Menu

आरिस्टॉटल

(Aristotle)

जन्म: इसविसनपूर्व ०३८४.
मृत्यू: इसविसनपूर्व ०३२२.
कार्यक्षेत्र: तत्त्वज्ञान, तत्वज्ञान.

आरिस्टॉटल Aristotle
ग्रीक शास्त्रज्ञ व तत्ववेत्ता
जन्म: ख्रिस्तपूर्व 384
मृत्यू: खिस्तपूर्व 322

प्रज्ञावंत तत्त्ववेत्ता

्रीक म्हटले की आपल्या समोर बहुतांशाने नाव येते ते मॅसिडोनियाचा सम्राट आलेक्झांडर याचे. त्याला आपण जगज्जेता सिकंदर म्हणून ओळखतो. परंतु ज्ञान-विज्ञान व तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मानवी मनावर दोन हजार वर्षे अधिराज्य गाजविले ते मात्र ग्रीसचेच विद्याव्यासंगी व आलेक्झंडरचे गुरू-अरिस्टॉटल यांनी. आलेक्झांडर म्हणत असे की, “आरिस्टॉटल यांनी मी माझ्या वडिलांइकाच आदरणीय मानतो, वडिलांनी मला जीवन दिले पण जीवनाला अर्थ व मूल्य प्रदान करणारे जे काही मला प्राप्त झाले त्याचे सर्व श्रेय आरिस्टॉटलचेच आहे.”
आरिस्टॉटल यांचा जन्म इ.स. पूर्व 384 मध्ये मॅसिडोनियाच्या वायव्य किनाऱ्याजवळील ‘स्टागिरा’ गावी झाला. त्यांचे वडील मॅसिडोनियाचे राजवैद्य होते. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालपणापासून निसर्गविज्ञानात रूची निर्माण झाली. स्टागिराच्या सागर किनाऱ्यावरील प्राणी व वनस्पती गोळा करून त्यांचा अभ्यास करणे हा त्यांचा लहानपणीचा छंद होता. वयाच्या सतराव्या वर्षी आरिस्टॉटल अथेन्स शहरातील प्रसिध्द तत्ववेत्ता प्लेटोच्या अकादमीत उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. पुढील वीस वर्षे, आपल्या गुरूच्या मृत्यूपर्यंत ते प्रथम शिक्षणासाठी व नंतर शिकवण्यासाठी तेथेच राहिले. इ.स. पूर्व 342 मध्ये ते मॅसिडोनियाला आले व सात वर्षे तेथेच आलेक्झांडरचे गुरू म्हणून राहिले.
प्लेटोने अथेन्समध्ये स्थापन केलेल्या अकादमीच्या संकल्पनेतून विद्यापीठाचा जन्म झाला. तद्वत् संशोधन संस्थांचा उदय आरिस्टॉटल यांनी इ.स.पूर्व 325 मध्ये अथेन्सला स्थापन केलेल्या लायसीअम या संशोधन संस्थेतून झाला. त्यासाठी आलेक्झांडरने आर्थिक पाठबळ, मनुष्यबळ पुरवले. या संस्थेतील सुमारे एक हजार विद्यार्थी व साहाय्यकांमार्फत ग्रीसमधून व आशिया खंडात प्रवास करून आरिस्टॉटल यांनी वनस्पती, प्राणीजीवन, खडक आदी निसर्गविषयक आणि समाज, शहरे अशा सामाजिक विषयांवर प्रचंड ज्ञानभांडार गोळा केले. अशा विविध विषयांवरील माहितीचे तर्कसंगत वर्गीकरण व त्याची पध्दतशीर मांडणी करण्याचे काम आरिस्टॉटलसारख्या प्रकांड विद्वानालाच शक्य होते. आरिस्टॉटल यांची ग्रंथसंपदा तीनशे ते चारशी एवढी मोठी मानली जाते. आरिस्टॉटल यांनी संशोधनावर आधारित जीवशास्त्र व प्राणिशास्त्रावरील लिखाणाशिवाय तत्वमिमांसा, नीतीशास्त्र, तर्कशास्त्र, पदार्थ-प्रकार, राजकारण, काव्य, इ. विषयात भरपूर लिखाण केले. शिवाय त्या काळच्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे संग्रहण केले. अशा विपुल विश्वकोषात्मक साहित्यभांडाराचे जतन लायसीअमच्या संस्थात्मक पायामुळे होऊ शकले.
आरिस्टॉटल यांचे खास योगदान आहे ते जीवशास्त्रात. त्यांनी स्वत: तपशीलवार निरीक्षणे करून काटेकोर माहिती गोळा केली व प्राणी-विच्छेदन करून अंत:रचनेचा अभ्यास केला. याशिवाय आलेक्झांडरने आपल्या हिंदुस्थान, मध्य आशिया, पर्शिया येथील स्वार्रांसमयी बहुविध वनस्पती व प्राणी गोळा करून आपल्या गुरूला-आरिस्टॉटल यांना खास भेट म्हणून पाठवल्याने त्यांना जीवजातींचे विस्तृत भांडार मिळाले. या सर्वांवरील संशोधनाआधारे त्यांनी प्राणीशास्त्राचा पाया घातला. त्यांचा ‘प्राण्यांचा इतिहास’-(10खंड) 454 प्राणीजातींचे वर्णन पध्दतशीरपणे मांडतो. त्यांनी प्राण्यांचे शारीरिक गुणधर्म, शरीररचनेतील विविधता आणि जटीलता, पुनरूत्पादन रीती, काही प्राण्यांच्या रक्ताचा अभ्यास या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण केले. आरिस्टॉटल यांचे वर्गीकरण पुढे दोन हजार वर्षे म्हणजे 18 व्या शतकात लिन्नेयुसने व्दिपद वर्गीकरण मांडेपर्यंत ग्राह्य मानले जात होते.
प्राण्यांचे वर्गीकरण: आरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे दोन प्रमुख गट पाडले एक रक्तयुक्त प्राणी व दुसरे रक्तरहीत प्राणी. या दोन्ही गटांतील प्राण्यांचे त्यांनी पोटवर्गीकरणही केले होते. रक्तयुक्त प्राण्यांचे आरिस्टॉटल त्यांनी 1)उदरात वाढवून थेट पिल्लांना जन्म देणारे चतुष्याद प्राणी, 2)पक्षी 3)अंडी घालणारे चतुष्पाद प्राणी-जसे पाल, सरडा आणि उभयचर बेडकांसारखे प्राणी 4)व्हेल व तत्सम पिल्लांना जन्म देणारे जलचर 5)साधे मासे असे पोटवर्गीकरण केले. देवमासा, डॉल्फिन वगैरे माशासारखे जलचर प्राणी फुफ्फुसाव्दारे श्वासोच्छवास करतात व ते साध्या माशाप्रमाणे अंडी न घालता पिल्लांना जन्म देतात, हे फरक आरिस्टॉटल यांनी नोंदले होते. रक्तहीन प्राण्यांचेही त्यांनी असेच वर्गीकरण केले होते. महत्वाचे म्हणजे प्राण्यांच्या वास्तव्यस्थानावरून केल्या जाणाऱ्या पारंपरिक वर्गीकरण पध्दतीपासून फारकत घेऊन पुनरूत्पादन पध्दती व शरीरांतर्गत गुणविशेष यांवर आधारित वैज्ञानिक वर्गीकरण त्यांनी पाया घातला.
प्राणीशास्त्राव्यक्तिरिक्त इतर विषयात विशेष खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र यातील विज्ञानपध्दतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या शास्त्रातील त्यांची अनेक विधाने चुकीची होती. उदा. त्यांच्या मते, जगातील सर्व वस्तूंचे गुणधर्म वस्तू किती प्रमाणात गरम थंड किंवा ओल्या-कोरड्या आहेत यावरून ठरवता येतात. आणि या गुणधर्मात होणारे बदल पाणी, हवा, अग्नी आणि माती या चार मूलद्रव्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. उदा. लाकडाचा ओंडका अग्नीवर ठेवला की त्यातून पाणी स्त्रवते, हवा (धूर) बाहेर येते. ओंडक्यातून अग्नी बाहेर येतो आणि शेवटी राख (माती) उरते. आकाश वेगळ्या मूलद्रव्यांनी बनलेले आहे. आणि त्यात बदल होत नाहीत. म्हणजे तेही मूलद्रव्य आहे. अशा तऱ्हेने पंचमहाभुतांनी हे विश्व बनलेले आहे, असे अत्यंत वरवर दिसणाऱ्या बदलांवरून त्यांनी मांडले. जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा अधिक वेगाने खाली येते हे दगड आणि पानाच्या तुलनेवरून त्यांनी मांडले. पुढे 1500 वर्षांनंतर गॅलिलिओने सुविकसित प्रयोगाव्दारे हे खोडून काढले. पृथ्वी गोल आहे हे अनुमान आरिस्टॉटल यांनी काढले होते. चंद्रग्रहाणाच्या वेळी पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्या छायेचा आकार हा त्याच्या अनुमानाचा आधार होता. परंतु त्यांनी पृथ्वी स्थिर असते, इतर ग्रह, तारे, पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असतात, हे तत्कालीन सनातनी मतच ग्राह्य मानले होते.
प्लेटोप्रमाणे आरिस्टॉटल यांना अमूर्त कल्पनांमध्ये फारसा रस नव्हता. ते वास्तववादी होते. त्यांनी जे मांडले ते व्यावहारिक पातळीवर योगय असल्याचे जाणवते, याहून खास वेगळे नव्हते. त्यांचे लिखाण सहज पटण्याजोगे असल्याने त्यांचा पगडा दीर्घकाळ टिकून होता. शिवाय “बाबा वाक्यं प्रमाणम्’’ या सनातनी वृत्तीच्या पगड्यामुळेही त्यांचे चुकीचे, दिशाभूल करणारे सिध्दांत विज्ञानाच्या प्रगतीला अनेक बाबतीत अडसर ठरले. आधुनिक विज्ञानयुगात प्रयोग व नवनवीन निरीक्षणे (दुर्बिणी व सूक्ष्मदर्शक इ. उपकरणांच्या साहाय्याने केलेली) व प्रगत शास्त्रीय व गणिती विश्लेषण-पध्दती या आधारे भक्कम पुरावा उपलब्ध करणे शक्य झाल्यावर आरिस्टॉटल यांचे शिसावंद्य मानले गेलेले अनेक सिध्दांत व मते खोडून काढली गेली.
या प्रज्ञावंत तत्ववेत्याची अखेर मात्र दयनीय अवस्थेत झाली. आलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ‘ईश्वराचा अपमान करणारे पाखंडी’ म्हणून तत्वज्ञान व तत्वाज्ञानी यांच्यावर हल्ले सुरू झाले. त्यामुळे आरिस्टॉटल अथेन्स सोडून गेले व युबिया बेटावर अज्ञातवासात राहिले. तेथेच वयाच्या 62 व्या वर्षी ते मरण पावले.