Menu

गर्टूड एलियन

(Gertrude B. Elion)

जन्म: २३ जनेवारी १९१८.
मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९९.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र.

गर्टूड एलियन
Gertrude B. Elion
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्म : 23 जानेवारी, 1918
मृत्यू : 21 फेब्रुवारी, 1999

नेत्रदीपक कामगिरी करणारी औषधशास्त्रज्ञ

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जीवरसायनशास्त्रज्ञ आणि वैद्यक तंत्रज्ञान या विज्ञानाच्या शाखांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. तिच्या आधारावर औषधविज्ञान (Pharmacology) विषयालासुद्धा चालना मिळून ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) व इतर कर्करोग, विषाणू रोग, अवयवारोपण शस्त्रक्रिया इ.साठी उपयुक्त, परिणामकारक औषधे शोधण्यासाठी जोरात संशोधन सुरू झाले. याची परिणती म्हणून ल्युकेमियावर पहिले परिणामकारक औषध शोधले गेले. अशा प्रकारे औषधे शोधणाऱ्या औषधशास्त्रज्ञांमध्ये कळीचे स्थान असणारी स्त्री वैज्ञानिक म्हणजे गर्टूड एलियन.
गर्टूड यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये पूर्व युरोपातून स्थलांतरीत झालेल्या ज्यू कुटुंबात झाला. 1937 साली हंटर कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली. आर्थिक मंदीमुळे वैद्यकशास्त्रात संशोधन करण्याचे स्वप्न पुरे करणे त्यांना अवघड झाले. त्यामुळे प्रयोगशाळेत साहाय्यक, शालेय शिक्षिका अशा नोकरी करत गर्टूड यांनी 1941 मध्ये पदवी मिळवली. नंतर नोकरीच्या शोधात असताना एक स्त्री म्हणून डावलले जाण्याचे कटू अनुभव त्यांना आले. एके ठिकाणी तर त्यांना “तू सुंदर आहेस, त्यामुळे इतर पुरूष सहकाऱ्याचे लक्ष विचलित होईल” असे सांगून नोकरी नाकारण्यात आली. 1944 साली एलियन यांना बरोज वेलकम कंपनीच्या वेलकम संशोधन प्रयोगशाळेत जीवरसायनशास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. नोकरीचा संपूर्ण कार्यकाळ एलियन तेथे राहिल्या.
प्रो.जॉर्ज हिचिंग्ज हे तेव्हा जीवरसायन विभागाचे प्रमुख होते. तेव्हा रोगावर नवीन औषध शोधण्याची पद्धत म्हणजे विविध प्रकारची रसायने वापरून त्यांचा परिणाम तपासून पाहणे अशी मर्यादित आणि अनियोजित होती. प्रो.हिचिंग्ज यांना ही पद्धत मान्य नव्हती. त्यांना अपेक्षित होता तो तर्कसंगत औषधे शोधण्याचा कार्यक्रम. रोगजंतूंच्या चयापचय क्रियांचा अभ्यास करून या क्रिया खंडित करणारी औषधे परिणामकारक व उपयुक्त ठरतील, असे त्यांना अभिप्रेत होते. आपले मत एलियन यांना पटवून देऊन त्या दोघांनी आपला संशोधन मार्ग मुक्रर केला. या संशोधन कार्याक्रमातून त्यांनी आपले लक्ष पेशींमधील न्यूक्लिक अॅसिडस् म्हणजे केंद्रक आम्लांवर केंद्रित केले. तेव्हा केंद्रक आम्ल DNA आणि RNA अशी दोन प्रकारची असून त्यांचा आनुवंशिकतेशी संबंध असतो, हे ज्ञात नव्हते. परंतु केंद्रक आम्ल म्हणजे पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे ‘प्युराईन’ व ‘पायरीमेडीन’ या रासायनिक गटांतील रेणूंच्या रचनेवर आधारित असणारे आम्ल असते हे ज्ञात होते. त्यापैकी प्युराईनच्या अभ्यासाची जबाबदारी एलियन यांच्यावर सोपविण्यात आली. प्युराईनचे प्रकार व घटक यांचा अभ्यास करून, विविध घटक वेगळे करून, त्यांचा ल्युकेमिया बरा करण्यासाठी उपयोग होतो का, हे तपासून पाहण्यास त्यांनी सुरूवात केली. ही क्रिया धिमी असते, त्यामध्ये वेळ पुष्कळ लागतो. तरीसुद्धा चिकाटी न सोडता त्यांनी ‘डायअमायनो प्युराईन’ हा घटक शोधून काढला. ल्युकेमियाच्या रुग्णांमध्ये रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण जास्त वाढत असते. परंतु डायअमायनो प्युराईनमुळे हे प्रमाण वाढण्याची गती कमी होते. कारण हे औषध पांढऱ्या पेशींची वाढ रोखण्यास समर्थ होते. परंतु या औषधाचे इतर दुष्परिणाम निदर्शनाला आले. म्हणून त्यावर संशोधन करून त्यांनी ६ MP किंवा ६ मरकॅप्टो प्युराईन नामक दुसरे औषध शोधून काढले. हे औषध लहान मुलांवरील ल्युकेमियावर गुणकारी ठरले आणि ते आज देखील वापरात आहे. नंतर ६MP औषधाचा एक रायायिनक प्रकार मुत्रपिंड रोपण झालेल्या रूग्णामध्ये अत्यंत उपयुक्त असतो, असे आढळून आले.
एलियन आणि हिचिंग्जचे यश खरोखरच नेत्रदीपक होते आणि म्हणूनच हिचिंग्ज यांना ‘बरोज वेलकम’चे संशोधन संचालक म्हणून बढती मिळाली आणि एलियन यांना ‘प्रायोगिक उपचार’ विभागाचे प्रमुख नेमण्यात आले. तोपर्यंत १९६० चे दशक संपण्याच्या मार्गावर होते आणि जीवाणूंना मारक विविध प्रतिजैविकांचा शोध लागून जीवाणू रोगग्रस्तांना दिलासा मिळाला होता. परंतु विषाणूग्रस्त रोगांवर मात्र अजून औषध सापडत नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे विषाणू नेहमीच पेशींच्या आत वास्तव्य करून तेथेच वृध्दिंगत होतात. अशा पेशींना मारक न ठरता, फक्त विषाणूंना मारक ठरेल असे औषध सापडणे अवघड जात होते. येथेच हिचिंग्ज यांची ‘जंतूंच्या चयापचय खंडनाची वा निरोधनाची’ संकल्पना उपयुक्त ठरली. गोवर, कांजिण्या, फ्ल्यू इ. विषाणू-रोग आपल्याला माहीत आहेत. हपींझ जातीच्या विषाणूंमुळे विविध बाधा होतात. यांमध्ये नागीण, जननेंद्रियांचे आजार व क्वचित हपींझमुळे होणारा मेंदू दाह इ. विकार समाविष्ट होतात.
या हपींझ विषाणूंवर औषध शोधण्यासाठी एलियन यांनी १९६० पासून सुरूवात केली. याकरता त्यांनी स्वत:च शोधलेल्या एक प्रकारच्या प्युराईनवर आपले लक्ष केंद्रित केले. हपींझ विषाणू शरीरातील पेशींमध्ये बाधा आणतात; म्हणजेच ते पेशींच्या आत शिरकाव करतात आणि पेशींमध्ये एक विशिष्ट वितंचक तयार करतात. नंतर ते तेथे वृद्धिंगत होत असताना म्हणजेच त्यांचे गुणन होत असताना या वितंचकाची हपींझ विषाणूंना आवश्यकता असते. एलियन यांनी शोधलेल्या औषधांची या वितंचकाशी रासायनिक जोडणी होत असल्याने विषाणूंचे गुणन होताना औषधदेखील वितंचकाबरोबर विषाणूंपर्यंत पोचते. या औषधामुळे विषाणूंच्या DNA बनवण्याच्या म्हणजेच गुणन क्रियेत अडथळा निर्माण होऊन क्रिया खंडित होऊन शेवटी विषाणूंची वाढच बंद झाल्यामुळे त्यांचा नायनाट होतो. या औषधाला ‘एसायक्लोव्हिर'(Acyclovir) असे नाव दिले गेले. आणि आजदेखील हपींझ विषाणू बाधांवर ते गुणकारी म्हणून वापरले जाते. या शोधामुळे एलियन यांची कीर्ती, नाव जगभर झाले. एलियन यांच्या मते, ‘एसायक्लोव्हिर’चा शोध म्हणजे त्यांनी लावलेल्या शोधांपैकी सर्वांत ‘बहुमोल रत्न’ होय.
१९८८ साली एलियन यांना नोबल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी वापरलेल्या ‘चयापचय निरोधन वा खंडन’ पद्धतीचा वापर करून ७-८ वर्षांपूर्वी अनढ नावाचे एड्स रोगावर काही प्रमाणात उपयुक्त असणारे औषध शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. तसेच या पद्धतीचा वापर करून विषाणू रोगांवर गुणकारी औषधे शोधण्यासाठी जगभर औषधशास्त्रातील तज्ज्ञ संशोधन करत आहेत. गर्टूड एलियन यांनी मिळवलेले यश लक्षात घेता, इतर विषाणूंविरोधी औषधेदेखील मिळण्याची शक्यता नक्कीच निर्माण झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.