Menu

अर्नस्ट मायर

(Ernst Mayr)

जन्म: ०५ जुलै १९०४.
मृत्यू: ०३ फेब्रुवारी २००५.
कार्यक्षेत्र: जीवशास्त्र.

अर्नस्ट मायर
Ernst Mayr
जर्मन जीवशास्त्रज्ञ
जन्म : 5 जुलै, 1904
मृत्यू : 3 फेब्रुवारी, 2005

‘नवडार्विनवादी’ जीवशास्त्रज्ञ

निसर्गनिवडीतून सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटले की, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर चार्लस डार्विन तसेच आल्फ्रेड वॉलेस यांची नावे येतात. डार्विन-वॉलेसने उत्क्रांतीचा क्रांतिकारी सिद्धांत 1859 साली मांडल्यानंतर प्रचंड वाद झाले. कडाक्याचे वादविवाद आणि सखोल वैज्ञानिक विश्लेषणात्मक चर्चेतून तावून सुलाखून हा सिध्दांत मान्यता पावला. त्यानंतर बराच काळ चर्चिला गेलेला विषय म्हणजे उत्क्रांतीचा पाया असणारे विविध सजीवांच्या गुणधर्मातील बदल. हे बदल अचानक झाले की हळूहळू टप्यटप्याने झाले, याची डार्विनच्या मांडणीतून उकल होत नव्हती. कदाचित त्यामुळे उत्क्रांतीवाद काही प्रमाणात इतिहासाच्या छायेत गेला तो विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकापर्यंत. त्यानंतर मात्र जीवशास्त्रज्ञांचा एक गट पुढे सरसावला आणि त्यांनी उत्क्रांतीवर परत प्रकाशझोत टाकण्यास सुरवात केली. या गटाला ‘नवडार्विनवादी’ असे संबोधण्यात आले. अशा नवडार्विनवाद्यांपैकी अत्यंत महत्त्वाचा जीवशास्त्रज्ञ होता ‘अर्नस्ट मायर’.
अर्नस्ट मायर यांचा जन्म जर्मनीतील केम्पटन गावी झाला. वडील न्यायाधीश असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलाचे शालेय शिक्षण दर्जेदार शाळेत झाले. अर्नस्ट मायर यांना निसर्गनिरीक्षण, पक्षीनिरीक्षणाची अत्यंत आवड होती. वयाच्या सतराव्या वर्षी पक्षीनिरीक्षण करताना त्यांना ‘लाल तुरा असलेले पोचार्ड बदक’ आढळले. हा पक्षी यापूर्वी युरोपमध्ये कोणाला आढळला नव्हता. या बदकाच्या शोधामुळे त्यांचा संपर्क एर्विन स्ट्रेसमान या सुप्रसिद्ध पक्षीवैज्ञानिकाशी आला. तरूण अर्नस्टमधील होतकरू पक्षीतज्ज्ञ त्यांनी चटकन घेरला आणि त्यामुळे अर्नस्ट यांना बर्लिनच्या प्राणिविज्ञान संग्रहालयात संशोधन करण्यास मुभा मिळाली. यामुळे डॉक्टर होण्याच्या इच्छेने सुरवातीला ग्रीफस्वाल्ड विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या मायर यांनी प्राणीशास्त्रज्ञ बनण्याचा संकल्प केला आणि 1926 मध्ये डॉक्टरेट प्राप्त केली. 1927 साली त्यांनी उच्च न्यूगिनी येथे पक्षी अभ्यास निरीक्षण मोहिमेचे नेतृत्त्व केले. त्यानंतर तीन वेळा ऑस्ट्रेलियाच्या जवळ असलेल्या न्यूगिनी आणि सॉलोमन बेटांच्या सफरी केल्या व तेथील निरीक्षण नोंदी, जमा केलेले पक्षी या आधारे त्यांचे प्रकार व जाती यांचे वर्गीकरण करण्याचे काम केले. त्या काळात जीवजातींची सोयीस्कर व्याख्या आणि ओळख, त्यांचे दृश्य रूप आणि आकार यावर आधारित होती. मायर यांनी 137 जातींचे पक्षी गोळा केले. त्या पक्ष्यांची स्थानिक नावे तेथील लोकांकडून जाणून घेतली. पक्ष्यांच्या गुणधर्मावर आधारित विश्लेषणातून त्यांना आढळले की, त्यांपैकी 136 जातींना स्थानिक लोकांनी वेगवेगळी नावे दिली होती. पण दोन जातींच्या पक्ष्यांबाबत त्यांचा गोंधळ झाला होता. यावरून मायर यांच्या लक्षात आले की, वरवर दिसायला सारखे असले तरी त्या दोन पक्ष्यांच्या जाती भिन्न आहेत आणि त्यांच्यातील काही गुणधर्म वेगळे आहेत. सर्वच गुणधर्म आनुवंशिकतेने पिढ्यानपिढ्या जात असतात हे तेव्हा ज्ञात होतेच. याचाच अर्थ प्रत्येक जातीच्या पक्ष्याचे पुनरूत्पादन त्याच जातीतील नर-मादीच्या मिलनामुळे होते. म्हणजेच प्रत्येक जीवजात ही पुनरूत्पादनाच्या दृष्टीने स्वतंत्र असते. या आधारावर त्यांनी जीवजातींची व्याख्या केली की, ‘जीवजात म्हणजे फक्त आपापसात प्रजनन करणारे अथवा प्रजनन क्षमता असणारे प्राण्यांचे असे गट की जे पुनरुत्पादनाच्या दृष्टीने इतरांपासून स्वतंत्र असतात.’ या व्याख्येची पूर्ण संकल्पना आणि सिद्धांत मायर यांनी 1942 साली ‘Systematics Origin of Species’ आणि List of New Guinea Birds’ हे दोन ग्रंथ प्रकाशित करून केली. प्राण्यांचे गट भौगोलिकदृष्ट्या जेव्हा एकमेकांपासून विलग होतात तेव्हा नवीन जीवजाती निर्माण होतात, ही संकल्पना डार्विनने एकोणिसाव्या शतकात मांडलेली होती. मायर यांनी याच संकल्पनेचा पाठपुरावा करून मांडले की, एका जीवजातीतील प्राण्यांच्या समूहापैकी एखादा उपसमूह काही कारणास्तव मूळच्या समूहापासून पुनरूत्पादनदृष्ट्या विलग होतो. अशा विलग गटांतील प्राणी कालांतराने प्रजननिकदृष्ट्या स्वतंत्र होतात आणि याची परिणिती नवीन जीवजात निर्माण होण्यात होते. 1963 साली त्यांनी ‘प्राण्यांच्या जीवजाती आणि उत्क्रांती’ हा ग्रंथ प्रकाशित केला. नवडार्विनवादाला अनुवंशविज्ञान, पेशीविज्ञान आणि जीवरसायनशास्त्र यांच्या प्रगतीमुळे झालेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा पाया होता. त्यामुळे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आधुनिक विज्ञानाच्या पायावर भक्कम उभा करण्याचे काम मायर यांनी केले. त्यांनी 1982 मध्ये लिहिलेल्या Growth of Biological Thought म्हणजे ‘जीवशास्त्रीय विचाराची वृद्धी’ या ग्रंथात उत्क्रांतीबद्दलचा सर्वांगीण विचार मांडलेला आहे.
मूळचे जर्मन असलेले मायर 1944 ते 1975 पर्यंत अमेरिकेत ‘म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’ आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्राणिशास्त्रीय संग्रहालय या संस्थांमध्ये उच्च पदावर होते. त्यांची मते मात्र खास युरोपीयच होती. ते म्हणतात, ‘अमेरिकेत बहुतांशी लोक अज्ञानीच आहेत. न्यूयॉर्कच्या उपनगरात राहत असताना माझ्या ध्यानात आले की, माझ्या शेजारी आणि आसपास राहणाऱ्या लोकांच्या घरी वाचायला एकदेखील पुस्तक आढळत नसे. हे सर्व धक्कादायक आहे आणि याला मुळात शालेय शिक्षणात बदल करण्यावाचून दुसरा इलाज नाही.’