसेच रोग होऊ नये म्हणून विशिष्ट फळे, पालेभाज्या, अन्नपदार्थ खाण्याबाबत सूचना देणे शक्य झाले. आपला आहार समतोल व पुरेसा असेल तर सर्व जीवनसत्त्वे आपल्या रोजच्या आहारातून आपोआप मिळतात. परंतु गरिबीमुळे भारतात लाखो लोकांना सकस व पोटभर अन्न मिळत नाही व त्यामुळे जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होऊन मुडदूस, रातांधळेपणा, तोंड येणे, चेहऱ्यावर पांढरे ठिपके दिसणे, अनेमिया उर्फ रक्तपांढरी, वाढ खुंटणे, इत्यादी विकार होतात. अशा विकारांची काही चिन्हे दिसली तर कृत्रिमरीत्या तयार केलेली जीवनसत्त्वे म्हणजेच टॉनिक देऊन त्यावर मात करता येते. टॉनिकचा असा बहुमोल उपयोग असला तरी सरसकट शक्ती येण्यासाठी म्हणून जो टॉनिकचा सर्रास वापर केला जातो तो चुकीचा आहे. कारण जीवनसत्त्वांचे कार्य शक्ती देणे अशा स्वरूपाचे नसते. खूप दिवस नियमित टॉनिक घेतल्यास टॉनिकमधील जीवनसत्त्वांपैकी अ, इ, ड ही जीवनसत्त्वे शरीरात साचत राहतात व एका मर्यादेनंतर त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अकारण टॉनिक घेतल्याने पैसे वाया जातात, एवढेच नाही तर आरोग्यावर घातक परिणामही होऊ शकतो.