Menu

जोसेफ नीडहॅम

(Joseph Needham)

जन्म: ०९ नोव्हेंबर १९००.
मृत्यू: २४ मार्च १९९४.
कार्यक्षेत्र: जीवरसायन शास्त्र.

जोसेफ नीडहॅम
Joseph Needham
ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ व
विज्ञान-इतिहासकार
जन्म : 9 डिसेंबर, 1900
मृत्यू : 24 मार्च, 1994

विज्ञान-इतिहासाचे गाढे अभ्यासक

आयुष्यातील पहिली वीस वर्षे जीवनरसायनशास्त्रातील संशोधनात व्यतीत करून जोसेफ नीडहॅम यांनी जीवनरसायनशास्त्रात मौलिक योगदान केले. परंतु ते जगप्रसिद्ध आहेत ते चिनी विज्ञान आणि संस्कृतीवर त्यांनी केलेल्या चाळीस वर्षांच्या प्रगाढ संशोधनामुळे. त्याचबरोबर विज्ञान, धर्म आणि समाजवादी विचार यामधील दुवा असेही त्यांचे विचारवंतांमध्ये स्थान आहे. नीडहॅम यांनी 1922 साली केंब्रिज विद्यापीठातून पदवी शिक्षण पुरे केल्यावर तेथे नव्याने सुरू केलेल्या रसायनशास्त्र विभागात त्यांनी संशोधनास सुरुवात केली. कोंबडीच्या अंड्यातील गर्भाची वाढ होताना एकपेशीय फलित अंड्याचे रूपांतर विविध अवयवांनी परिपूर्ण असणाऱ्या संवेदनशील पिलात होताना घडणाऱ्या विविध चयापचय क्रियांवर त्यांनी आपले संशोधन केंद्रित केले. 1931 मध्ये त्यांनी “केमिकल एम्ब्रियॉलॉजी’ हा मौलिक ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध केला. 1936 मध्ये “ऑर्डर अँड लाईफ’ व 1942 मध्ये “बायोकेमिस्ट्री अँड मॉर्फोजेनेसिस’ हे त्यांचे दोन मोठे ग्रंथ प्रकाशित झाले. हे ग्रंथ लिहिताना त्यांनी इजिप्त व अरबी भाषांतील पुरातन संदर्भग्रंथाचा अभ्यास केला होता. नीडहॅम यांचे लिखाण सामान्यजनांना देखील समजेल अशा वैशिष्टयपूर्ण भाषेतील आहे.
चिनी विज्ञान इतिहासातील योगदान : सोळाव्या शतकापासून युरोपने विज्ञान-तंत्रज्ञानात जी उत्तुंग भरारी मारली, ती केवळ स्वकर्तृत्वावर मारली अशी घमेंड युरोपात होती. युरोपाबाहेरील शास्त्रीय प्रगतीबाबत विशेषत: चिनी व भारतीय प्रगतीच्या योगदानाबाबत गाढ अज्ञान होते. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या गतीनियमांच्या अभ्यासाचे स्वतंत्र व स्वायत्त ज्ञान, असे मानले जाऊन विज्ञानाच्या प्रगतीचा सामाजिक संबंध दुर्लक्षित केला गेला होता. 1931 मध्ये लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान परिषद झाली. त्यामध्ये सोविएत शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा विकास हा समाज व अर्थव्यवस्थेत कसा गुंफलेला असतो, आर्थिक विकासाच्या गरजेनुसार विज्ञानाच्या प्रगतीला कशी दिशा मिळते याबाबत सोदाहरण विवेचन केले. उदा. न्यूटनच्या जगप्रसिद्ध “प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ या ग्रंथाचा आर्थिक, सामाजिक संदर्भ त्यांनी स्पष्ट केला. याच काळात इंग्लंडमध्ये हाल्डेन, बर्नाल, लेवी, नीडहॅम आदी शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रगतीची आर्थिक-सामाजिक व्यवस्थेच्या संदर्भात तपासणी सुरू केली. युरोपला जाऊन दारूगोळा, कागद, होकायंत्र आदि शोध चीनकडून मिळाले नसते तर सरंजामशाहीचा पराभव, जगप्रवास, साम्राज्यविस्तार, जागतिक पातळीवरील वनस्पती व इतर माहितीचे संकलन व संशोधन झपाट्याने पुढे गेले नसते, असे त्यांनी मांडले.
युरोपच्या विज्ञानाच्या भरारीत प्राचीन संस्कृतीमधील विज्ञानाच्या प्रगतीचा मोठा आधार होता. या दृष्टिकोनातून चिनी संस्कृत व विज्ञान यांच्या अभ्यासाकडे नीडहॅम वळले. त्यांनी चिनी भाषेवर प्रभुत्व कमावले. चीनबाबतचे खास जाणकार म्हणून 1942 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना चीनमधील चीन-ब्रिटन सहकार्य कार्यालयाचे संचालक नेमले. 1946 पर्यंत ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्या काळात संपूर्ण चीनभर प्रवास करून त्यांनी विज्ञानविषयक संदर्भग्रंथ, कागदपत्रे व शास्त्रीय माहिती गोळा केली. जुन्या तंत्रज्ञानातील प्रत्यक्ष अभ्यास केला. सुमारे 25 शतके एवढ्या प्रदीर्घ कालखंडात गणित, खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, धातुविज्ञान, वनस्पतीशास्त्र, औषधशास्त्र इत्यादी महत्त्वाच्या सर्व शाखांमधील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाचा इतिहास लिहिण्याचे काम त्यांनी 1948 साली हाती घेतले. केंब्रिज येथे सुसज्ज ग्रंथालयात संदर्भसाहित्य संग्रहित करून नीडहॅम व त्यांचे सहकारी 40 वर्षे चिनी संस्कृती व विज्ञानाच्या इतिहासाच्या संशोधनात मग्न होते. जागतिक विश्वकोशाच्या तोडीचे असे हे काम ग्रीक काळातील आरिस्टॉटल नंतर नीडहॅम यांनीच केले असे मानले जाते. एकूण वीस खंडात हा चीन विज्ञानाचा इतिहास विभागला असून त्यातील 17 खंड प्रसिद्ध झाले आहेत व 12 खंड नीडहॅम यांनी लिहिलेले आहेत.
चौदाव्या शतकापर्यंत विज्ञानाच्या सर्व शाखांमधून चिनी संस्कृती ही जगाच्या अनेक शतके पुढे होती, हे उदाहरणे देऊन नीडहॅम स्पष्ट करतात. त्यापुढील काळात मात्र चिनी विज्ञानाची प्रगती कुंठित झाली. अनेक शतके एकछत्री साम्राज्यांच्या प्रामुख्याने शासकीय, संरक्षक, शेती, खाणकाम आदि गरजा भागविण्यासाठी चीनमधील विज्ञान व तंत्रवैज्ञानिक प्रगती झाली. परंतु सरंजामशाही शासनाचे बंध हे आधुनिक प्रगतीला अडसर ठरले. हे बंध तोडल्याविना अर्थव्यवस्थेला गतीशीलता मिळणे तसेच सर्जनशील प्रयोग व सैद्धांतिक प्रगती होणे कठीण होते. अशी मोकळीक आणि जागतिक पर्यटनाद्वारे गोळा झालेल्या साहित्यामुळे पुढे येणारे नवे प्रश्न आदि अनुकूलता युरोपात निर्माण झाली तर सरंजामी पग़ड्याखालचा चीन स्थितीशील, एकाकी, चाकोरीबद्ध चौकटीतच राहिला व विज्ञान आणि आर्थिक विकासात मागे पडला. याबाबतची मौलिक चिकित्सा नीडहॅम यांनी आपल्या ग्रंथात केलेली आहे.