Menu

वैज्ञानिक विचारपद्धती

आधुनिक तंत्रविज्ञान व त्यामार्फत आधुनिक विज्ञान यांच्याशी आपला पदोपदी संबंध येतो. कारण सर्व जीवनच आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापले आहे. पण त्याचवेळी विज्ञान व तंत्रविज्ञान आता इतके विकास पावले आहे की कोणाही एका व्यक्तीला त्याची संपूर्ण काय, एक शतांशही जाण येणे अशक्य आहे. त्यामुळे ज्ञान मिळवून ते साठविण्यापेक्षा ज्ञान मिळविण्याची योग्य पद्धती आत्मसात करणे म्हणजेच वैज्ञानिक विचारपद्धती समजावून घेणे याला जास्त महत्त्व येते. तसेच आज नवनवीन वैज्ञानिक माहितीचा प्रचंड धबधबा रोज तयार होत असताना, त्यातील बरोबर काय, चूक वा निरर्थक काय, हे ठरवणे वैज्ञानिक विचारपद्धतीमुळेच शक्य होते.

वैज्ञानिक विचारपद्धतीची पुढील काही किमान तत्त्वे सर्व जनतेमध्ये रूजायला हवीत –

  • काटेकोर निरीक्षण व मापन
  • निरीक्षणांचे वर्गीकरण व त्यातील परस्परसंबंध
  • प्रयोगाने पडताळून पाहता येईल असे सिद्धांतन
  • त्याबाबतची प्रायोगिक कसोटी
  • व्यक्तीप्रामाण्य वा ग्रंथप्रामाण्य न मानता समोरील सिद्धांत, विचार वा अनुभव यांचे चिकित्सक विश्लेषण करणे

या तत्त्वांचा अर्थ व महत्त्व सर्वांमध्ये रूजायला हवे. नाहीतर मूठभर उच्चभ्रू तज्ज्ञांच्या मतांच्या किंवा मतलबी जाहिराती वा प्रचार यांच्यात मांडल्या जाणाऱ्या तथाकथित वैज्ञानिक माहितीच्या प्रभावाखाली आपण राहू.  तसेच तंत्रविज्ञानाच्या विकासात सर्वसामान्य जनतेचा काही सहभाग राहणार नाही.

कोट्यावधी लोकांनी रोजच्या जीवनातली निरीक्षणे व अनुभव यांचा योग्य प्रकारे अर्थ लावणे, त्यातून नवे प्रयोग करणे, नवे वैज्ञानिक निष्कर्ष काढणे, व नव्या तंत्रांचा विकास करणे म्हणजे तंत्रविज्ञानात भर घालणे. हे व्हायचे तर वैज्ञानिक विचारपद्धती रूजणे याशिवाय पर्याय नाही. म्हणून हे लोकविज्ञान संघटनेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

 

वैज्ञानिक दृष्टिकोन

शास्त्रज्ञ आपल्या संशोधनात वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतात पण सर्वच शास्त्रज्ञांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असेलच असं नाही. अग्निबाणावर चांगले संशोधन करून तो बनवणारा एखादा शास्त्रज्ञही अग्निबाणाचे उड्डाण यशस्वी व्हावे म्हणून पूजा करतो. किंवा पत्रिका बघून लग्न ठरवतो. वैज्ञानिक विचारपद्धतीमागे तिला आधारभूत असा विश्वाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन अभिप्रेत असतो.

हा वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की

  1. आपल्या भोवती जे भौतिक जग आहे ते निश्चित अशा वस्तुनिष्ठ नियमांनुसार चालते. प्रत्येक घटनेमागे एक भौतिक कारणपरंपरा असते.
  2. या कारणपरंपरांचे व नियमांचे आकलन मानवाला होऊ शकते व वैज्ञानिक विचारपद्धती हाच असे आकलन घेण्याचा योग्य व सर्वोत्तम मार्ग आहे. विश्वव्यापारामागे काही तरी एक गूढ अतिभौतिक दैवी शक्ती आहे असे न मानता किंवा ग्रंथप्रामाण्य वा व्यक्तिप्रामाण्य न मानता या विचारपद्धतीतून मिळणारे ज्ञान हेच खरे व खात्रीलायक ज्ञान असते.
  3. या वैज्ञानिक शोध प्रक्रियेतून ताबडतोबीने सर्व उत्तरे मिळतीलच असे नाही. काही प्रश्न आज अनुत्तरित राहतील, काही उत्तरे ही अपुरी वा चुकीची होती हे विज्ञान जास्त विकसित झाल्यानंतर विज्ञानाच्याच लक्षात येते. तरीही भौतिक जगाचे वास्तविक अस्तित्त्व, त्यांचे वस्तुनिष्ठ यथार्थ ज्ञान मिळवण्याचा वैज्ञानिक विचारपद्धती हाच एकमेव खात्रीलायक मार्ग आहे.

वरील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा एक तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, एक डोळस विश्वास आहे. एखाद्या ठोस वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे त्याचा “खरेखोटेपणा” ताबडतोबीने तपासता येत नाही. पण आजवरच्या प्रदीर्घ मानवी इतिहासक्रमात त्याचा खरेपणा सिद्ध झालेला आहे.