Menu

जॉर्जेस क्युव्हिए

(Georges Cuvier)

जन्म: २३ ऑगस्ट १७६९.
मृत्यू: १३ मे १८३२.
कार्यक्षेत्र: जीवशास्त्र.

जॉर्जेस क्युव्हिए
Georges Cuvier
फ्रेंच जीवशास्त्रज्ञ
जन्म : 23 ऑगस्ट, 1769
मृत्यू :13 मे, 1832

जीवाश्मविज्ञानाचा जनक

फ्रान्समधील जिप्समच्या खाणीत मजूर जमीन खणत होते आणि फावड्याने माती ओढताना प्रत्येक वेळी कोणत्यातरी जनावराची मोठ्या आकाराची जीवाश्म झालेली हाडे मिळत होती. हा प्रकार बघून मजूर स्तंभित झाले. कारण माहितीच्या कोणत्याही जनावराची ती हाडे नव्हती. शेवटी ती सर्व हाडे तेथील निसर्ग अभ्यास संग्रहालयातील (NaturalHistory Musium) जॉर्ज क्युव्हिए नावाच्या तरूण प्राध्यापकांकडे पाठविण्यात आली. कारण संपूर्ण युरोपमध्ये कुव्हीए यांच्या इतका ‘जीवाश्म विज्ञान’ ( palentology) मध्ये दुसरा कोणी तज्ज्ञ नव्हता.
जॉर्ज क्युव्हिए यांना लहानपणापासूनच निसर्ग विज्ञानाची आवाड होती. त्यांचे वडील स्वीस सैन्यातील निवृत्त सैनिक होते. परंतु त्यांना मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. क्युव्हिएची आई मात्र जातीने त्यांच्या शिक्षणात लक्ष घालत असे. तिनेच त्यांना साहित्य, संगीत, इतिहास आणि विज्ञानाचे धडे दिले. तसेच आईच्या प्रोत्साहनामुळे आणि तिने आणून दिलेल्या निसर्गाविषयीच्या पुस्तकांमुळे क्युव्हिए यांना निसर्गविज्ञानात खास रूची उत्पन्न झाली. पुस्तकांमधील रंगीत चित्रे स्वत: कागदावर रेखाटून ती रंगविण्याचा त्यांना नादच होता. वाचण्यासाठी नेहमीच नवीन पुस्तके मिळत असल्याने त्यांची वाचनाची आवड आणि ज्ञानाची भूक वाढतच होती. प्राणी जगताविषयीचे प्रा. बूफॉ यांचे सर्व 36 खंड त्यांच्याजवळ होते. आणि ते खंड त्यांचे सर्वांत आवडते होते. जॉर्ज यांनी बुध्दिमत्ता आणि ज्ञानलालसेच्या जोरावर सरकारी शिष्यवृत्ती मिळवली आणि पदवी शिक्षणासाठी स्टूटगार्ट विद्यापीठात प्रवेश मिळवला. चार वर्षांनंतर पदवी मिळाल्यानंतर त्यांनी नार्मंडी येथे शिक्षक म्हणून नोकरी धरली. नार्मंडी येथे नोकरी पत्कारण्याचा मोठा फायदा म्हणजे सागरी प्राणी व जीवाश्मे यांनी समृध्द असलेला तेथील समुद्र किनारा, तेथील उत्तम ग्रंथालय, व त्यामधील लिन्नेयुसचा ‘निसर्गाची व्यवस्था’ (Systema Nature) हा निसर्गविज्ञानावरील ग्रंथ.
1795 मध्ये क्युव्हिए यांची निसर्गविज्ञान संग्रहालयात शरीरशास्त्राच्या प्राध्यापकांचा सहाय्यक म्हणून नेमणूक झाली. तेथे त्यांनी उत्तम प्रकारे संशोधन करून आपला प्रभाव सर्वत्र पाडला. एक वर्षातच त्यांनी पहिला शोधनिबंध सादर केला. यामध्ये मांडले होते की, पुरातन काळातील प्राणी आणि सध्या अस्तित्वात असलेले प्राणी एकमेकांपेक्षा फार वेगळे होते. आज या विधानात नवीन काहीच वाटत नाही. पण त्याकाळी असे मानले जात असे की, पुरातन काळातील प्राणी व मानव आणि आज अस्तित्वात असलेले प्राणी व मानव यांचे गुणधर्म आणि जीवनपध्दती सारख्याच होत्या. आपले म्हणणे सिध्द करताना त्यांनी जमिनीखाली मिळालेले पुरातन प्राण्यांच्या हाडांचे विखुरलेले सांगाडे एक एक हाड करून जुळवले. सर्व हाडे आणि दात, जबडे तारांनी बांधून त्यांचे सांगाडे बांधले. अशा प्रकारे दोन तृणभक्ष जनावरांचे पूर्ण सांगाडे बनविण्यात त्यांना यश आले. हे सांगडे आज अस्तित्वात असलेल्या प्राण्यांपेक्षा अगदी वेगळे होते. त्यावरून त्यांनी मांडले की 5 कोटी वर्षांपूर्वी हे दोन प्राणी भूतलावरून नष्ट झाले होते.
वरील शोधानंतर क्युव्हिएची ख्याती ‘जीवाश्म हाडेवाला’ वैज्ञानिक म्हणून फ्रान्सभर पसरली आणि अनेक लोक त्यांना सापडलेली हाडे व सापळे क्युव्हिए यांच्या संग्रहालयात गाड्या भरूनभरून पाठवू लागले. मिळालेले नमुने आणि स्वत: जमविलेले नमुने यांच्या आधारावर त्यांनी ‘टेरोडक्टाईल’ नावाच्या सरपटणाऱ्या प्राणीसदृश पक्ष्याचे अस्तित्व सिध्द केले. त्यांच्या संशोधनामुळेच जीवाश्मविज्ञान ही विज्ञानाची नवीन शाखा प्रस्थापित झाली. टेरोडक्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी व पक्षी यांचा उत्क्रांती निदर्शक एक दुवाच होता. जीवाश्मांच्या अभ्यासावरून प्राण्यांचे वेगळ्या पध्दतीने वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. लिन्नेयुसने मांडलेल्या वर्गीकरण पध्दतीमध्ये प्राण्यांचे बाह्य स्वरूप व दृश्य गुणधर्म यांना महत्वाचे स्थान होते. क्युव्हिए यांनी शरीररचनाशास्त्र (Anatomy) आणि शरीरक्रियाशास्त्र या दोहोंचा देखील वर्गीकरण पध्दतीमध्ये समावेश केला. त्यांचे मत असे होते की, वेगवेगळ्या गटाचे प्राणी वेगवेगळ्या पण विशिष्ट कार्यासाठी उत्पन्न केलेले होते. आपल्या 25 वर्षांच्या संशोधनाव्दारे त्यांनी जीवाश्मविज्ञान तुलनात्मक शरीरशास्त्र यावर अनेक शोधनिबंध तर लिहिलेच या शिवाय “मासे आणि त्यांचे निसर्गचक्र’ या विषयावर एक ग्रंथ लिहिला. यामध्ये सुमारे 5 हजार जातींच्या माशांचे वर्णन केलेले आहे. उत्क्रांतीवादावर जरी त्यांना विश्वास नसला तरी त्यांनी केलेल्या प्राण्यांच्या शरीरशास्त्रीय संशोधानाचा उपयोग मात्र उत्क्रांतीचा सिध्दांत बळकट करण्याकरता झाला, हा एक विरोधभास आहे. क्युव्हिए यांचे एक वैशिष्ट्य मात्र होते की, त्यांच्या प्राणीजगताविषयीच्या संकल्पनेला जेव्हा जेव्हा वैज्ञानिक पुराव्यानिशी विरोध केला जाई तेव्हा मोकळेपणे ते आपली चूक मान्य करत असत. त्यामुळेच चार्ल्स डार्वीनचा उत्क्रांतीचा सिध्दांत पडताळून पाहण्याइतका काळ ते जगले असते तर त्यांनी आपली चूक मान्य केली असती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.