जन्म: १२ मे १९१०.
मृत्यू: २९ जुलै १९९४.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र.
डोरोथी फ्रोफूट हॉजकिन
Dorothy Hodgkin
इंग्लिश जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्म : 12 मे, 1910
मृत्यू : 29 जुलै, 1994
नोबेल पारितोषिक विजेत्या जीवरसायनशास्त्रज्ञ
डोरोथी हॉजकिन यांचा जन्म इजिप्तची राजधानी कैरो येथे झाला. त्यांचे वडील पुरातत्वशास्त्रज्ञ होते. त्यामुळे हॉजकिन कुटुंब जगातल्या विविध देशांत दौरा करीत असे. डोरोथी यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. 1937 मध्ये डोरोथी यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या संशोधनाचा विषय होता ‘क्ष’ किरणांच्या वक्रीभवन तंत्राच्या साहाय्याने शरीरातील ‘पेप्सीन’ या पाचक रसाच्या स्फटिकांचा अभ्यास. त्या आधारे त्यांनी पेप्सीनच्या सेंद्रिय रासायनिक रचनेवर संशोधन केले व पुढे याच दिशेने विविध सेंद्रियांच्या रचनांचा अभ्यास केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इतर शास्त्रज्ञांप्रमाणे फ्लोरी व चेन हे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक पेनिसिलीनच्या रचनेचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्याच वेळी डोरोथी यांनी ‘क्ष’ किरणांच्या वक्रीभवन तंत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणासाठी संगणकाचा वापर करण्यास सुरूवात केली. या नव्या पद्धतीमुळे 1949 साली पेनिसिलीनच्या रचनेचा शोध लावण्यात यश आले. जगात प्रथमच जीवरासायनिक संशोधनात संगणकाचा वापर केला जाऊन संशोधनाला नवीन दिशा मिळाली. पण डोरोथी येथेच थांबल्या नाहीत. त्यांनी ‘सायनो कोबाल अमाईन’ म्हणजे बी-12 जीवनसत्वाच्या रेणवीय अभ्यासाला सुरूवात केली. हा रेणू पेनिसिलीनच्या रेणूपेक्षा चारपट मोठ्या आकाराचा होता आणि त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. संगणकाचा वापर व इतर रासायनिक विश्लेषण यांच्या आधारे पाच वर्षे अविरत संशोधन करून त्यांनी बी-12 जीवनसत्वाच्या रचनेचा उलगडा केला. 1964 मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.