Menu

जेम्स हटन

(James Hutton)

जन्म: ०३ जून १७२६.
मृत्यू: २६ मार्च १७९७.
कार्यक्षेत्र: भूगर्भशास्त्र, भूगोल.

जेम्स हटन
James Hutton
स्कॉटिश भूगर्भशास्त्रज्ञ
जन्म: 3 जून, 1726
मृत्यू: 26 मार्च, 1797

भूगर्भशास्त्राचे जनक

ईश्वराने सुमारे 6000 वर्षांपूर्वी सृष्टी निर्माण केली, अशी कल्पना अठराव्या शतकातील युरोपमध्ये दृढमूल होती. बायबलमधील कथांतील वंशावळी हा वास्तव इतिहास मानून त्या आधारे ही कालगणना केली होती व ख्रिस्ती जगतात हे त्रिकालाबाधित ‘सत्य’ मानले जात होते.
वास्तविक पाहता पृथ्वीवरील काही जमिनीच्या ठिकाणी पाणी व पाण्याच्या ठिकाणी जमीन असे फेरफार झाले असल्याचे सिध्द करणारा पुरावा प्राचीन ग्रीक व रोमन विद्वानांच्या लक्षात आला होता. समुद्रात सापडणारे शंख व इतर प्राणी भूमध्य समुद्राकाठच्या अनेक देशांतील जमिनींवर सापडत. भूशास्त्राच्या दृष्टीने मोलाची असलेली भूपृष्ठविषयक बरीच माहिती प्राचीन विद्वांनांनी जमवली होती. परंतु, नैसर्गिक व्यापारसंबंधीची त्यांची कारणमीमांसा बरोबर नव्हती. भूपृष्ठरचनेबद्दल अनेक मिथ्या कल्पना 17 व्या शतकापर्यंत युरोपात प्रचलित होत्या त्यांना धक्का दिला स्कॉटिश शास्त्रज्ञ जेम्स हटन यांनी.
जेम्स हटन हे बहुश्रुत व व्यासंगी स्कॉटिश शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला तो वकिलाकडील उमेद्वारीपासून. परंतु हटन यांना कायद्याचा कीस काढण्यास रस नव्हता. ते आपला अधिक काळ रासायनिक कूटप्रश्न सोडवण्यात घालवत. त्यांचा कल पाहून वकिलांनी त्यांना आपले कार्यक्षेत्र बदलण्याचे सुचवले आणि ते लगेच वैद्यकीय शिक्षणाकडे वळले. 1749 मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. पण त्या क्षेत्रात पुरेसा वाव न आढळल्याने ते आपल्या घरच्या शेतीकडे वळाले. युरोपमधून शेतीचा अनुभव व शिक्षण घेऊन त्यांनी सुधारित पद्धतीने शेती सुरू केली. त्यांनी अमोनियम क्लोराईडचा कारखाना काढला. या व्यवसायात त्यांची चांगली भरभराट होत होती. पण त्यामध्येही अधिक प्रगतीला वाव नाही असे वाटून त्यांनी संशोधन क्षेत्र निवडले. 1768 मध्ये ते एडिंबरामध्ये स्थायिक झाले. तेथील शास्त्रज्ञ व विचारवंतांच्या सर्जनशील व जिवंत वातावरणात पुढील तीस वर्षे ते पूर्णपणे संशोधनात व्यग्र राहिले. ते कधी कौटुंबिक पाशात पडले नाहीत. सर्व वेळ संशोधनातच गुरफटलेले असत.
त्या काळात ‘भूगर्भशास्त्र’ असे निश्चित शास्त्र अस्तित्वात नव्हते. खनिजशास्त्राची दृष्टीही खनिजांच्या वैशिष्ट्यांच्या अभ्यासापलीकडे पोहचली नव्हती. हटन यांची दृष्टी व्यापक होती. पृथ्वीचा इतिहास उलगडण्याच्या दृष्टीने खडक व खनिजे यांच्या उगमाचा वेध घेण्यापासून आपले संशोधन सुरू केले. इंग्लंडमध्ये पायी भ्रमंती करून निरीक्षणांचा समृध्द आधार त्यांनी उभा केला. त्या काळात असे गृहीत होते की, भूपृष्ठात काही बदल होत गेले नाहीत किंवा बदल घडले तर ते आपत्ती स्वरूपात होतात. याउलट भूपृष्ठात संथपणे पण सतत फरक होत असतात व हे फरक एकाच पध्दतीने लाखो वर्षे होत आहेत, अशी मांडणी हटन यांनी केली. पृथ्वीवर दोन तऱ्हेच्या शक्ती कार्यरत आहेत. एक भूगर्भातील आणि एक वातावरणातली. मोठमोठे खडकही वारा, पाणी व रासायनिक क्रियेने झिजतात. त्यामुळे होणाऱ्या स्थित्यंतरांचा सखोल अभ्यास करून हटन यांनी “पृथ्वीचा सिध्दांत’ मांडला.
भूपृष्ठाची सतत झीज होऊन तो भाग समुद्राच्या तळाशी जाऊन एका बाजूला भूभाग नाश पावत असताना महासागराच्या पोटात नवीन भूपृष्ठाची रचना सुरू होते. चुनखडीचे दगड आणि खडकातले प्रस्तरीभूत अवशेष हे या विधानाला पुष्टी देतात. निसर्गचक्रात समुद्राच्या पोटात तयार झालेली जमीन पाण्याबाहेर येऊन भूखंडे तयार होतात. भूपृष्ठाची नवनिर्मिती व भूपृष्ठांची झीज हे चक्र युगानुयुगे चालू आहे व चालू राहील. भूखंडाच्या उत्पत्तीसंबंधीची आपली मीमांसा हटन यांनी 1785 साली एडिंबरोच्या रॉयल सोसायटीकडे ‘पृथ्वीचा सिध्दांत’ हा निबंध पाठवून सादर केली.
हटन यांच्या सिध्दांतानुसार, पृथ्वीची उत्पत्ती होऊन सहा हजार वर्षापेक्षा किती तरी अधिक काळ लोटला होता. पण जगाचे अतिप्राचीनत्व सिध्द करण्यासारखा भक्कम पुरावा आजून त्यांना उपलब्ध नव्हता. हटन यांचा सिध्दांत धर्मेतिहासाविरोधी असल्याने त्याला कडाडून विरोध झाला. रिचर्ड किरवानसारख्या रसायनशास्त्रज्ञाने त्यांच्या सिध्दांतावर हल्ला चढवला. जर्मनीमध्ये तर वर्नर प्रभुती शास्त्रज्ञांनी ‘हटनविरोधी’ मंडळ स्थापन केले. हटन यांची मते उचलून धरण्यासाठी त्यांच्या अनुयायांनीही मंडळ स्थापन केले. एडिंहरो येथील गणिताचे प्राध्यापक प्लेफेअर यांनी अनेक उदाहरणे व युक्तिवाद देऊन त्यांच्या सिध्दांतांची सुबोध मांडणी आपल्या ‘इलस्ट्रेशन ऑफ हटन्स थिअरी ऑफ अर्थ’ या ग्रंथात केली. त्यांचा हटन यांचे विचार सोप्या पध्दतीने विस्तृत प्रमाणात पोचण्यासाठी मोठा उपयोग झाला. तरी हटन यांच्या विचारास मान्यता मिळाली ती पुढे प्रस्तरविशेष शास्त्रज्ञांनी भरपूर पुरावा उभा केल्यावर. 1884 मध्ये ‘पावसाचा सिध्दांत’ या निबंधात हटन यांनी मांडले की “बाष्पसंपृक्त हवेच्या प्रवाहाचा थंड वार्राशी संयोग होऊन द्रवीभवन होते.’ पावसाच्या उत्पत्तीबाबतची बीजरूपे या सिध्दांतात आढळतात. उत्क्रांतीवरही हटन यांचे संशोधन चालू होते व त्यामध्ये डार्विनच्या सिध्दांताची बीजे होती. पण त्यांचे संशोधन फारच उशीरा म्हणजे 1947 साली उजेडात आले. शेतीमधील आपला विस्तृत अनुभव व प्रयोग या आधारे कृषीविज्ञानावरही त्यांनी लिखाण केले. कुशाग्र निरीक्षण, खुली दृष्टी आणि अखंड परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी भूस्तरशास्त्राचा पाया घातला व भूगर्भशास्त्राचे जनक म्हणून ते मान्यता पावले.