Menu

क्लाडिअस गालिनस

(Claudius Galenus)

जन्म: ०१ जुलै ०१३०.
मृत्यू: ०१ जुलै ०१९९.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र.

क्लाडिअस गालिनस
Claudius Galenus
ग्रीक शरीरशास्त्रज्ञ
जन्म: इ.स.130 मृत्यू: इ.स. 199

वैद्यकशास्त्रात मोलाची भर घालणारा संशोधक

हिपोक्रेटस व आरिस्टॉटल यांच्यानंतर आपले अनुभव व प्रयोगाधारित संशोधनातून मानवी शरीरविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारा गालिनस ऊर्फ गालेन हा पाश्चिमात्य जगतातील महान शरीरशास्त्रज्ञ होता. त्याच्या विचारांचा पगडा सुमारे 1300 वर्षे पाश्चिमात्य वैद्यकीय क्षेत्रावर राहिला.
आशिया मायनरमधील (सध्याच्या टर्कीच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेश) परगामन येथे इ.स.130 मध्ये गालेन यांचा जन्म झाला. अतिशय तीक्ष्ण बुध्दीच्या गालेन यांना त्यांच्या श्रीमंत कृषक पण सुशिक्षित वडिलांनी उत्तम प्रतीचे शिक्षण देऊन डॉक्टर बनवण्यात पुढाकार घेतला. हिपोक्रेटसच्या परंपरेतील त्या काळातील सर्वोत्तम वैद्य सॅटीरस याच्याकडे गालेन यांनी वैद्यकशास्त्राचे धडे घेतले. नंतर आलेक्झांड्रियातील महान वाचनालायाचा लाभ उठवित ते तत्कालीन वैद्यकशास्त्र पारंगत झाले. त्याकाळी उमरावांच्या मनोरंजनासाठी गुलामांच्या सशस्त्र झुंजी लावल्या जात. या द्वंव्द युध्दात गुलामांना होणाऱ्या गंभीर जखमा बरे करण्यात गालेन निष्णात झाले व त्यांनी नाव कमावले. एवढ्या शिदोरीवर ते राजधानी रोममध्ये गेला. पण कोणत्याही वैद्यकीय पंथाचा विचार शिरसावंद्य न मानता प्रत्यक्ष अनुभव व स्वत:ची निरीक्षणे यावर भिस्त ठेवणाऱ्या गालेन यांची या राजधानीतील प्रतिष्ठित वैद्यांमध्ये डाळ शिजेना. त्यामुळे ते रोम सोडायच्या विचारात होते. फ्लाव्हियस या उमरावाच्या मरणोन्मुख पत्नीला वाचवण्यात रोमच्या प्रतिष्ठित वैद्यांना अपयश आले असताना गालेन यांनी तिचे प्राण वाचवले. त्यामुळे फ्लाव्हियसने गालेन यांना शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी पुरेसे पैसे दिले. कुत्री, मांजरे, डुकरे आदींची चिरफाड करून गालेन यांनी अनेक प्रयोग केले व शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास केला. जेव्हा जमेल तेव्हा तो माकडांची आवर्जून चिरफाड करी. कारण त्यांच्या मते, माणसाची शरीरचना माकडासारखी असते. माणसाचे शवविच्छेदन करण्यास ग्रीक समाजात मान्यता नसल्याने त्यांच्या संशोधनावर मोठ्या मर्यादा पडल्या.
गालेन यांची खरी योग्यता व विद्वता सखोल अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण व चिकित्सक परीक्षा या आधारे मांडलेल्या शरीरावयवांसंबंधाच्या शरीरज्ञानात दिसून येते. स्नायूंच्या हालचाली का व कशा होतात याविषयी गालेन यांनी पध्दतशीर संशोधन केले, हात जवळ घेण्यासाठी काही स्नायू आखडतात व विरूद्ध कार्य करणारे सैल पडतात, अशाप्रकारे परस्परविरोधी दिशेने काम करणाऱ्या स्नायूगटांच्या परस्परपूरक कार्यामुळे विविध हालचाली घडतात हे गालेनने प्रथम त्याच्या ‘स्नायूंच्या हालचाली’ या पुस्तकात निरीक्षणे व प्रयोग याच्या आधारे मांडले. मानेच्या पहिल्या मणक्याखाली मणक्याची साखळी कापली तर श्वसन बंद पडून मृत्यू येतो. सहाव्या व सातव्या मणक्यामध्ये काप घेतला तर पुढचे-हाताचे स्नायू बचावतात पण मागचे, पायाचे स्नायू लुळे पडतात. मेंदूतून निघणाऱ्या मज्जातंतूमार्फत स्नायूंच्या हालचालीचे नियंत्रण होते; मज्जातंतू एकदा कापला तर परत वाढत नाहीत; इत्यादी प्रयोगधारित निरीक्षणे नोंदविणारा पश्चिमी जगतातला तो पहिला शास्त्रज्ञ होता. मेंदूकडे संवेदना वाहून नेणारे व मेंदूकडून आज्ञा वाहून नेणारे मज्जातंतू हे वेगवेगळे असतात, असे रूग्णांच्या निरीक्षणावरून त्यांनी मांडले. आरिस्टॉटलचे मत होते की, बुध्दीचे केंद्र ह्रदयात आहे. त्याच्या मते याचा पुरावा म्हणजे मनातले विचार शब्दरूपाने प्रकट होतात ते छातीतून येणाऱ्या आवाजामुळे पण गालेन यांनी संभाषणासाठी संदेश वाहून नेणारा मानेतील मज्जातंतू शोधला व बोलण्याचे केंद्र मेंदूमध्ये आहे हे सिध्द केले.
रक्तभिसरण, श्वसनसंस्था इत्यादींच्या कार्याबाबतची त्यांची मांडणी अपुरी किंवा चुकीची ठरली. याचे मुख्य कारण त्यावेळच्या संशोधनाच्या मर्यादा व काही पूर्वग्रहांचा पगडा. उदा. प्लेटोने मांडलेल्या त्रिदलीय आत्मा- पोषण, जीवन, विवेकबुध्दी या संकल्पनेवर त्याचा विश्वास होता. या संकल्पनेचा पाया घेऊन गालेन यांनी मांडले होते, यकृत आणि नीला या शरीराला पोषक द्रव्य पुरवतात. जवनिका आणि रोहिनी शरीरामध्ये ‘न्यूमा’ नावाचा चेतनदायी द्राव आणि आंतरिक उष्णता सातत्याने जतन करतात. मेंदू आणि मज्जातंतू एक प्रकारचा जीवनदायी द्रवामार्फत संवेदना आणि स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतात. रक्तभिसरणाबाबत गालेन यांनी केलेल्या मांडणीनुसार, नीलांमधील रक्त यकृतामधून जाताना त्यामध्ये आवश्यक मूलद्रव्य मिसळली जाऊन नंतर ती शरीराभर पोचवली जातात. नीलांमधील रक्त ह्रदयाच्या उजव्या कप्प्यात पोचल्यावर काही प्रमाणात ते ह्रदयातील मांसल पडद्यामधून डावीकडे झिरपते व तिथे त्याच्यात शक्तीवर्धक द्रव्ये मिसळली जातात. रोहिण्यामधील रक्तात जीवनदायी विशिष्ट शक्ती मिसळून चेतनादर्शक हालचाली करणे शक्य होते. फुफ्फुसामार्फत होणाऱ्या श्वसनांचे मुख्य कार्य रक्त व ह्रदय थंड करण्याचे असते. आधुनिक संशोधनाआधारे शरीरक्रियांविषयी शास्त्रीय पाया निर्माण झाल्यानंतर गालेन यांच्या वरील मांडणीतील त्रुटी मान्य झाल्या.
गालेन यांनी 400 च्या वर शोधनिबंध लिहिले. पण त्यातले अनेक रोममधील एका मोठ्या आगीत नष्ट झाले. शरीरशास्त्राच्या शास्त्रीय पध्दतीचा पाया घालणाऱ्या गालेन यांच्या मृत्यूनंतर हे शास्त्र पुढे 1300 वर्षे विकसित झाले नाही. त्यांच्या पुस्तकांचा आंधळेपणाने पाठपुरावा करण्यात आला. माणसाचे शवविच्छेदन करून व्हेसॉलियसने (1514-1464) माकडांच्या शवविच्छेदनाआधारे गालेन यांनी मानवी शरीराबद्दल जी मांडणी केली होती, त्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या व मानवी शरीररचनेबद्दल शास्त्रशुध्द ग्रंथ लिहिला. त्यानंतर 17 व्या शतकात विल्यम हार्वेने केलेल्या शरीरक्रियेविषयीच्या संशोधनानंतर शरीरक्रियाशास्त्रही वैज्ञानिक पायावर उभे राहिले.