जन्म: २४ ऑक्टोबर १६३२.
मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३.
कार्यक्षेत्र: सूक्ष्मजीवशास्त्र.
अंतन फॉन लेवनहूक
Antonie van Leeuwenhoek
डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
जन्म : 24 ऑक्टोबर, 1632
मृत्यू : 26 ऑगस्ट, 1723
लेवनहूक यांचा ‘क्षुद्र श्वापदां’ च्या शोध
तीनशे पंधरा वर्षांपूर्वी लेवनहूक नावाच्या एका छंदिष्ट माणसाने, तोपर्यंत माणसाला अज्ञात असलेले एक अद्भूत जग प्रथमच पाहिले. लाखोंच्या संख्येने गजबजलेले सूक्ष्म जीवांचे हे जग शोधणारा लेवनहूक आद्य सूक्ष्मजीव संशोधक मानला जातो. आज जीवाणू, विषाणू, अमिबा इत्यादी शब्द सर्वपरिचित असले तरी तीनशे वर्षांपूर्वी सूक्ष्मजीवांच्या शोधाने वैज्ञानिकांत खळबळ माजवली. अंतन लेवनहूक यांचा जन्म हॉलंडमधील डेल्फ्ट येथे 1632 साली टोपल्या विणणाऱ्या कुटुंबात झाला. ते लहान असतानाच त्यांचे वडील गेले. आईने त्यांना सरकारी नोकरी लावण्याच्या
इराद्याने शाळेत घातले. पण सोळाव्या वर्षी शाळा सोडून लेवनहूक यांनी एका दुकानात नोकरी धरली. आपला मोकळा वेळ ते प्रकाशशास्त्राच्या अभ्यासात घालवीत. काच काळजीपूर्वक कातरून भिंगे बनवण्याच्या छंदाने लेवनहूक यांना झपाटले होते. ते यात इतके वाकबगार झाले की त्यांची भिंगे त्या काळातील सर्वांत कार्यक्षम होती. हे सर्व ते स्वत:च्या बुध्दीने करीत, त्यांना डच भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नव्हती. अभिजनांची व ज्ञानविज्ञानाची भाषा होती लॅटीन. त्यामुळे त्यांना स्वत:ची निरीक्षणे, स्वत:चे विचार आणि हुशारी यांवरच भिस्त ठेवावी लागली. लेवनहूक नुसतीच उत्तमोत्तम भिंगे बनवत बसले नव्हते तर हाती लागेल त्या वस्तूंवर ते आपली भिंगे फिरवून पाहत. बैलाचे डोळे, मेंढ्यांचे व इतर प्राण्यांचे केस, माशीचा मेंदू, पिसूची नांगी, कुत्र्याचे वीर्य जे दिसेल ते त्यांच्या भिंगाखाली येई. त्यांचे शेजारी त्यांना वेड्यात काढत.
पण ते असे “झपाटलेले’ नसते तर कदाचित पावसाच्या पाण्याचा थेंब आपल्या भिंगामधून पाहण्याची बुध्दी त्यांना झाली नसती. एक दिवस त्यांनी बागेतील गाडग्यातले पाणी भिंगाखाली तपासले आणि आनंदाने ते आपल्या मुलीला मोठ्याने हाका मारू लागले, “मारिया, बघ मला कसला शोध लागला आहे.’ त्या पाण्यात असंख्य सूक्ष्मजीव इकडून तिकडे फिरताना, एकमेकांवर आपटताना त्यांना दिसले. या जीवांना ते “क्षुद्र श्वापदे’ म्हणत.
पुढे स्वच्छ बशीत पावसाचे पाणी गोळा करून त्यांनी तपासले तेव्हा त्यात ही “क्षुद्र श्वापदे’ नव्हती पण त्याच पाण्यात दोन दिवसांनी ती तयार झाली होती. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, वारा आणि त्याबरोबर येणाऱ्या धुळीच्या कणांबरोबर सूक्ष्म जीव येतात. दातांच्या फटीत लांबट दांड्यासारखे सूक्ष्म जीव असतात हेही त्यांनी पाहिले. (पुढे एकोणतिसाव्या शतकात ते जीवाणू किंवा विषाणू असल्याचे सिद्ध झाले.) प्राण्यांच्या वीर्यात लाखो पेशी असतात, हेही त्यांनी सिद्ध केले. या शोधामुळे लैंगिक-प्रजनन शास्त्रातील कल्पना विकसित झाल्या. लेवनहूक यांची सर्व
निरीक्षणे, मोजमापे, नोंदी पद्धतशीर व काटेकोर असत. त्या काळातले मान्यवर शास्त्रज्ञ लंडनमधील रॉयल सोसायटीचे सभासद असत. 15 नोव्हेंबर 1677 रोजी रॉबर्ट हूक यांनी रॉयल सोसायटीच्या सभासदांना, स्वत: बनवलेल्या सूक्ष्मददर्शकातून लेवनहूक लिहीत होते ते सर्व सत्य असल्याचे दाखवून दिले. लेवनहूक यांना रॉयल सोसायटीचे सभासदत्व बहाल करण्यात आले.
प्रारंभीच्या या सर्व निरीक्षणांचा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी लगेचच उपयोग झाला नाही. त्यासाठी जवळजवळ दोनशे वर्षांचा काळ जावा लागला. मधला काळ हा मुख्यत्वे करून उत्साही व शोधक वृत्तीच्या शास्त्रज्ञांनी तपशीलवार निरीक्षणे व नोंदी करण्याचाच काळ होता. शिवाय हा विषय नवा व अतिशय गुंतागुंतीचा असल्याने विविध माहितीचे प्रचंड संकलन करून व्यवस्थित मांडणी केल्याशिवाय अचूक प्रमेय मांडणेही शक्य नव्हते.
त्यातच धर्मवादी व धर्मविरोधी मतांमध्ये त्या काळी चालू असलेल्या वादाचा प्रभाव शास्त्रज्ञांवर पुष्कळच होता. प्राणीसृष्टी दैवी नियमानुसार चालते असे धर्मवादी सिद्ध करू पाहत होते. तर बुध्दिप्रामाण्यवादी विज्ञानातून दैवी शक्तीचे उच्चाटन करू पाहत होते. जीवसृष्टीतील प्रक्रियांमागेदेखील जड वस्तूच्या भौतिक प्रक्रिया असतात व त्याद्वारेच जीवसृष्टी नियत होते, असे त्यांना सिद्ध करायचे होते. त्यासाठी शास्त्रज्ञ अतिशय चिवटपणे निसर्गाचे बुद्धीला पटतील असे पुरावे गोळा करत होते. त्यांचे संशोधन पुढील काळात प्रगत व मान्यही होत गेले. या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्यापक आणि सखोल अभ्यासामुळेच सर्वसाधारण प्रमेय मांडणे शक्य होणार होते. पुढच्या दोन शतकांतील जीवशास्त्राच्या प्रगतीचा पाया या कार्यामुळे घातला गेला पण त्या सगळ्याची सुरवात झाली लेवनहूक यांच्या “क्षुद्र श्वापदां’च्या शोधामुळे!