जन्म: ३० नोव्हेंबर १८५८.
मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७.
कार्यक्षेत्र: वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र.
जगदीशचंद्र बोस
Jagdishchandra Bose
भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ
जन्म : 30 नोव्हेंबर 1858
मृत्यू : 23 नोव्हेंबर 1937
जगदीशचंद्रांचा जन्म पूर्व बंगालमधील विक्रमपूर ह्या खेड्यात झाला. त्यांचे वडील फरिदपूरला सरकारी अधिकारी होते. इंग्रजी शाळेत न घालता भगवानचंद्र यांनी आपल्या मुलाला आवर्जून खेड्यातील पाठशाळेत घातले. त्याबाबत जगदीशचंद्र लिहितात, ‘त्यामुळे मला स्वभाषा व संस्कृतीचा वारसा मिळाला. आणि जनसामान्यांबाबत सहभावना निर्माण झाली.’ कलकत्याहून पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन लंडन विद्यापीठातून त्यांनी 1884 साली पुढील पदवी घेतली व कलकत्याला प्रेसिडेन्सी कॉलेजात प्राध्यापक म्हणून आपले अध्यापन व संशोधन सुरू केले.
जगदीशचंद्रांचा पहिला महत्वाचा शोध म्हणजे बिनतारी संदेश वाहक साधनाचा. 1895 मध्ये कलकत्यात त्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. ह्याच सुमारास इटलीतील मार्कोनी ह्यांनी बिनतारी संदेश पाठविण्याचा प्रयोग केला व त्याचे ‘पेटंट’ घेतले. आज जगात मार्कोनी हा बिनतारी संदेशवाहनाचा शोधक मानला जातो. जगदीशचंद्रांना मात्र शास्त्रीय शोधाचा व्यक्तिगत फायदा उठवावा हे मान्य नव्हते. त्याचा वापर मानवजातीच्या हितासाठी सर्वांना खुला असावा अशी त्यांची भूमिका होती.
प्रकाश परिवर्तन, चक्रीभवन, अपारदर्शक वस्तूंचे प्रकाशकीय गुणधर्म आदी संशोधनाकडून पुढे ते जीवभौतिकशास्त्रातील संशोधनाकडे वळले. निर्जीव वस्तू व सजीव वस्तू यांच्या वर्तनामध्ये काही बाबतीत समांतरता असते हे त्यांच्या लक्षात आले. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले.
प्रथम त्यांनी वनस्पतीवरील प्रयोग हाती घेतले हवा, प्रकाश, अन्न आदी घटकांचा वनस्पतीवरील परिणाम, वनस्पतीची वाढ व वनस्पतींचा प्रतिसाद आदींची मापने करण्यासाठी त्यांनी अनेक उपकरणे बनवली. उदा. वनस्पतीच्या वाढीचे एक कोटीपट विवर्धन करून शकणारे उपकरण क्रेस्कोग्राफ याच्या साहाय्याने एका सेकंदात होणारी वाढ मोजणे शक्य झाले. वनस्पती ववैरल्यमापनयंत्र (प्लॅंट मॅनोमीटर) बनवून त्याच्याद्वारे झाडे जमिनीपासून शेंड्यापर्यंत रस कसा ओढून नेतात हे त्यांनी दाखविले. सूर्याच्या मार्गक्रमणावर रस ओढून घेण्याचा वेग अवलंबून असतो व भरती ओहटीप्रमाणे तो बदलतो असे त्यांना आढळले. आनुनादिक नोंदणी यंत्र (रेझोनंट रेकॉर्डर) या यंत्राच्या सहाय्याने वनस्पती किंवा धातूंना एका ठिकाणी धक्का दिल्यास दुसऱ्या ठिकाणी प्रतिसादात्मक क्रिया होते ती किती प्रमाणात व किती वेळाने होते हे ध्वनीशास्त्रातील अनुनाद’ तत्त्वाचा फायदा घेऊन सेकंदाच्या शंभराव्या किंवा त्यातूनही सूक्ष्म कालविभागापावेतो काढणे शक्य झाले. वनस्पतींमध्ये होणारी प्रतिसादात्मक क्रिया प्राण्यात मज्जातंतूमार्फत होणाऱ्या संवेदनांसारखी असते असा त्यांचा दावा होता. विषारी पाणी ओतल्यास वनस्पती मरणोन्मुख होतात; झाडांना मूर्च्छनाकारी औषधे (नार्कोटिक्स) देऊन स्थानांतर केल्यास इजा न पोचता ती दुसऱ्या जागी जोमाने वाढू लागली असे त्यांनी दाखविले. अशा रीतीने वनस्पती शास्त्रातील संशोधनात पदार्थविज्ञानातील अचूक मापनांचा वापर करून त्यांनी संशोधनास नवी दिशा दिली. तसेच पदार्थविज्ञान, शरीरविज्ञान, वनस्पतीशास्त्र यांच्यामधील एकात्मता स्पष्ट व्हावी असाही त्यांचा प्रयत्न होता.
वासाहातिक भारतासारख्या एका गुलाम असलेल्या देशात भोवताली विज्ञानाची परंपरा व वातावरण नसताना जगदीशचंद्र बोसांनी मौलिक संशोधन कार्य केले हे लक्षात घेतले तर त्याचे महत्त्व लक्षात येते. त्याचप्रमाणे भारतातील आधुनिक विज्ञानाच्या प्रारंभकालातल्या स्वरूपाचेही दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला घडते. सर्वसामान्य जनतेच्या हिताशी, राष्ट्रीय उन्नतीशी व देशभक्तीशी नाते सांगतच भारतातील आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला. तसेच व्यापक मानवतावादाची डूबही त्याला होती. जगदीशचंद्र हे याचे प्रतीक म्हणून भारतीय विज्ञान इतिहासात संस्मरणीय राहतील.