विकास-योजनांचे तंत्रज्ञान
विकास योजना हा परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून निरनिराळ्या विकास योजनांच्या तंत्रवैज्ञानिक पैलूंबद्दलची जाण परिवर्तनवादी शक्तींमध्ये रूजली पाहिजे. नाहीतर केवळ मूठभरांना फायदेशीर ठरणाऱ्या, नैसर्गिक समतोलावर व पर्यायाने दूर पल्ल्याच्या दृष्टीने मानवी जीवनावर विपरित परिणाम करणाऱ्या विकास योजना या ‘शास्त्रीय योजना’ म्हणून हितसंबंधी मंडळी पुढे आणतात, जनतेची दिशाभूल करतात. शेतीविकास म्हणजे हरित क्रांती, दुग्ध विकास म्हणजे संकरित गाय आणि ऊर्जा विकास म्हणजे अणुऊर्जा अशी समीकरणे आज बनलेली आहेत. याबाबतचे संशोधन, प्रचारयंत्रणा आणि किंमत धोरण अशा पद्धतीने मांडले जाते की हे मार्ग योग्य वाटावेत आणि अशा योजनांना जनमान्यता मिळते. अशा वेळेस योग्य तंत्रज्ञान कोणते हे सांगण्याचे काम विज्ञान चळवळीत केले जाते.