Menu

अलेक्झांडर फ्लेमिंग

(Alexander Fleming)

जन्म: ०६ ऑगस्ट १८८१.
मृत्यू: ११ मार्च १९५५.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र.

अलेक्झांडर फ्लेमिंग
Alexander Fleming
स्कॉटिश शरीरविकार वैज्ञानिक
जन्म : 6 ऑगस्ट, 1881
मृत्यू : 11 मार्च, 1955

पेनिसिलिनचा शोध

घसा दुखून अचानक ताप आल्याचा सर्वांनाच अनुभव येतो. तसेच यासाठी डॉक्टरकडे जाऊन औषधचिट्ठी घेऊन एखादे ‘मायसिन’ अथवा “सिन’ शब्दांचा अंतर्भाव असलेले औषध घेऊन आजार बरा होण्याचा अनुभवदेखील कोणाला नवा नसेल. हे औषध म्हणजेच एक प्रतिजैविक- अँटिबायोटिक्स- असते. प्रतिजैविके विविध प्रकारच्या जीवाणूंना (बॅक्टेरिया) मारक असतात आणि जीवाणूंचा प्रादुर्भाव झाला तर प्रतिजैविके गुणकारक इलाज म्हणून वापरली जातात. सर्वांत प्रथम शोधले गेलेले सुप्रसिद्ध प्रतिजैविके म्हणजे “पेनिसिलीन” आणि ते शोधून काढणारा संशोधक होता डॉ. अलेक्झांड़र फ्लेमिंग.
डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म स्कॉटलंडमधील लॉचफिल्ड येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. वर्षाचा असताना त्यांचे वडील वारले. प्राथमिक शिक्षण गावीच घेऊन 1985 मध्ये ते लंडनला भावाच्या घरी शिक्षणासाठी गेले. तेथे शालेय अभ्यासक्रम चमकदारपणे पूर्ण करून नंतर 4 वर्षे फौजेत दाखल झाले. 1901 साली काही वडिलोपार्जित धन प्राप्त होऊन त्यांनी पॅडिंग्टन येथे वैद्यकीय शिक्षणक्रमाला सुरुवात केली आणि 1909 साली ते शल्यविशारद (सर्जन) झाले. शिकत असतानाच त्यांनी `शीघ्र विकोपी लागणीचे निदान’ (Diagomis of acute bacterial infection) हा निबंध लिहिला. त्याबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. सर्जन झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी त्यांनी संशोधन करणे पसंत केले आणि डॉ. राईट या पॅथॉलॉजीच्या प्राध्यापकांबरोबर सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये विविध लागणकारक रोगांवर औषध शोधण्यासाठी संशोधनाला सुरुवात केली.
पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना फ्रान्सच्या युद्धभूमीवर पाठविण्यात आले. तेथे अनेक जखमी सैनिक धनुर्वात आणि कोथ (गँगरीन- जखम सडून अवयव कुजणे) या रोगांना बळी पडत होते. फ्लेमिंग यांनी सिद्ध केले की, मातीत असलेल्या जीवाणूंमुळे जखम दूषित होऊन हे रोग होतात. तेव्हा अस्तित्वात असलेल्या निर्जंतुकाच्या उपचारांचा उपयोग तसा मर्यादितच होत होता. परंतु, जखमा स्वच्छ ठेवून त्या निर्जंतुक ठेवल्या तर या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येणे शक्य आहे, हे त्यांनी अनेक जखमी सैनिकांवर उपचार करून सिद्ध केले. त्यामुळे शेकडो सैनिकांचे प्राण वाचले. तरी त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु जखमा निर्जंतुक ठेवण्याची त्यांनी वापरलेली पद्धत वैद्यकीय अभ्यासक्रमातून प्रचलित झाली. निर्जंतुके शोधण्यामध्ये त्यांना विशेष रस होता. डोळ्यातील अश्रूंमध्ये “लायसोझाईम’ नावाचे एक वितंचक असते आणि यामध्ये निर्जुंतुकीकरणाचे गुणधर्म असतात हे फ्लेमिंग यांनी सिद्ध केले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण हे द्रव्य वेगळे करण्यात त्यांना यश आले नाही. खरे पाहता हा शोध फार महत्त्वाचा होता, कारण या “लायसोझाईम’मुळे जीवाणू मरत होते आणि त्याचा इतर पेशींवर काहीच दुष्परिणाम होत नव्हता.
डॉ. फ्लेमिंग 1922 मध्ये प्रयोगशाळेत ‘स्टॅफिलोकोकाय’ गटातील जीवाणूंवर संशोधन करत होते. हे जीवाणू जखमा, गळवे इत्यादींच्या पूमध्ये सापडतात. प्रयोगशाळेत जीवाणूंचे संवर्धन त्यांना पोषक अशी द्रव्ये विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बशीत ठेवून त्यावर केले जाते. फ्लेमिंग यांनी अशा तऱ्हेने जीवाणू वर्धनासाठी बशा तयार ठेवल्या होत्या. त्यांना आढळून आले की, एका बशीत जीवाणूंची वाढ झाल्यानंतर सर्व जीवाणू मारले गेले होते. या गोष्टीकडे इतर लोकांनी दुर्लक्ष केले असते, परंतु, फ्लेमिंग यांनी मात्र या घटनेत चिकित्सकपणे लक्ष घातले. त्यांनी तर्क केला की, ज्या अर्थी बशीतील वृद्धिंगत झालेले जीवाणू मेले, त्या अर्थी कोणता तरी जीवाणूंना मारक पदार्थ सूक्ष्मजीवांचा संसर्ग त्या बशीतील जीवाणूंना झाला असणार. त्या बशीतील द्रव्यांचा अभ्यास केल्यावर त्यामध्ये एक प्रकारचा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आढळला. पावाचा तुकडा ओलसर हवामानात उघडा ठेवला तर त्यावर येणारी बुरशी आणि फ्लेमिंग यांनी या बुरशीच्या जीवाणूविरोधी गुणधर्माचा अभ्यास केला असता त्यांना आढळले की, या बुरशीमुळे जीवाणू सहज आणि परिणामकारकरीत्या मारले तर जातातच, मात्र रक्तातील लाल पेशींना त्या बाधक नसतात.
डॉ. फ्लेमिंग यांनी 1929 मध्ये या निरीक्षणावर एक शोधनिबंध लिहिला आणि त्यात पेनिसिलीनचा परिणाम या नावाने या घटनेचे वर्णन केले. त्यामध्ये त्यांनी मांडले की, पेनिसिलियम बुरशीमध्ये एक खास रासायनिक घटक असतो- ज्याला त्यांनी पेनिसिलीन असे नाव दिले- आणि हा घटक जीवाणूनाशक असतो. त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्याकडे दहा वर्षे कोणीही लक्ष दिले नाही हॉवर्ड फ्लोरी हे ब्रिटिश शास्त्रज्ञ आणि अर्नेस्ट चैन हे त्यांचे जर्मन सहकारी 1939 साली जीवाणूंविरोधी औषधांच्या शोधात होते. डॉ. फ्लेमिंग यांचा शोधनिबंध त्यांच्या निदर्शनाला आल्यानंतर त्या दोघांनी पेनिसिलीनवर सखोल संशोधनाला सुरुवात केली. दहा वर्षांपूर्वी लागलेला इतका महत्त्वाचा शोध बासनातच राहिला याचा त्यांना अचंबा वाटला. त्यांनी पेनिसिलीयम बुरशीपासून वेगळे काढण्याचा चंगच बांधला. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजे 1941 मध्ये या बुरशीपासून त्यांनी पुरेशा प्रमाणात एक अर्क बनविण्यात यश संपादन केले. जीवाणूग्रस्त रुग्णांवर या अर्काची एक चाचणी केल्यावर हा अर्क चांगलाच परिणामकारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अर्कातून शुद्ध रूपातील पेनिसिलीन (प्रतिजैविक) तयार करण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. 1943 मध्ये एका मोठ्या औषधोपचार चाचणीमार्फत 500 जीवाणूग्रस्त रुग्ण बरे करण्यात त्यांना यश आले आणि युद्ध संपेपर्यंत तर एक परिणामकारक जीवाणूविरोधी औषध म्हणून त्याचा वापर सुरू झाला. न्यूमोनिया व सिफिलीससारखे लिंगसांसर्गिक आजार, मॅनेन्जायटिस इत्यादीसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांवर पेनिसिलीन परिणामकारक आहेच, तसेच त्याचे शरीरावर इतर दुष्परिणामदेखील तसे कमी आहेत. (पेनिसिलीन अलर्जी सोडता).
1945 मध्ये फ्लेमिंग, फ्लोरी आणि चैन यांना एकत्रितपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला. पेनिसिलीनच्या शोधाचे श्रेय जरी डॉ. फ्लेमिंग यांना जात असले, तरी पुढे मानवाच्या उपयुक्ततेसाठी त्याचा वापर करण्याकरिता लागणारे पेनिसिलीन औषध मात्र फ्लोरी यांनी बनवले. पेनिसिलीनच्या शोधानंतर इतर अनेक प्रतिजैविके बनवण्याची चढाओढ लागली, ती आजतागायत चालू आहे. सध्या विविध प्रतिजैविकांचा अनावश्यक व अशास्त्रीय वापरदेखील फार वाढत आहे, तसतसे प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंचे वाण निर्माण होऊन औषधोपचार शास्त्रांपुढे गंभीर समस्या निर्माण होत आहेत. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर टाळण्याचे थांबवले नाही, तर या चक्रव्यूहातून बाहेर पडणे दुष्कर होईल.