Menu

विचारधारा

लोकविज्ञान संघटना हा लोकवैज्ञानिक आणि कार्यकर्त्यांचा गट आहे.

लोकविज्ञान संघटनेचे उद्दिष्ट –

  • जनतेमध्ये विज्ञान, वैज्ञानिक विचारपद्धती व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे – समाजाला विज्ञानाभिमुख करणे.
  • वैज्ञानिकांना लोकाभिमुख करणे, लोकाभिमुख वैज्ञानिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांची फळी उभारणे.
  • लोक आणि वैज्ञानिक यांच्या सहयोगातून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पर्यायी, लोकाभिमुख प्रवाह जोपासणे.

लोकविज्ञानची गरज

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवर समाजातील विशिष्ट, प्रभावी गटांच्या हितसंबंधांचा उठणारा ठसा लक्षात घेता, लोकविज्ञानचे काम हे केवळ रूढ पद्धतीचे, सर्वसाधारण विज्ञान प्रसाराचे असू शकत नाही. आज अधिकृतरीत्या प्रसारित केले जाणारे विज्ञान व तंत्रज्ञान सर्वच्या सर्व, जसेच्या तसे, आपल्याला स्वीकारता येणार नाही. या प्रस्थापित विज्ञान तंत्रज्ञानातील काही गैरलागू, अयोग्य भाग (उदा. गैरलागू, निरर्थक संशोधन, संहारासाठी वा फसवणुकीसाठी हत्यार म्हणून वापरले जाणारे लोकविरोधी तंत्रज्ञान) गाळावा लागेल. अनुरूप वैज्ञानिक संशोधन, खराखुरा विज्ञानप्रसार व तंत्रविज्ञानाचा योग्य उपयोग यांच्यामार्फत काही पैलूंची या प्रस्थापित विज्ञानात भर घालावी लागेल. अशा प्रकारे ‘लोकांसाठी लोकांचे’ असे लोकविज्ञान उभे करायचे ध्येय आपण समोर ठेवले पाहिजे. हे काम एकट्या-दुकट्याचे वा मूठभरांचे नाही. शेकडो कार्यकर्त्यांनी, लोकाभिमुख वैज्ञानिकांनी एका ध्येयाने प्रेरित होऊन करायचे हे काम आहे. अशा व्यापक लोकविज्ञान चळवळीसाठी, लोकविज्ञान संघटना इतर समविचारी व्यक्ती व संघटनांशी सहकार्य करत काम करते.