Menu

जॉ फ्रेडेरिक् जोलिओ

(Jean Frédéric Joliot-Curie)

जन्म: १९ मार्च १९००.
मृत्यू: १५ ऑगस्ट १९५८.
कार्यक्षेत्र: अणुशास्त्र.

जॉ फ्रेडेरिक् जोलिओ
Jean Frédéric Joliot-Curie
फ्रेंच अणुशास्त्रज्ञ
जन्म: 19 मार्च, 1900
मृत्यू: 15 ऑगस्ट, 1958

मोलाची भर घालणारा संशोधक

जॉ फ्रेडेरिक जोलिओ लहानपणापासूनच प्रयोगवेडे होते. त्यांच्या छोटेखानी प्रयोगशाळेत लावलेले क्युरी दांम्पत्याचे प्रयोग करतानाचे छायाचित्र त्यांना कायम स्फूर्ती देई. नऊ-दहा वर्षांचा जॉ मोठा खटपट्या होता. तो निरनिराळ्या रसायनांवर प्रयोग करी. तेलाचा दिवा बनवून घरभर तेल सांडी. फुंकणीतून कागदी गोळ्या उडवी. जॉ यांचे वडील सैन्यात होते. 1871 मध्ये फ्रान्समध्ये कामगारांसाठी उठाव करून ‘पॅरिस कम्यून’ हे पहिले कामगारशासन स्थापन केले त्यावेळी जॉचे वडील कम्यूनसाठी लढले. नंतर कम्यूनचा पराभव झाल्यावर जीव वाचवण्यासाठी ते बेल्जियमला गेले. पॅरिसला परतल्यावर ते धंद्यात शिरले. जॉच्या आईने कुटुंबामध्ये बंडाची ज्योत कायम तेवत ठेवली.
जॉ यांचे उच्चशिक्षण रसायनशास्त्र व भौतिकी संस्थेत झाले, या संस्थेचे विशेष म्हणजे तेथे प्रयोगाव्दारे सर्व शिक्षण चाले. संस्थेचे प्रमुख पॉल लॉजव्हॅ हे व्यासंगी व प्रयोगशील शास्त्रज्ञ होतेच पण सामाजिक न्यायासाठी ते आयुष्यभर लढले. तरूण संस्कारक्षम वयात आपले तडफदार शिक्षक पॉल लॉजव्हॅ यांच्यामुळे जॉ जोलिऑ यांना स्फूर्ती मिळाली.
1925 मध्ये मारी क्युरी यांच्या रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये जोलिओ यांनी नोकरी धरली व मारी क्युरींसमवेत संशोधन करण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न पुरे झाले. त्यांची सहकारी संशोधक, मारी क्युरींची मुलगी इरेन हिच्याशी त्यांची मैत्री जमून 1926 मध्ये दोघे विवाहबध्द झाले.
किरणोत्सर्गी मूलद्रव्यांमधून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांव्दारे ‘पॉझिट्रॉन’ या मूलकणांची निर्मिती कशी होते, यासंबंधी त्या दोघांनी फार महत्वाचे संशोधन केले. अल्फा कणांचा मारा मूलद्रव्याच्या अणूकेंद्रावर केला तर त्यातून न्यूट्रॉन व पॉझिट्रॉन कण बाहेर फेकले जातात. या क्रियेच्या अभ्यासातून त्यांनी कृत्रिम किरणोत्सर्गाचा शोध लावला. त्याच्या संशोधनातील या सर्वांत महत्वाच्या शोधामुळे नवी किरणोत्सर्गी मूलद्रव्ये निर्माण करणे शक्य झाले. अशा मूलद्रव्यांचा उपयोग वैद्यकशास्त्रात, उद्योगधंद्यात व इतरत्र केला गेला.
जॉ आणि इरेन यांच्या कृत्रिम किरणोत्सर्गाच्या बहुमोल शोधासाठी त्यांना 1935 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याआधी 1903 मध्ये मारी क्युरी, पेरी क्युरी या शास्त्रज्ञ पतीपत्नींना त्यांच्या रेडियमवरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते.
1929 पासून पाश्चात्य राष्ट्रे आर्थिक मंदीच्या अरिष्टात सापडलेली होती. जर्मनीत नाझीवाद फोफावून महायुध्दाचे काळे ढग जमले होते. 1939 च्या सप्टेंबरमध्ये जर्मनीने पोलंड पादाक्रांत केले, व मे 1940 मध्ये जर्मन सैन्य फ्रान्समध्ये घुसले. या काळात जोलिओ व त्यांचे सहकारी आण्विक विघटनावर संशोधन करीत होते. त्यासाठी वापरात असलेले युरेनियम ऑक्साईड व जड पाणी तसेच त्याविषयीची माहिती नाझी जर्मनांच्या हाती लागणे अतिशय धोक्याचे होते. हे सर्व सुरक्षितपणे हलवण्याची जबाबदारी जोलिओ यांनी पार पाडली. जोलिओ यांच्या संशोधनाचे महत्त्व जर्मन राज्यकर्त्यांना माहीत असल्याने त्यांना वश करून घेण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न त्यांनी केले. नाझीव्याप्त फ्रान्समध्ये शास्त्रीय संशोधन चालू ठेवायचे पण जर्मनांना कशाचाही थांगपत्ता लागू द्यायचा नाही, अशी तारेवरची कसरत युद्धकाळात जोलिओ यांना करावी लागली. गुप्तपणे चाललेल्या नाझीविरोधी प्रतिकार लढ्यातही हे सक्रीय होते. त्यांचे क्रांतिकारी शिक्षक पॉल लॉजव्हॅ यांना जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण केल्यावर अटक केली होती. त्यांना जीव वाचवण्यासाठी 1944 मध्ये स्वीर्झलँडला पळून जायला जोलिओ यांनी मदत केली. जॉ हे ‘मौल्यवान’ शास्त्रज्ञ असल्याने प्रारंभीच्या काळात जर्मनांनी त्यांना पकडले नव्हते, पण 1943 पासून परिस्थिती धोक्याची बनल्यामुळे ते भूमिगत झाले.
दरम्यान, अमेरिकी सत्ताधीशांनी अणुशक्तीचा वापर मानवी संहारासाठी केला. जर्मनीचा पाडाव होऊन शरणागतीला आले असताना, 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा व 9 ऑगस्टला नागासाकी या जपानमधील शहरांवर पूर्वसूचनाही न करता अणुबॉब टाकून अमेरिकी सरकारने प्रचंड नरसंहार केला. या भीषण घटनेने जगातले सर्व शास्त्