Menu

डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन

(C V Raman)

जन्म: ०७ नोव्हेंबर १८८८.
मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०.
कार्यक्षेत्र: पदार्थविज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र.

डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन
C V Raman
भारतीय पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ
जन्म : तिरुचिरापल्ली, 7 नोव्हेंबर 1888
मृत्यू : बंगलोर, 21 नोव्हेंबर 1970

डॉ. चंद्रशेखर वेंकटरामन हे नोबेल पारितोषिक मिळवणारे आशियातील पहिले शास्त्रज्ञ. प्रकाशलहरीसंबंधीच्या ”रामनइफेक्ट्” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या शोधासाठी 1930 साली त्यांना हा बहुमान प्राप्त झाला. प्रकाश एखाद्या माध्यमातून जात असताना त्याचे प्रकाशकण त्या माध्यमातील परमाणूंवर आदळतात व त्यायोगे त्यांची ऊर्जा कमी होऊन ती त्या परमाणूंना मिळते. प्रकाशकणांची ऊर्जा किती कमी झाली हे त्यांच्या तरंगलांबीत किती बदल झाला यावरून कळते. हा “रामन परिणाम” त्या परमाणूंच्या रचनेवर अवलंबून असतो व म्हणून या बदलावरून त्या परमाणूंच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती मिळते. अशा प्रकारच्या परिणामाची शक्यता स्मेकेल या शास्त्रज्ञाने सैद्धांतिकरित्या वर्तवली होती. पण त्याने गणिताद्वारे केलेल्या भाकितांचा पडताळा पाहण्यासाठी अचूक व सोपी पद्धत उपलब्ध नव्हती. रामन यांची कामगिरी ही की त्यांनी अत्यंत कल्पक अशा साध्या तंत्राच्या सहाय्याने या परिणामाचे अचूक मोजमाप करून पक्का शास्त्रीय सिद्धांत उभा केला. त्यामुळे हजारो परमाणूंच्या अंतर्गत रचनेचा शोध घेणे शक्य झाले. रामन-स्पेक्ट्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इ. उपकरणांद्वारे केलेल्या परमाणूंच्या रचनेच्या अभ्यासामुळे कृत्रिमरीत्या अधिकाधिक परमाणू (प्लास्टिक, कृत्रिम रबर इ.) बनवणे शक्य झाले.
डॉ. रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूत तिरुचिरापल्लीला झाला. 1907 साली मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून डॉ. रामन यांनी पदार्थविज्ञानातील एम्.ए. ही पदवी घेतली. त्या काळात हुषार विद्यार्थी हमखास सरकारी स्पर्धा परीक्षा देऊन प्रतिष्ठा व पैसा देणाऱ्या सरकारी नोकरीत जात. त्याप्रमाणे रामनही सरकारी अधिकारी बनले. पण त्यांच्यातील संशोधक दबला गेला नाही. प्रथम फावल्या वेळात व 1917 पासून सरकारी नोकरी सोडून संशोधन कार्याला त्यांनी वाहून घेतले. 1943 साली निवृत्ती नंतरही स्वत:चा पैसा व देणग्या यातून “रामन संशोधन संस्था” स्थापून पाश्चिमात्यांची नक्कल करण्यापासून दूर राहून स्वतंत्र संशोधन चालू ठेवले. सुमारे साडेचारशे शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केले.
1970 सालापर्यंत – त्यांच्या मृत्यूपर्यंत ते रामन इन्स्टिट्यूटमध्ये संचालक होते. रामन यांच्याकडून स्फूर्ती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी पुढे आले आणि पदार्थविज्ञान, ध्वनीशास्त्र आदी विषयात मान्यता पावले. स्वत:चे शास्त्रीय संशोधन, संशोधन संस्था उभारणी व अनेक विद्यार्थ्यांना संशोधनात चालना देणे या मार्गे पदार्थविज्ञानातील भारतातील संशोधनाच्या प्रगतीमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली.
भारताने शास्त्रीय संशोधनात मोठी प्रगती करण्याची निकड डॉ. रामन सतत मांडत असत. आजचे युग हे संशोधनाचे युग आहे, पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहून चालणार नाही; नवनवीन निरीक्षणे व त्यातील परस्परसंबंध जाणून घेऊन शास्त्रीय संशोधन पुढे नेले पाहिजे, आपण नुसती बघ्याची भूमिका घेतली, स्वत: प्रयोग, प्रयत्न केले नाहीत व उसनवासी करीत राहिलो तर ते आत्मघातकी ठरेल अशी त्यांची भूमिका होती आणि ह्याच भूमिकेतून त्यांनी आपले आयुष्य संशोधनाच्या प्रगतीसाठी वाहिले.