जन्म: ०२ जनेवारी १९२०.
मृत्यू: ०६ एप्रिल १९९२.
कार्यक्षेत्र: जीवरसायनशास्त्र, विज्ञानकथालेखक.
ऐझॅक असिमोव
Isaac Asimov
अमेरिकन विज्ञानकथालेखक व
जीवरसायनशास्त्रज्ञ
जन्म : 2 जानेवारी, 1920
मृत्यू : 6 एप्रिल, 1992
लोकप्रिय विज्ञानकथाकार
आधुनिक विज्ञान चित्तवेधक व सोप्या पद्धतीने उलगडून दाखविणारे एक महान लेखक ऐझॅक असिमोव यांचा जन्म 2 जानेवारी 1920 रोजी रशियातील पेट्रोविची येथे झाला. 1923 साली त्यांच्या वडिलांनी अमेरिकेतील ब्रुकलीन येथे स्थलांतर केले. लहानपणी वडलांचे खाऊचे दुकान हेच त्यांचे छोटे विश्व होते. दुकानातील मासिके वाचून त्यांना वाचनाची गोडी लागली व तेथेच त्यांची विज्ञानकथांशी पहिली गाठभेट झाली. कोलंबिया विद्यापीठातून रसायनशास्त्र पीएच.डी संपादन केल्यानंतर ते बॉस्टन विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. ‘जीवरसायनशास्त्र आणि मानवी चयापचय'(Biochemistry and Human Metabolism) या पुस्तकाचे ते सहलेखक होते. परंतु, ते जगप्रसिद्ध झाले ते त्यांच्या विज्ञान कथा-कादंबऱ्यांमुळे व विज्ञान लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे.
विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) म्हटली की ‘स्टार-ट्रेक’सारखी चमत्कारपूर्ण व उपकरणांची रेलचेल असलेली अमानवी साहस कथा डोळ्यासमोर येते. असाही एक समज असतो की विज्ञानकथा म्हणजे युद्धकथा, रहस्यकथा, साहसकथा वा नवलकथा अशा केवळ एक मनोरंजनपर वाड्मयाचा प्रकार आहे. असिमोव यांच्या मते, विज्ञानकथा या विज्ञानातील प्रगती आणि बदल यांना दिलेला साहित्यिक प्रतिसाद असतो. विज्ञानाच्या संदर्भातील संपूर्ण मानवी अनुभवांची अभिव्यक्ती त्यात असते. विश्वाची रहस्ये शोधण्याचे कार्य विज्ञान करत असते. तरीही विज्ञानकथांमध्ये विचारांना चालना देणाऱ्या ‘कूट-उकल’ पैलूंची जोड देणे सोपे नव्हते. नेमकी हीच किमया असिमोव यांनी साधली. निव्वळ चित्तथरारक, नवनव्या यंत्रतंत्राचे वर्णन करणाऱ्या व साहसकथांच्या स्वरूपाच्या विज्ञानकथांऐवजी असिमोव यांनी आपल्या कथांमधून कोडी सोडवता सोडवता विज्ञान व त्याची विचारपद्धती वाचकांपर्यंत पोचवण्यात यश मिळवले. विज्ञानाच्या प्रगतीमुळे झपाट्याने बदलत्या युगातल्या माणसाला त्यांनी नवनवीन जीवन अनुभवांचा सांस्कृतिक अर्थ स्पष्ट करून सांगितला. असिमोव यांच्या विज्ञानकथेचे आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी विज्ञानकथेचे अमानवी रूप बदलून तिला माणुसकीचा ओलावा असलेली, तरल मानवी संबंधाची जाण असलेली संवेदनशील साहित्यकृती बनवली. सोप्या आणि आंतर्स्पशी शैलीतील त्यांची साहित्य निर्मिती पाचशेपेक्षा अधिक ग्रंथ होतील इतकी अफाट आहे. अमेरिकेतील विज्ञानकथा लेखकांनी ‘नाईट फॉल’ या त्यांच्या विज्ञानकथेची सर्व काळातील सर्वोत्तम विज्ञानकथा म्हणून निवड केली.
असिमोव यांना विज्ञान सर्वांसाठी खुले असले पाहिजे आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचले पाहिजे अशी गाढ आंतरिक ओढ होती आणि म्हणूनच त्यांनी विज्ञानप्रसाराला पूर्णपणे वाहून घेतले होते. ते म्हणत, “विज्ञान इतके महत्वाचे आहे की ते केवळ वैज्ञानिकांवर सोपवून चालणार नाही.” असिमोव यांच्या एखाद्या लेखाने, कथेने वा कादंबरीने कितीजणांना शास्त्रज्ञ होण्याला प्रवृत्त केले असेल, तसेच त्यांच्या लेखनामुळे किती सर्वसामान्य नागरिक विज्ञानाविषयी आपुलकी बाळगून आहेत, याचा अंदाज करणे अवघड आहे. संगणकातील ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ (Artificial Intelligence) याविषयी डॉ.मिन्स्की यांना प्रेरणा मिळाली ती असिमोव यांच्या ‘यंत्रमानवाच्या'(Robot) कथांमधूनच. त्यांनी आपल्या विज्ञानकथेतून मानव व यंत्रमानव यांच्यामध्ये सहकार्याचे संबंध आवर्जून प्रतिबिंबित केले होते. कारण तोपर्यंतच्या कथांमध्ये यंत्रमानवाचे काळेकुट्ट, दुष्टप्रवृत्त असे चित्रण होत असे. ते दूर करून यंत्रमानवाच्या साहाय्याने प्रगती कशी साधता येईल याची भविष्यकालीन शक्यता त्यांनी पुढे आणली.
अस%