Menu

डेव्हिड ब्रॅडफोर्ड वेर्नर

(David Werner)

जन्म: २६ ऑगस्ट १९३४.
कार्यक्षेत्र: वैद्यकशास्त्र.

डेव्हिड ब्रॅडफोर्ड वेर्नर
David Werner
अमेरिकन आरोग्य वैज्ञानिक
जन्म: 26 ऑगस्ट 1934

आरोग्यचळवळीतील दीपस्तंभ

डॉक्टरकीची पदवीही नसलेल्या डेव्हिड वेर्नर यांचे ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ (‘डॉक्टर नसेल तेथे’) हे सर्वसामान्य जनता, आरोग्य कार्यकर्ते यांच्यासाठी लिहिलेले पुस्तक आज जगभर 80 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे व त्याच्या 20 लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. प्राथमिक आरोग्यसेवेसोबत सर्वांधिक प्रसिध्द असलेल्या या पुस्तकाचे लेखक मुळात प्राणीशास्त्र व परिस्थिती विज्ञानाचे चाहते व पदवीधर. तरूणपणी प्रस्थापित अमेरिकन संस्कृतीपासून जास्तीत जास्त दूर जायच्या प्रयत्नात ते प्रथम ऑस्ट्रेलियात व नंतर भारतात पोचले. भारतात आचार्य विनोबा भावेंच्या ‘भूदान’ कार्यक्रमाने व म. गांधींजीनी स्थापलेल्या ‘नयी तालीम’ शिक्षण पध्दतीने ते प्रभावित झाले. म. गांधीजी व जे. कृष्णमूर्तीं यांच्या शिक्षणपध्दतीमुळे विद्यार्थ्यामधील चिकित्सकदृष्टी तसेच प्रश्न सोडवण्याची, समाजभिमुख, सहकार्यप्रविण, कृतिप्रवण वृत्ती जोपासते, असा त्यांना अनुभव आला. त्यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये विद्यार्थी-पालकांची सहकारी प्राथमिक शाळा सुरू केली. या अभिनव शाळेत वापरलेली, विद्यार्थ्यांना स्वत:निरीक्षण, विचार व प्रयोग करायला उद्युक्त करणारी शिक्षण पध्दती त्यांनी पुढे आपल्या आरोग्य कामात वापरली व त्यातूनच त्यांच्या जगप्रसिध्द कामाचा, लिखाणाचा उगम झाला.
विद्यार्थ्यांच्या जीवन शिक्षणासाठी, निरीक्षणासाठी काढायच्या शैक्षणिक सहलींसाठी नवा प्रदेश शोधताना पश्चिम मेक्सिकोतील पायपिटीत डोंगराळ प्रदेशातील जनतेशी त्यांचा जवळून संबंध आला. या पहाडी जनतेच्या दिलदार, स्वावलंबी मानवी वृत्तीमुळे ते प्रभावित झाले. पण त्याचबरोबर या डोंगराळ भागातील वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे तेथील जनतेचे साध्या आजारांमुळेही होणारे अतोनात, जीवघेणे नुकसान पाहून ते फार अस्वस्थ झाले. या परिस्थितीतून मार्ग काढताना ‘पिअक्स्टला प्रकल्प’ जन्माला आला. कमी शिकलेले कार्येकर्ते हे जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा देणे, आरोग्य शिक्षण देणे हे काम फार प्रभावीपणे करू शकतात, हे या प्रकल्पातून पुढे आले. या आरोग्य कार्यकर्त्यासाठी 1964 मध्ये लिहिलेल्या स्पॅनिश भाषेतील ‘डोंडे नो हाय डॉक्टर’ या पुस्तकाने प्राथमिक आरोग्यसेवेत क्रांती घडवून आणली. रोग-निदान, उपचार, आरोग्य-शिक्षण यावरील डॉक्टरांची मक्तेदारी मोडून काढणे, वैद्यकीय तंत्रज्ञानाभोवतालचे वलय भेदले जाऊन ते सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातातले हत्यार बनणे, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाभोवतालचे वलय भेदले जाऊन ते सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातातले हत्यार बनणे, आधुनिक वैद्यकीय ज्ञानासोबत शक्य तेथे पारंपरिक उपचार पध्दतींचाही अनुभवाच्या आधारे पुस्तकात समावेश कऱणे, उपचारत्मक ज्ञान, रोगप्रतिबंध व सामाजिक न्यायाची भूमिका यांचा सुंदर काढलेली वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्रे इत्यादींची रेलचेल, यामुळेही या पुस्तकाची उपयुक्तता खूपच वाढली व जगभर ते लोकप्रिय ठरले. आरोग्य कार्यकर्त्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या शेकडो आरोग्य प्रकल्पांचे ते मार्गदर्शक ठरले.
आरोग्य कार्यकर्त्याचे प्रशिक्षण कसे करावे, यासाठी पिअक्स्टला प्रकल्पाच्या आधारे लिहिलेले ‘हेल्पिंग हेल्थ वर्कर्स लर्न’ हे पुस्तकही असेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पथदर्शक पुस्तक ठरले. स्वत: काहीसे अपंग असलेल्या डेव्हीड वेर्नर यांनी अपंग मुलांच्या मदतीने अपंगत्वावर मात करण्यासाठी निरनिराळी संसाधने, उपकरणे स्थानिक साधनसामग्रीतून, अत्यंत कल्पक रीतीने व अतिशय स्वस्तात तयार केली. अपंगांना स्वावलंबी बनवणारी, तशी दृष्टी देणारी ही सहकारी कार्यपध्दती व त्यावर आधारित प्रशिक्षण पुस्तके जगभर नावाजली गेली. तसेच वरच्या इयत्तेतील मुलांनी खालच्या इयत्तेतील मुलांच्या आरोग्यविषयक काळजी घेणे, त्यांना शिकवणे व या प्रक्रियेतून आपण सबळ होणे अशी ‘मुलांकडून-मुलांकडे’ ही शिक्षणाची नवी पध्दत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिअॅक्स्टला प्रकल्पातून पुढे आणली. निरनिराळ्या देशांमध्ये आज ती अंगिकारली जात आहे.
क्रांतिकारी शिक्षण पध्दती हाडीमासी रूजलेला हाडाचा शिक्षक हा लोकांकडून सतत शिकत असतो, नवीन प्रयोग, नवीन वाटचाल करत असतो. लोकांचे आरोग्य हे सामाजिक-आर्थिक रचनेवर मूलत: अवलंबून असते व सध्याची आर्थिक-सामाजिक रचना, विशेषत: अलीकडच्या काळातील खाजगीकरण, यांतून आरोग्याला होत असलेला धोका वाढत चालला आहे अशा प्रकारची अधिकाधिक तीव्र जाणीव झाल्याने गेली काही वर्षे या बाबतीत जागतिक पातळीवर 50 पेक्षा जास्त देशांमध्ये शिक्षण व प्रशिक्षण यांतून जनजागृती करण्यावर डेव्हिड वेर्नर यांचा भर राहिला आहे. ‘हेल्थ राईटस’, ‘इंडरनॅशनल पीपल्स हेल्थ कौन्सिल’ या संघटनेच्या शाखांमार्फत अनारोग्यकारक व्यापारीकरणाविरूद्ध दंड थोपटून उभा राहिलेला हा योध्दा – शिक्षक, सध्याच्या प्रदूषित वातावरणात दिशा दाखवणारा आरोग्य चळवळीतील दीपस्तंभ आहे असेच म्हणायला हवे.