जन्म: ०९ ऑगस्ट १७७७.
मृत्यू: ०९ जुलै १८५६.
कार्यक्षेत्र: रसायन शास्त्र.
लोरेंझो रोमानो अमिदेओ आव्होगाद्रो
Lorenzo Romano Amedeo Avogadro
इटालियन रसायन शास्त्रज्ञ
जन्म: ९ ऑगस्ट १७७७
मृत्यू: ९ जुलै १८५६
एकाच तपमान व दाबाखाली असणाऱ्या वेगवेगळ्या वायूंचे आकारमान एकसमान असेल तर त्यांच्या रेणूंची संख्यासुद्धा एकसमान असते हा इटालियन शास्त्रज्ञ अमिदेओ आव्होगाद्रोचा सुप्रसिद्ध सिद्धांत. तोच आपण आव्होगाद्रोचा नियम म्हणून ओळखतो.
तुरिन, इटली येथे उमराव घराण्यात जन्मलेल्या कुशाग्र बुद्धीच्या अमिदेओ आव्होगाद्रोने २० व्या वर्षीच धार्मिक कायद्यामध्ये डॉक्टरेट मिळवली आणि वकीली सुरु केली. परंतु जोजेफ लुई गे-ल्यूसॅकच्या सिद्धांतांच्या प्रभावामुळे विज्ञानाकडे आकर्षित झालेल्या आव्होगाद्रोला धार्मिक कायद्यापेक्षा विज्ञानातील आव्हाने खुणावू लागली. तो भौतिकशास्त्र आणि गणिताच्या अभ्यासात गुंतत गेला. यात त्याला प्रसिद्ध गणितीय भौतिकीचे प्रा. वसाल्ली एआंदी (Prof. Vassalli Eandi) यांनी मदत केली.
आव्होगाद्रोने क्षारांच्या द्रावणांच्या विद्युतिकीय वर्तनांचा अभ्यास करून १८०३ साली त्याचा भाऊ फेलिचे बरोबर आपले पहिले संशोधन प्रसिद्ध केले. तीन वर्षे आधीच इटालियन शास्त्रज्ञ अलेस्सांद्रो व्होल्ताने (Alessandro Volta) विद्युत घटाचा शोध लावला होता.
१८०६ मध्ये आव्होगाद्रो यशस्वी वकीली सोडून तुरिनमधील हायस्कूलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकवू लागला. १८२० मध्ये तो तुरिन विद्यापीठात गणितीय भौतिकीचा प्राध्यापक झाला. १८२३ मध्ये राजकीय अस्थिरतेच्या काळात त्याला विद्यापीठाने काढून टाकले पण दहा वर्षांनी त्याची पुनर्नेमणूक केली. तेव्हापासून १८५० पर्यंत आव्होगाद्रो तुरिन विद्यापीठात शिकवण्याचे काम करत राहिला. आव्होगाद्रो अत्यंत नम्र, सतत विज्ञानविषयक कामात गुंतलेला असे. त्याची जीवनसरणी अत्यंत साधी होती.
आव्होगाद्रोने जॉन डाल्टन आणि जोजेफ गे-लुसॅक यांच्या संशोधनांचा सखोल अभ्यास केला. डाल्टनने सर्व पदार्थ अणूंपासून बनलेले असून एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात आणि वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान वेगवेगळे असते असे मांडले. मात्र दोन मूलद्रव्यांचे अणू एकत्र येऊन जे संयुग तयार होते त्याबाबत त्याची मांडणी चुकीची होती. उदाहरणार्थ, हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येऊन पाणी तयार होते हे आपण जाणतो. मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा प्रत्येकी एकेक अणू एकत्र येऊन पाणी बनते असे डाल्टनला वाटत होते. गे-ल्युसॅकने दोन लिटर हायड्रोजन आणि एक लिटर ऑक्सिजन असे दोन वायू एकत्र केल्यास दोन लिटर वायूरुपातील पाणी मिळते हे नोंदले होते. त्याने अनेक वायूंवर केलेल्या प्रयोगांतून कोणत्याही दोन वायूंची त्यांच्या आकारमानाच्या प्रमाणात एकमेकांशी अभिक्रिया होते असे त्याचे मत होते.
गे-ल्यूसॅकच्या दोन वायूंच्या अभिक्रियेबद्दलच्या निरीक्षणाचे १८११ मध्ये आव्होगाद्रोने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात स्पष्टीकरण दिले ते असे की एकसमान तपमान आणि दाब असणार्या कोणत्याही दोन वायूंचे आकारमान एकच असेल तर त्यांच्या रेणूंची संख्या एकच असते. हाच आव्होगाद्रोचा नियम! त्याने हेदेखील दाखवून दिले की जेव्हा २ लिटर हायड्रोजन आणि १ लिटर ऑक्सिजन वायू जेव्हा एकत्र येतात तेव्हा २ लिटर वायूरुपातील पाणी मिळते याचा अर्थ रेणूंची संख्या कमी होत असली पाहिजे म्हणूनच वायूरुपी पाण्याचे आकारमान केवळ २ लिटर होते. यात हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू असे तीन रेणू एकत्र येऊन पाण्याचे दोन रेणू बनतात म्हणूनच पाण्याचे आकारमान २ लिटर होते. ही अभिक्रिया पुढे दाखवल्याप्रमाणे होते,
2H2 (gas) + O2 (gas) = 2H20 (gas)
डाल्टन व इतर शास्त्रज्ञ मूलद्रव्ये फक्त अणूरुपात तर केवळ संयुगे रेणूरुपात अस्तित्त्वात असतात असे मांडत होते. तेव्हा काही मूलद्रव्यांचे दोन अणू एकत्र येऊन रेणूरुपात अस्तित्त्वात असतात हे आव्होगाद्रोनेच प्रथम मांडले, उदा. H2.
१८१५ मध्ये मूलद्रव्यांचे अणू, त्यांची संयुगे आणि वायुरुपातील घनता तर १८२१ मध्ये अणूचे वस्तुमान आणि अभिक्रियेतील त्यांचे परस्परांशी असणारे प्रमाण ही महत्त्वाची संशोधने आव्होगाद्रोने प्रसिद्ध केली. १८३७ ते १८४१ या काळात त्याने पदार्थांचे भौतिकशास्त्र यावरील सखोल संशोधनांचे चार खंड प्रसिद्ध केले. या संशोधनाला त्याच्या हयातीत मान्यता मिळाली नाही. त्यावेळी अणु, रेणू, त्यांचे वस्तुमान याबाबत शास्त्रज्ञांमध्ये असलेल्या विविध मतप्रवाहांवर मार्ग काढण्यासाठी १८६० मध्ये कार्ल्सरुह (Karlsruhe) येथे एक विज्ञान परिषद आयोजित केली गेली. या परिषदेत आव्होगाद्रोचे सर्वस्वी दुर्लक्षित संशोधन त्याच्या मृत्युनंतर चार वर्षांनी स्तानिस्लाव कॅन्निझ्झारोने (Stanislao Cannizzaro) मांडले. पुढील दहा वर्षे कॅन्निझ्झारोने सतत पाठपुरावा केल्यावरच आव्होगाद्रोच्या संशोधनाला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली.
एखाद्या पदार्थाच्या अणूचे किंवा रेणूचे वस्तुमान जेवढे आहे तेवढे ग्रॅम तो पदार्थ आपण घेतला तर त्यात ६.०२२१४१२९ x १०२३ एवढे अणू किंवा रेणू असतात. ह्या मूल्याला “आव्होगाद्रोचा स्थिरांक” (Avogadro’s Constant) म्हटले जाते. रसायनशास्त्रातील तो एक महत्त्वाचा स्थिरांक आहे. त्याचे मूल्य आव्होगाद्रोने काढले नव्हते पण त्याच्या संशोधनातून ते स्वाभाविकपणे पुढे आले. स्वतःच्या हयातीत दुर्लक्षित राहिलेल्या आव्होगाद्रोची आज अणूरेणूंवर आधारित रसायनशास्त्राचा एक जनक अशी ओळख आहे.