Menu

कॅरोलस लिन्नेयुस

(Carolus Linnaeus)

जन्म: २३ मे १७०७.
मृत्यू: १० जनेवारी १७७८.
कार्यक्षेत्र: वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र.

कॅरोलस लिन्नेयुस
Carolus Linnaeus
स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ
जन्म: 23 मे, 1707
मृत्यू: 10 जानेवारी, 1778

सजीवांच्या वर्गीकरणाचा जनक

पृथ्वीवरील सजीवसृष्टीतील प्राणी आणि वनस्पती मिळून सुमारे 10 कोटी प्रजाती विज्ञानाला ज्ञात झाले आहेत. त्यापैकी अंदाजे दोन तृतीयांश प्रजाती प्राणीवर्गात तर एक तृतीयांश प्रजाती वनस्पतींमध्ये मोडतात. प्राचीन काळापासून माणूस सजीवांबद्दल ज्ञान मिळवित आला असला तरी या ज्ञानाला शिस्त लावण्याचा पहिला प्रयत्न 2500 वर्षापूर्वी म्हणजेच इ. स.पूर्व चौथ्या शतकात ग्रीक तत्त्ववेत्ता आरिस्टॉटल याने केला. त्याने व त्याचा शिष्य थिओफ्रास्टने प्राण्यांचे आणि वनस्पतींचे प्रत्येकी पाचशे प्रकार नोंदविले. अरिस्टॉटलच्या पध्दतीत अनेक कमतरता होत्या. त्यानंतरच्या काळात जगभरच्या निसर्गवैज्ञानिकांनी (यात विज्ञानप्रेमीही समाविष्ट आहेत) केलेल्या परिश्रमांतून 18 व्या शतकापर्यंत जवळजवळ 70 हजार प्रजाती ज्ञात झाल्या. इतक्या प्रजातींची ओळख ठेवायची तर कोणत्यातरी प्रकारे त्यांचे वर्गीकरण करून त्यांचे नामकरण करणे, त्यांना वक्तशीरपणे एका ‘व्यवस्थे’त बसवणे आवश्यक होते.
पुरातन काळात सजीवांच्या स्वाभाविक निवासस्थानावर आधारित (Habitat based) वर्गीकरण करण्याची ‘सोपी’ पध्दत होती. त्यामुळे अक्षरश: ‘उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक’ अशीच अवस्था होती. हळूहळू दृश्य गुणधर्मानुसार प्राण्यांचे गट पाडण्याची पध्दत सुरू झाली. काही एक पध्दत बसवून सजीवांचे वर्गीकरण करण्याचा पहिला अंशत: यशस्वी प्रयत्न केला तो 17 व्या शतकातील इंग्लिश वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन रे याने. उदा. फुले येणाऱ्या वनस्पतींच्या बियामध्ये एक दल आहे का दोन दले आहेत, या निकषावर त्याने एकदलीय व व्दिदलीय वनस्पती असे दोन वर्ग केले. परंतु, ही रीतदेखील वरवरची व अपुरी होती. सजीवांच्या वर्गीकरणाची वैज्ञानिक पायावर ‘व्यवस्था’ (System) निर्माण करून ‘वर्गीकरण विज्ञान’ (Taxanomy) ही नवीन विज्ञानशास्त्रच निर्माण करण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम केले ते स्वीडिश वैज्ञानिक कॅरोलस लिन्नेयुस यांनी.
कॅरोलस लिन्नेयुस यांचा जन्म दक्षिण स्वीडनमधील रासशुक्ट येथे झाला. धर्मप्रसारक आणि बागकामाची आवड असलेल्या वडलांबरोबर राहिल्याने कॅरोलस लहान वयातच वनस्पतींचे निरीक्षण-परीक्षण करण्यात तरबेज झाला. गावकरी त्याला बाल वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणू लागले. शाळेत असतानाच आरिस्टॉटलचा ‘हिस्हॉरिया अॅनिमॅलियम’ (प्राण्यांचा इतिहास) हा जीवनशास्त्रविषयक प्राचीन मान्यवर ग्रंथ त्याने वाचून काढला. शाळेतील इतर विषयात कॅरोलसला फारसे स्वारस्य नसल्याने शिक्षकांच्या मते, तो ‘बेताचीच बुद्धी असलेला विद्यार्थी’ ठरला. ‘तू चर्मकारीचे प्रशिक्षण घेतलेस तर बरे होईल’, असे देखील एका शिक्षकाने त्याला सुचवले. वडिलांना जरी आशा होती की तो धर्मगुरू होईल, तरी त्याला चर्मकारीचे शिक्षण देण्याचे विचार त्यांच्याही डोक्यात घोळत होते. परंतु, शाळेतील एक विज्ञान शिक्षक व गावातील डॉक्टर लोहन रॉथमन यांनी कॅरोलसच्या वडिलांना या विचारांपासून परावृत्त केले व कॅरोलसला वैद्यकीय शिक्षण देण्याचा सल्ला दिला. उपसाला विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला परंतु तेथे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. वर्षभरातच त्यांनी परत येऊन धर्मगुरू व्हावे, असा घरच्यांचा आग्रह सुरू झाला. पण विद्यापीठात 1727 मध्ये त्यांची ‘ओलाफ सेल्सियस’ या वनस्पतीशास्त्रज्ञाशी ओळख झाली. ओलाफमुळे वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या लिन्नेयुस यांची मुळातली निसर्गविज्ञानाची आवड वाढीला लागली. लवकरच त्यांना विद्यार्थी असतानाच विद्यापीठात वनस्पतीशास्त्राच्या अध्यापकाची नोकरी मिळाली.
पुढे 1732 मध्ये स्वीडनच्या उत्तरेला असलेल्या आर्क्टिक प्रदेशातील लॅपलँडमधील निसर्ग-निरीक्षणाची, वनस्पती-सर्वेक्षणाची जबाबदारी लिन्नेयुस यांच्यावर सोपवण्यात आली. ही त्यांची पहिलीच सफर होती. वर्षातील दीर्घकाळ बर्फाच्छदित असणाऱ्या, परंतु बर्फ वितळताच चार-पाच महिने हिरव्यागार अशा विविध वनस्पतींच्या रेलचेलीने बहरणारे मोहक लॅपलँड! तेथे पाच महिने मुक्काम ठोकून कॅरोलस यांनी वनस्पतींचे विपुल नमुने गोळा केले, त्यांची निरीक्षणे नोंदवली. रेखाटने केली व माहितीचे व ज्ञानाचे प्रचंड भांडारच गाठी बांधले. वनस्पतींच्या व्यतिरिक्त तेथील प्राणी, पक्षी, कीटक, यांची माहितीदेखील त्यांनी संकलित केली.
विविध वनस्पतींचे नमुने, माहिती, निरीक्षणे व त्यांच्या नोंदींचा एवढा मोठा संग्रह करणे आणि त्यांचे विश्लेषण करून वर्गीकरण करणे म्हणजे कष्ट, चिकाटी आणि बुद्धीचा कस काढणारे आव्हानच! लॅपलँडमध्ये नमुने गोळा करीत असतानाच वनस्पती व इतर सजीवांची क्रमबध्द-पध्दतशीर वर्गवारी करण्याची नितांत गरज लिन्नेयुस यांना जाणवली होती व तेव्हापासूनच वर्गीकरण कसे करावे, याचे विचारचक्र त्यांच्या डोक्यात चालू होते. 1737 मध्ये त्यांनी Systema Natura (निसर्गाची व्यस्था) हे पुस्तक प्रसिध्द करून सजीवांच्या वर्गीकरणाची नवीन संकल्पना मांडली.
दृश्य गुणधर्मात खूपच साम्य असलेल्या जीवजाती एकेका गटात टाकून त्याला त्यांनी ‘प्रजाती’ (वंश) संबोधले. साधर्म्य असलेल्या प्रजातींचा पुन्हा गट करून त्याला ‘ऑर्डर’ (गण) व गणांच्या गटाला ‘वर्ग’ संबोधले. प्रत्येक जीवजातीचे नाव लिहिताना लिन्नेयुस यांनी ‘व्दिपदनाम पध्दती’ वापरायला सुरुवात केली. या व्दिपदनाम पध्दतीत प्रजातीचे नाव प्रथम लिहिले जाते आणि मग जीवजातीचे विशिष्ट नाव लिहिले जात. उदा. मांजर, वाघ, सिंह, बिबट्या या एकमेकांशी साधर्म्य असणाऱ्या जीवजातींच्या प्रजातीचे नाव ‘फेलिस’ (Felis) असे आहे. आता यातील प्रत्येकाचे विशेष नाम त्याच्या पुढे लिहून ‘फेलिस डोमेस्टिक्स’ (मांजर), ‘फेलिस लिओ’ (सिंह), ‘फेलिस टायग्रीस’ (वाघ) आणि ‘फेलिस पारडस’ (बिबट्या) असे नाव लिहिले जाऊ शकते. आता मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स (Homo sapiens). या आपल्या प्रजातील दुसरी कोणतीही जीवजात अजूनतरी नाही. परंतु आदिमानवाचे काही सांगडे सापडले आहेत ते होमो प्रजाती व वेगळ्या जीवजातीत वर्गीकृत होतात त्यांची नावे Homo habilis, Homo erectus अशी आहेत.
कॅरोलस लिन्नेयुस यांच्या वर्गीकरणात प्रत्येक सजीवाला वर्ग (क्लास), गण (ऑर्डर), प्रजाती (जीनस) आणि जीवजाती (स्पेसीज) यात बसवलेले आहे. मानवाचा वर्गीकरणावर आधारित पत्ता पुढील प्रमाणे आहे.
वर्ग (Class) – सस्तन प्राणी (Mammalia)
गण ( Order) – वानरवर्गी (Primate)
प्रजाती ( Genus) – होमो (Homo)
जीवजाती ( Species) – सेपियन्स (sapiens)
वनस्पतींमध्ये Brassica campestris (मोहरी) तर Brassica oleracea (कोबी) अशी नावे वापरतात येथे असा प्रश्न पडेल की, कोठे मोहरी आणि कोठे कोबी? त्यांच्यात काहीतरी साम्य आहे का? हे वर्गीकरण फुलांच्या समान गुणधर्मावर आधारित असल्याने ते एका प्रजातीत मोडतात.
लिन्नेयुस यांच्या वर्गीकरण पध्दतीला अनेक जीवशास्त्र आणि निसर्गवैज्ञानिकांमध्ये मान्यता मिळाली आणि त्याचा लौकिक सर्वदूर पसरला. 1800 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ कुव्हिए याने या वर्गीकरणात महत्वाची भर टाकली. त्याने साधर्म्य असणारे वर्ग (Class) देखील एका छत्राखाली आणून त्याला ‘संघ’ (Phylum) ही संज्ञा दिली. यानुसार पाठीचा कणा, चार पाय, रक्तातील लाल पेशी असे गुणधर्म असलेले प्राणी ‘पृष्ठवंशीय’ (Vertebrate) या संघात येतात. या संघात समाविष्ट होणारे प्राण्यांचे ‘वर्ग’ म्हणजे मस्य, उभयचर (बेडूक), सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि सर्व सस्तन प्राणी.
‘वनस्पतींमधील विवाहाचे प्राथमिक स्वरूप’ या शीर्षकाचा एक निबंध लिन्नेयुस यांनी लिहिला. त्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण करताना त्यांच्यामधील ‘लैंगिकता’ हा एक महत्वाचा गुणधर्म त्यांनी मानला. फुलांमधील केसरदल (Stamen) म्हणजे ‘वर’ तर किजमंडल (Pistle) म्हणजे ‘वधू’ असे त्यांनी कल्पिले. त्यांनी पुनरूत्पादन संस्था हा वनस्पतीच्या वर्गीकरणाचा गाभा मानला होता. फुलांमधील पुनरूत्पादनाचे विविध भाग व त्यांची संरचना यांना दिल्या गेलेल्या लॅटिन भाषेतील नावांना मानवी लैंगिकतेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा अर्थ होता. त्यामुळे तत्कालीन सनातनी लोकांमध्ये प्रचंड खळबळ माजली. अश्लिलतेचा आरोप करून लिन्नेयुस यांचे वर्गीकरण स्त्रिया व मुलांना अजिबात शिकवले जाऊ नये, असा आग्रहदेखील धरला गेला. परंतु, लिन्नेयुस यांची वर्गीकरण पध्दत इतकी मूलभूत, शास्त्रशुध्द व महत्वाची होती हे सर्व आक्षेप नंतर गळून पडले.
कॅरोलस लिन्नेयुस यांनी मांडलेल्या पध्दतीमुळे सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक पाया प्राप्त झाला आणि त्यातून वर्गीकरणशास्त्र (Taxanomy) ही जीवशास्त्रातील एक महत्वाची उपशाखा उदयाला आली. त्या आधारे कोट्यावधी सजीवांचे शास्त्रीय वर्गीकरण केले गेले व त्यांचे गुणधर्म ज्ञात झाले. निसर्गाची अनेक गुपिते आणि कोडी उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले. निसर्गातील सर्व सजीव एका सूत्राने बांधलेले आहेत, ही संकल्पना आणि विश्वाच्या एकात्मतेची संकल्पना दृढ झाली. (वैद्यक शास्त्राला रोगनिवारणासाठीही उपयोग झाला.) निसर्गातील एक छोटासा हिस्सा म्हणजे मानव आणि आपले नाव म्हणजे ‘होमो सेपियन्स’, या मूळ लॅटिन शब्दांचा अर्थ आहे ‘शहाद्र मानव’. आज मात्र या शहाण्या मानवाने आपल्या लालचीपणामुळे निसर्गाचा आणि पर्यायाने स्वत:चा विनाश सुरू केला आहे.