Menu

मार्सेलो माल्पिगी

(Marcello Malpighi)

जन्म: १० मार्च १६२८.
मृत्यू: २९ नोव्हेंबर १६९४.
कार्यक्षेत्र: शरीरशास्त्र.

मार्सेलो माल्पिगी
Marcello Malpighi
इटालियन सूक्ष्मशरीरवैज्ञानिक
जन्म: 10 मार्च, 1628
मृत्यू: 29 नोव्हेंबर, 1694

महान शास्त्रज्ञ

गॅलिलिओने प्रभावी भिंगाचा वापर करून दुर्बिणीतून केलेल्या प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित, आधुनिक अवकाशशास्त्राचा पाया घातला. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करून माल्पिगी यांनी मानवी व कीटकांच्या शरीरातील विविध अवयवांचा, कीटकांच्या गर्भावस्थेचा अभ्यास करून सूक्ष्मशारीरशास्त्राचा (Histology) पाया घातला.
10 मार्च, 1628 रोजी इटलीतील एका खेड्यात जन्मलेल्या मार्सेलो यांनी आपल्या पालकांच्या मृत्यूनंतर शिक्षण चालू ठेवून 1653 मध्ये तत्वज्ञान व वैद्यकीय शास्त्र यामध्ये बलोना विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली व सुप्रसिध्द पिसा विद्यापीठात अध्यापन, संशोधन सुरू केले. तेथील रूढ, वैद्यकीय समस्यांबाबत ते आपल्या संशोधनाच्या आधारे चिकित्सक प्रश्न उभे करू लागले व तेव्हापासून प्रस्थापित दुढ्ढाचार्यांशी त्यांचे वाद सुरू झाले. तब्बेत व कौटुंबिक कारणांसाठी त्यांनी पिसा विद्यापीठ सोडले व ते आपल्या मूळ बलोना विद्यापीठात परतले. 1661 मध्ये त्यांनी फुफ्फुसातील नीला व रोहिण्या यांना जोडणाऱ्या केशवाहिन्या असतात, हे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दाखवून दिले. वैद्यकीय विज्ञानातील सर्वांत महत्वाच्या शोधांपैकी तो शोध होता. विल्यम हार्वे याने मांडले होते की, हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे केंद्र असून त्यातून ढकललेले रक्त शरीरभर रोहिण्यांमार्फत पसरून विविध नीलांमार्फत हृदयाकडे परत येते. पण रोहिणीतून नीलेमध्ये रक्त कसे जाते, हे हार्वे सांगू शकला नाही. त्यांना जोडणाऱ्या अतिसूक्ष्म केशवाहिन्यांचे अस्तित्व सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दाखवून माल्पिगी यांनी ते केले.
1500 वर्षे चालत आलेल्या गालेनप्रणित वैद्यकीय विचारांनुसार रोहिण्यामधील रक्त शरीरमधील मोकळ्या जागेत जाते व त्यापासून शरीराचे अवयव बनतात. हार्वे-माल्पिगी यांच्या संशोधनाने या विचारांना धक्का बसला व म्हणून प्रस्थापित तज्ज्ञांनी माल्पिगी यांच्यावर टीकेचा झोड उठवली. या विरोधाला कंटाळून 1662 मध्ये माल्पिगी मित्रांच्या मदतीने सिसिली येथील मेसिना विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रूजू झाले. वैद्यकीय व्यवसाय व अध्यापन करतानाच त्यांनी आपले सूक्ष्मदर्शकीय संशोधन चालूच ठेवले. जीभेवरील उंचवट्यामध्ये चव, स्वाद या संवेदना ग्रहण करणारे मज्जातंतू असतात, हे त्यांनी दाखवले. रक्तातील तांबड्या पेशी त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली प्रथम टिपल्या व रक्ताचा लाल रंग या पेशींमुळे असतो, असे 1666 मध्ये मांडले. तसेच मेंदू यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, हाडे, त्वचा यांचा त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करून त्यांचे अचूक वर्णन केले. त्वचेच्या सर्वांत खोलवरच्या पेशीथराला माल्पिगियन हे त्याचे नाव दिले गेले. सूक्ष्मदर्शकीय संशोधनातून त्यांनी अनुमान काढले की, आपल्या शरीरातील बहुसंख्य अवयव म्हणजे अतिशय सूक्ष्म पेशींचा समुच्चय असतो.
1668 पासून त्यांच्या संशोधनाला मान्यता मिळू लागली. 1669 मध्ये त्यांना लंडनमधील जगप्रसिध्द रॉयल सोसायटीचे मानद सभासदत्व बहाल करण्यात आले व त्यांचे त्यानंतरचे सर्व शोधनिबंध त्यांच्यातर्फे प्रसिध्द करण्यात आले. माल्पिगी यांच्या विरोधकांना मात्र त्यांचे संशोधन, वैद्यकीय रोगनिदान व उपचार या दृष्टीने निरूपयोगी वाटे. आपल्या संशोधनातून रोगनिदान व उपचारासाठी उपयुक्त असे तयार ज्ञान निर्माण होत नसले तरी या संशोधनाने शास्त्रीय उपचार पध्दतीसाठी आवश्यक असा पाया घातला जातो आहे याची माल्पिगी यांना खात्री होती.
1673 मध्ये फलित अंड्यापासून कोंबडीचे पिल्लू बनण्याच्या गर्भावस्थेतील निरनिराळ्या टप्प्यांचा अभ्यास करण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी निरनिराळ्या वनस्पतींचा सूक्ष्मदर्शकातून तुलनात्मक अभ्यास केला व वनस्पती व प्राणी यांच्या रचनेतील साम्यांचा शोध घेतला.
माल्पिगी यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळूनही स्थानिक विरोध चालूच राहिला. इतका की 1684 मध्ये त्यांचे घर जाळण्यात आले व त्यांची उपकरणे, सूक्ष्मदर्शक, संशोधनपर कागदपत्रे नष्ट करण्यात आली. पण बाराव्या पोपने त्यांना आधार दिला व त्यांना रोममध्ये बोलावून घेऊन स्वत:चा खाजगी डॉक्टर म्हणून त्यांनी माल्पिगी यांची नेमणूक केली. शिवाय त्यांना इतर मानमरातब बहाल केले. मेंदूतील रक्तस्त्रावाने 29 नोव्हेंबर 1694 मध्ये माल्पिगी मृत्यू पावले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मित्रांनी त्यांचे शवविच्छेदन केले! अशा रीतीने आपल्या मृत्यूनंतरही वैद्यकीय संशोधनात भर टाकणाऱ्या या शास्त्रज्ञाची इच्छा होती की, आपल्या मूळ गावी आपले थडगे बांधले जावे. त्यालाही विरोध झाल्याने प्रथम दुसरीकडे थडगे बांधले गेले. पण शेवटी त्यांच्या मित्रांनी त्यांची इच्छा पूर्ण केली.